Latest

मांडवगणमध्ये वादळी वार्‍याने विद्युत खांब उन्मळून पडले

अमृता चौगुले

मांडवगण फराटा, पुढारी वृत्तसेवा: मांडवगण फराटा (ता. शिरूर) परिसरात बुधवारी (दि. 8) रात्री वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले असून विजेच्या तारा तसेच खांब पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

बुधवारी सायंकाळी वादळी वार्‍याला सुरुवात झाली. यानंतर मुसळधार पावसाने सर्वत्र हजेरी लावली. या वादळी वार्‍यात शिरसगाव काटा, वडगाव रासाई, मांडवगण फराटा, कुरुळी आदी गावात झाडे पडल्याने विजेचे खांब कोसळले. तसेच विद्युत तारांवर झाडांच्या फांद्या पडल्याने अनेक ठिकाणच्या तारादेखील तुटून गेल्या होत्या. वादळी वार्‍याला सुरुवात झाल्यानंतर महावितरणने त्या- त्या भागात विद्युतपुरवठा खंडित केल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. गुरुवारी (दि. 9) सकाळपासून विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून विशेष मोहीम राबविण्यात आली.

याबाबत बोलताना महावितरण अधिकार्‍यांनी सांगितले की, मांडवगण फराटा कार्यालय अंतर्गत येणार्‍या अनेक गावांमध्ये विद्युत तारा तुटल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला होता. मात्र, महावितरणचे शाखा अभियंता एम. ए. मुलाणी, वडगाव रासाईचे शाखा अभियंता सुयश मुंगसे, शिरसगाव काटाचे स्वप्निल साळुंके, नवनाथ ठोंबरे, विश्वास पवार, केशव जाधव, दत्तात्रय शिर्के, रेखा सरोदे यांच्यासह कर्मचारी वर्गाने झाडे तोडून सकाळपासून परिश्रम घेत विजेचे खांब तसेच विद्युत तारा जोडल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांनी विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात यश आले आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने खबरदारी घेण्याची गरज असल्याचे सांगितले.

SCROLL FOR NEXT