महेंद्र कांबळे/ उदय पोवार
पुणे : डीआरडीओचे संचालक तसेच वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप मोरेश्वर कुरुलकर ज्या ठिकाणी उद्घाटनाला गेला होता. तेथेच त्याच्यावर बंदिवासात जाण्याची वेळ आली आहे. येरवडा कारागृहातील ही घटना असून, तेथे शिक्षा भोगत असलेल्या कैद्याच्या स्मृतिपटलावर ती ताजी आहे. कुरुलकरचा मोठा रुबाब होता. प्रत्यक्षात त्याचा विभाग देशातील अत्यंत गोपनीय समजल्या जाणार्या डीआरडीओतील संशोधनाचा होता. तरीदेखील कुरुलकर हा अनेक ठिकाणी उद्घाटने व भाषणांसाठी जात असे.
तो सात महिन्यांपूर्वी दिवाळी निमित्ताने येरवडा कारागृहात प्रमुख पाहुणा म्हणून गेला होता. कैद्यांसमोर त्याने भाषणही केले. मात्र, सात महिन्यांनंतर त्याच कारागृहात बंदीवान म्हणून जाण्याची वेळ येईल असे स्वप्नातही वाटले नसेल. मात्र, कुरुलकरच्या बाबतीत ही बाब खरी ठरली. कुरुलकर याला 16 मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
त्यामुळे त्याची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आणि दिवाळीनिमित्त त्याने प्रमुख पाहुणे म्हणून केलेले भाषण तेथील सर्वांच्या स्मृतिपटलावर जागे झाले. बंदिगृहात दिवाळीच्या सणानिमित्त बंदीजनांकडून विविध वस्तू बनवून घेतल्या जातात. तसेच त्याचे प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन होते. तसाच प्रकार 2022 च्या दिवाळीत 14 ऑक्टोबर रोजी झाला. त्या दिवशी कुरुलकराने येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.