Latest

पुण्यातील अंबिल ओढ्याला हवी पूररेषा

अमृता चौगुले

आशिष देशमुख

पुणे, पुढारी वृत्तसेवा: अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक आंबिल ओढ्याचा प्रवाह भ्रष्टाचाराने पूर्ण बदलून गेला आहे. ओढ्यावरच अनधिकृत बांधकामे झाल्याने पूर्वीचा सरळ ओढा आता यू-शेप आकाराचा झाला आहे. ठिकठिकाणी अतिक्रमणांनी त्याचा , गळा दाबला गेला आहे. त्यामुळे तब्बल 25 लाख लोकांचा जीव पावसाळ्यात धोक्यात येतो. तेथे तातडीने पूररेषा आखून, तलावातील गाळ काढणे, गावांचे सांडपाणी रोखणे, दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंती बांंधणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बसवणे, प्रवाहाचे मॅपिंग करून धोक्याच्या ठिकाणी अलर्ट यंत्रणा बसवणे गरजेचे आहे.

आंबिल ओढ्याच्या अभ्यासाशिवाय शहराचा विकास आराखडा पूर्णच होऊ शकत नाही अशी वेळ आता आली आहे. मुठा नदीतून उगम पावलेल्या आंबिल ओढ्याचे वय दीड लाख वर्षे असून, आजवरच्या एकाही राज्यकर्त्याने शहराचा विकास आराखडा करताना त्याच्या प्रवाहाचा विचार न केल्याने अनेक वेळा पूर येऊन शेकडो लोकांचे नाहक बळी गेले. आज या ओढ्याकाठी अडीच लाख लोकवस्ती असून, त्यांना पुराचा धोका आहे. सध्या सर्वच पातळ्यांवर सुरू असलेल्या भ्रष्ट कारभाराचा बळी सामान्य नागरिक ठरला आहे.

ओढ्याखालचे 84 झरे नामशेष

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीपासून पुढे पेशवे काळातही या ओढ्याला पूर आला. मात्र, त्या काळात जो कामात प्रामाणिकपणा होता तो आजच्या काळात न राहिल्याने त्याचे लचके तोडून मार्ग बदलून कात्रज ते सारसबागेपर्यंत सरळ असलेला ओढा आता घोड्याची नाल ज्या आकारात असते तशा आकाराचा (हॉर्स शू शेप) झाला आहे. महापालिका प्रशासनाच्या काळात या ओढ्याचे सर्वाधिक हाल झाले असून, ठिकठिकाणच्या अतिक्रमणांमुळे ओढ्याखालचे 84 जिवंत झरे नामशेष झाले आहेत.

शोधनिबंधाचे झाले दर्जेदार पुस्तक

तरुण भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. श्रीकांत गबाले व पर्यावरण अभ्यासक मंजूश्री पारसनिस यांनी आंबिल ओढ्याचा तब्बल दहा वर्षे अभ्यास करून हे सर्व निष्कर्ष काढले आहेत. त्यांनी केलेल्या शोधनिबंधावरच 'बॅबलिंग ब्रुक टु नास्ट्री डे्रेन' हे आंबिल ओढ्याचा इतिहास व वर्तमान सांगणारे अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले आहे. महापालिकेच्या भ्रष्ट कारभारात या ओढ्यासह सामान्य नागरिकांचे किती नुकसान होत आहे याचा अभ्यासपूर्ण ताळेबंद यात मांडला आहे.

शहरासह ओढ्याची अभ्यासपूर्ण माहिती

– मुठा नदीचे वय 1 कोटी वर्षे, ती गंगेपेक्षा वयाने मोठी

– आंबिल ओढ्याचा जन्म एक ते दीड लाख वर्षांपूर्वीचा
– मुठा नदीवर आंबिल व नागझरी हे दोनच ओढे होते.

– त्या वेळी होती शहराची लोकसंख्या 25 हजार
– शहराचे क्षेत्रफळ 138 प्रति चौ. कि. मी. वरुन वाढले 243 प्रति चौ. कि. मी.

