Latest

पुरंदर तालुका धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनस्थळांचा खजिना

अमृता चौगुले

नितीन राऊत

जेजुरी(पुणे) : पुरंदर तालुक्याला पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे. भौगोलिकदृष्ट्या पर्जन्यछायेच्या परिणामामुळे एक अवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळख निर्माण झाली आहे. मात्र, महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा मंदिर व तेथील ऐतिहासिक स्थळे, छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असणारा पुरंदर किल्ला, बालाजी मंदिर, नारायणपूर येथील श्री दत्तमंदिर, सासवड येथील संत सोपानकाका समाधी मंदिर आणि पुरंदर तालुका ही शिवाची भूमी असून, तालुक्यात अनेक प्रेक्षणीय शिवालये ही येथील प्रेक्षणीय पर्यटनस्थळे उन्हाळी सुटीत पर्यटकांना आकर्षित करतात. ऐतिहासिक, धार्मिक पर्यटनही होऊन जाते.

पुरंदर पर्यटनाच्या दृष्टीने पुरंदर किल्ल्याच्या रांगेत पुरंदर किल्ला, वज्रगड, केतकावळे (बालाजी मंदिर), जेजुरी खंडोबा मंदिर, कडेपठार गड, बालाजी मंदिर, नारायणपूर मंदिर वटेश्वर, संगमेश्वर, पांडेश्वर, भुलेश्वर व मोरगाव ही ठिकाणे आहेत. कानिफनाथ मंदिर, नारायणेश्वर, वीरचा म्हस्कोबा, वाल्हे येथील महर्षी वाल्मिकींचे समाधीस्थळ ही मंदिरे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. पुरंदरला अनेक निसर्गरम्य ठिकाणे, धार्मिक, ऐतिहासिक स्थळे आहेत. ऐतिहासिक काळात पुरंदर किल्ल्यावरील किल्लेदार मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रम, शिवाजी महाराज व मिर्झाराजे यांच्यातील ऐतिहासिक पुरंदरचा तह आणि छत्रपती संभाजीराजे यांची जन्मभूमी, ब्रिटिश काळात पुरंदरवर असणारा खजिना व शस्त्रसाठा ही इतिहासाची साक्ष आहे.

महाबळेश्वरपेक्षाही पुरंदर किल्ला समुद्रसपाटीपासून 26 मीटरने अधिक उंच आहे. ऐन उन्हाळ्यातही येथील हवा थंड असते. अजूनही जिवंत पाण्याची टाक्या किल्ल्यावर आहेत. बहामनी राजा अल्लाउद्दिन हसन गंगू, महमूद शहा, मालोजी भोसले, शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे, बाळाजी विश्वनाथ, सरदार रघुनाथ पुरंदरे यांच्या पराक्रमाचा आणि ऐतिहासिक घटनांचा हा किल्ला साक्षीदार आहे. किल्ल्यावर असणारी पुरंदेश्वर व केदारेश्वर मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते.

पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे पौराणिक नारायणेश्वर मंदिर हे शिल्पकलेचे उत्कृष्ट बांधकाम असणारे प्रेक्षणीय मंदिर आहे. मंदिराच्या शेजारीच नारायणपूर येथे श्री दत्त मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिरात असणारी श्री दत्ताची संगमरवरी मूर्ती देखणी असून, वर्षाकाठी लाखो भाविक येथे दर्शनसाठी येत असतात. नारायणपूरपासून केवळ बारा किलोमीटर अंतरावर केतकावळे येथे प्रती बालाजी मंदिर असून, दररोज बालाजीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येथे येत असतात. येथील ट्रस्टच्या माध्यमातून दर्शन व्यवस्था, प्रसादालय हे येथील मुख्य आकर्षण आहे.

नारायणपूरहून सासवडकडे जात असताना चांगावटेश्वर व संगमेश्वर येथील सुंदर मंदिरे प्रेक्षणीय आहेत. वारकरी सांप्रदायाचे दैवत असणारे सासवड येथील संत सोपानकाका समाधी मंदिर आणि पश्चिमेकडे असणारे नाथपंथीयांचे दैवत कानिफनाथ मंदिर ही स्थळे पर्यटनासाठी महत्त्वाची स्थाने आहेत.

SCROLL FOR NEXT