पुणे : पुढारी वृत्तसेवा : नवी पेठेतील पूना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवलाचा मेसेज पुणे पोलिसांच्या नियंत्रणक कक्षाला गुरूवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास आला होता. त्यानंतर तत्काळ अॅक्शन मोडवर येत पोलिस आणि बीडीडीएस पथकाने घटनास्थळी धाव घेत हॉस्पिटलची तपासणी केली. यावेळी तेथे कोणत्याही प्रकारची बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली नाही. धमकी देणारा मेसेज आल्यानंतर काही काळ मात्र घबराट उडाली होती. दरम्यान कोणी हा प्रकार केला याबाबत पोलिस माहिती घेत आहेत.
पोलीस नियंत्रण कक्षातील मोबाईल क्रमांकावर गुरूवारी (दि.01) रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास एका पाकिस्तानी नंबर वरून एक मेसेज आला. तो व्हर्च्युअल क्रमांक देखील असू शकतो. त्यामध्ये असे म्हटले होते की, पाकिस्तानी कैदीयोको छोड दो, वरना पूना हॉस्पिटल को बॉम्बसे उडा देंगे असा तो मेसेज होता. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस, तसेच बाँम्ब शोधक पथकाला देण्यात आली. बाँम्बच्या अफवेमुळे परिसरात घबराट उडली होती.
बाँब शोधक पथकाने पूना हॉस्पिटल मधील मेडिकल, पार्किंग, प्रत्येक खोली आणि संशयास्पद वस्तूंची तपासणी केली. साधारण 2 तास तपासणी करण्यात आली. यात कुठेही बाँबसदृश वस्तू आढळून आढळून आली नाही. खोडसाळपणे पोलीस नियंत्रण कक्षाला मेसेज केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस नियंत्रण कक्षाला मेसेज करणार्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे नागरिक घराबाहेर पडले होते. बघ्याची मोठी गर्दी निर्माण झाली होती. तर रहदारीसाठी शास्त्री रस्त्या आणि कर्वे रस्त्याला जोडणारा यशवंतराव चव्हाण पूल बंद करण्यात आला होता. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा लावण्यात आला होता. घटनास्थळी अपर पोलीस आयुक्त (दक्षिण) प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत कुवर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ, विपीन हसबनीस, शब्बीर सय्यद आदीं अधिकार्यांनी भेट देऊन पहाणी केली.
पोलिस नियंत्रण कक्षाला गुरूवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास पूना हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याच्या संदर्भात मेसेज मिळाला होता. घटनास्थळी पोलिस आणि बीडीडीएसच्या पथकाने तपासणी केली असता, बॉम्ब सदृश्य कोणतीही वस्तू आढळून आली नाही. धमकीचा मेसेज कोणी केला याबाबत पोलिस तपास करत आहेत.
संदीपसिंह गिल, पोलिस उपायुक्त परिमंडळ एक