– लोकसंख्येची घनता : (सन 2001): 10 हजार 405 प्रति. चौ. कि. मी.
– 2018 साली झाली : 12 हजार 770.25 प्रति चौ. कि. मी.

– धनकवडी, सहकारनगर झोपडपट्टी भागातून येते सर्वाधिक जास्त प्रक्रिया न केलेले सांडपाणी
– नागरिक टाकतात घनकचरा

– हॉटेल, रेस्तरॉंमधून येतो सर्वाधिक कचरा
– 1842 साली इंग्रजांनी काढला होता कात्रज तलावातील गाळ
– आता सर्वांत मोठे आवाहन जलपर्णीचे

– प्रशासनाच्या विकास आराखड्यात व्यवस्थापनासाठी जलतज्ज्ञांचे मत घेतले जात नाही.
– ओढ्यातील जैवविविधता होतेय नष्ट.

– ओढ्यावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नाही.
– बीओडी, सीओडी, डीओ, पीएच, तापमान मोजण्याची सोय नाही.

आंबिल ओढ्याभोवती लोकसंख्येची घनता

– औंध : 40 हेक्टर

– येरवडा : 50 हेक्टर
– हडपसर ः73 हेक्टर

– वारजे : 97 हेक्टर
– संगमवाडी ः 98 हेक्टर

– बिबवेवाडी : 107 हेक्टर
– टिळकरोड : 116 हेक्टर

– ढोले-पाटील रोड : 118 हेक्टर
– घोले राेड : 150 हेक्टर

– सहकारनगर : 163 हेक्टर
– कर्वे रोड : 203 हेक्टर

– विश्रामबागवाडा : 696 हेक्टर
– कसबापेठ : 855 हेक्टर

– भवानी पेठ : 941 हेक्टर
(एकूण घनता : 227.68 हेक्टर : 25 लाख 97 हजार लोक)ः

या गोष्टी तातडीने कराव्यात…

– तलावातील गाळ काढा : साठवणक्षमता वाढून ओढ्यावरचा ताण हलका होईल.

– पूररेषा आखा : ब्लू लाईन व रेड लाईन पाहिजे.
– गावांचे सांडपाणी रोखा : समाविष्ट गावांचे सांडपाणी प्रक्रिया न करताच अंबिल ओढ्यात सोडले जाते.

– ओढ्यावरची बांधकामे रोखा : बांधकामांचा राडारोडा ओढ्यात टाकला जात आहे, त्यामुळे त्याची लांबी, रुंदी बदलली आहे.
– संरक्षण भिंती बांधा : ओढ्याच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंतींमुळे पुराचा धोका कमी होईल.

– जीआय मॅपिंग करा : मॅपिंग करून धोक्याच्या जागी अलर्ट यंत्रणा बसवा.
– शहर विकास आराखडा करताना आंबिल ओढ्याचा प्रवाह लक्षात घ्या

त्या पूराची आठवण आली की येतात अंगावर शहारे 

पावसाळा आला की ओढ्याकाठच्या लोकांना रात्री झोपच लागत नाही. 1752 मध्ये पेशवेकाळांत पूर आला होता. तेव्हा दक्षिणेतील 40 हजार ब्राम्हण ओढ्याकाठी राहवयास आले होते. तेव्हा 40 ते 50 लोकांचा मृत्यु झाला. त्यामुळे नानासाहेब फडणवीसांनी सारस बागेजवळ भिंत बांधून ओढा शनिवार वाड्याच्या पश्चिम दिशेकडून वळवला. मात्र 2019 मध्ये जेव्हा पूर आला तेव्हा शहराची वातहत झाली. रात्रीच्या आंधारात घरा-़घरांत पाणी शिरले. शेकडो संसार वाहून गेले. शहरभर आक्रोश होता. त्यात 12 लोकांचे बळी गेले. अनेक बेपत्ता झाले. त्यांचा शोध लागलेला नाही. या पुराने मोठी हदशत निर्माण केली. ती आठवण आली आजही अंगावर काटा उभा राहतो.

SCROLL FOR NEXT