Latest

कोल्हापूर : लॉजमालकाच्या हत्येसाठी गुजरातमधून पिस्तूलची खरेदी

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दामदुप्पट परताव्याच्या बहाण्याने घेतलेल्या सहा लाखांच्या रकमेसाठी लॉजमालकाने तगादा लावला होता. अनेकवेळा धुमश्चक्रीही उडाली होती. अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडल्याने कोणत्याही क्षणी जीविताला धोका होऊ शकतो या भीतीतून चंद्रकांत पाटील यांच्या हत्येचा कट शिजला. त्यातूनच हल्लेखोरांनी गुजरातमधून पिस्तूल खरेदी केल्याची माहिती चौकशीतून पुढे येत आहे. खुनाच्या कटात आणखी कोणाचा सहभाग असावा, याचीही शक्यता पडताळण्यात येत आहे. दरम्यान, संशयित सचिन जाधवने चंद्रकांत पाटील यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळी घालण्याची सूचना केल्यानंतर त्याच क्षणी दत्तात्रय पाटीलने फायर केले. लॉजमालकाचा मुलगा रितेश पाटील याच्यावरही गोळ्या झाडून त्याला संपविण्याचा इशारा केला. दत्तात्रय पाटीलने मुलांवरही फायर केले. मात्र अनपेक्षितपणे पिस्तूल लॉक झाल्याने गोळी उडालीच नाही. त्यामुळे केवळ सुदैवानेच मुलगा रितेश वाचल्याची माहितीही पोलिसांच्या चौकशीतून उघडकीला आली आहे.

ए. एस. ट्रेडर्समधील उलाढालीतही हल्लेखोर सक्रिय

संशयित सचिन जाधव हा कोट्यवधीच्या घोटाळ्यात बुडालेल्या ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी तथा फरारी संशयित विजय पाटील (रा. शिंदेवाडी, ता. करवीर) याचा विश्वासू सहकारी असल्याने त्याच्यावर कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी सोपविण्यात आली होती. कंपनीसाठी काम करताना त्याची आर्थिक स्थितीही भक्कम झाली होती. त्याच्या नियंत्रणाखाली दत्तात्रय पाटील करवीर तालुक्यात कार्यरत होता, अशीही माहिती वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आली. कंपनीकडे गुंतवणूक केल्यास कमी काळात दामदुप्पट परतावा मिळू शकेल, अशी बतावणी करून दत्तात्रय पाटील याने लॉजमालकाकडे तगादा लावला होता. त्यातून संशयितांनी 6 लाख रुपये घेतले होते. बर्‍याच काळानंतरही संबंधित रक्कम देण्यास संशयितांनी टाळाटाळ सुरू केली. मोबाईलही घेत नव्हते.

लॉजमालकाच्या भीतीपोटी पिस्तूल खरेदी केले!

चंद्रकांत पाटील यांच्याशी दोघांनी संपर्क तोडला होता. याच कारणातून त्याच्यात दोन-अडीच महिन्यापासून वाद सुरू होता. एकमेकाला खुन्नस दिल्यामुळे लॉजमालकापासून कोणत्याही क्षणी जीविताला धोका उद्भवू शकतो, अशी हल्लेखोरांना भीती होती. अलीकडच्या काळात संशयित गुजरातला गेले होते. तेथून त्यांनी पिस्तूल व काडतुसे खरेदी केल्याची माहिती चौकशीतून पुढे आली आहे.

खुनानंतर सन्नाटा : कुटुंबीयांचा आक्रोश

चंद्रकांत पाटील यांचा दोनवडे, खुपिरेसह पंचक्रोशीत सामाजिक, धार्मिक कार्यात हिरिरीने सहभाग असे. अनेक संस्थांना त्यांचा मदतीचा हात असे. त्याची हत्या झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळासह शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली. रविवारी सकाळपर्यंत गर्दी कायम होती. दोनवडेसह फाट्यावरील दुकानेही बंद होती. गावातील व्यवहारही दिवसभर ठप्प होते. या घटनेमुळे कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थांनी आक्रोश केला.

उत्तरीय तपासणीनंतर दुपारी 12 वाजता नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. दोनवडे येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला. यावेळी नातेवाईकांसह ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती. खबरदारीचा उपाय म्हणून दोनवडेसह फाट्यावरही बंदोबस्त होता. प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT