Latest

पंजाबच्या कुख्यात जग्गू भगवान पुरिया टोळीच्या म्होरक्याला कोल्हापुरात बेड्या

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पंजाब, हरियाणा, राजधानी दिल्लीसह अन्य राज्यांत प्रचंड दहशत असलेल्या पंजाबातील कुख्यात जग्गू भगवान पुरिया टोळीचा म्होरक्या दीपक ऊर्फ अर्जुन ऊर्फ परवेश ऊर्फ ढोलो ईश्वरसिंग राठी (वय 32, रा. खरहार, जि. झज्जर, पंजाब) या आंतरराष्ट्रीय गुंडाला कोल्हापूर पोलिस आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त पथकाने रात्री उशिरा येथील रंकाळा टॉवर परिसरात छापा टाकून बेड्या ठोकल्या. खून, खुनाच्या प्रयत्नासह अनेक गंभीर गुन्ह्यांतील नामचिन गुन्हेगाराने फरार काळात कोल्हापुरात आश्रय घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.

संशयित दीपक ऊर्फ अर्जुन राठी कुख्यात गॅगस्टर्स म्हणून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी वर्तुळात ओळखला जातो. हरियाणातील नामचिन लॉरेन्स बिष्णोई टोळीला पाण्यात पाहणार्‍या प्रतिस्पर्धी जग्गू भगवान पुरिया टोळीसाठी संशयित राठी काम करीत आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित असलेल्या जनरल सिंग याच्यावर 24 मे 2023 मध्ये बेछूट गोळीबार करून त्याची हत्या केली होती. तत्पूर्वी, 21 मे 2023 रोजी रौनित सिंग ऊर्फ सोनू मोटा याच्यासह साथीदारांवर गोळ्या झाडून त्याच्याही हत्येचा संशयिताने प्रयत्न केला होता.

शोधासाठी गोपनीयता

संशयितासह त्याच्या साथीदारांनी अमृतसरसह परिसरात प्रचंड दहशत निर्माण केल्याने अमृतसर पोलिसांनी पंजाबसह अन्य राज्यांत छापेमारी केली. मोबाईल लोकेशनद्वारे संशयित रविवार, दि. 2 जून 2023 पासून स्वत:ची ओळख लपविण्यासाठी कोल्हापूर येथे वास्तव्याला आला आहे, अशी माहिती अमृतसरचे पोलिस निरीक्षक अमनदीप सिंग यांना मिळाली. त्यानंतर पंजाब पोलिसांनी अत्यंत गोपनीयपणे संशयिताचा छडा लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

पंजाबचे विशेष पथक दाखल; रात्री उशिरा छापा

अमृतसर (पंजाब) युनिटचे अमनदीप सिंग यांच्यासह विशेष पथक शुक्रवारी रात्री कोल्हापूर येथे दाखल झाले. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्याशी पथकाने चर्चा करून संशयिताच्या कारनाम्याची माहिती दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाला कारवाईच्या सूचना देण्यात आल्या. संशयित राठी याच्या कब्जात अत्याधुनिक बनावटीचे हत्यार असल्याची माहिती मिळाल्याने कोल्हापूर व अमृतसर पोलिसांंच्या संयुक्त पथकाने सावधगिरीचा पवित्रा घेत शोधमोहीम राबविली.

रंकाळा टॉवर परिसरात वास्तव्य

संशयित राठीचे रंकाळा टॉवर परिसरातील दुधाळी येथील धुण्याची चावीजवळ भाड्याच्या खोलीत वास्तव्य असल्याची पक्की खबर मिळताच संयुक्त पथकाने छापा टाकून नामचिन गुंडाला जेरबंद करण्यात यश आले. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीच्या खतरनाक गुंडाने पंजाबसह हरियाणा व दिल्ली पोलिसांना चकवा देण्यासाठी काही दिवसांपासून कोल्हापूरचा आश्रय घेतल्याची माहिती चौकशीतून पुढे येताच स्थानिक पोलिस यंत्रणेची तारांबळ उडाली आहे.

वरिष्ठ अधिकार्‍यांकडून गंभीर दखल

नामचिन गुंडाने कोल्हापुरात आश्रय घेतल्याची माहिती उघड होताच विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. स्थानिक पोलिस यंत्रणांना या घटनेची खबरबात का नसावी, असा प्रश्न वरिष्ठ अधिकार्‍यांतून व्यक्त होत आहे.

गुन्हेगाराला रसद पुरविणारा स्थानिक कोण?

कुख्यात गुंड दीपक ऊर्फ परवेश राठी याच्या शोधासाठी पंजाब, दिल्ली, हरियाणा पोलिसांची विशेष पथके काही दिवसांपासून रात्रंदिवस शोधमोहीम राबवीत असताना संशयिताने लपण्यासाठी थेट कोल्हापूरचा आश्रय घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परप्रांतीय आणि कॅनडा, यूएसए, ऑस्ट्रेलिया येथून आर्थिक रसद पुरविल्या जाणार्‍या कुख्यात जग्गू भगवान पुरिया टोळीच्या म्होरक्याला कोल्हापुरात मदत करणारा स्थानिक सहकारी कोण? याचा पोलिस शोध घेत आहेत. भाड्याने खोली उपलब्ध करून देण्यासाठी कोणी पुढाकार घेतला, याची माहिती घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

SCROLL FOR NEXT