Latest

Pulwama Attack : ‘जैश’चे ८ दहशतवादी ठार, ७ अटकेत; ४ जण पाकिस्तानात फरार

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्याला (Pulwama Attack) आज (दि.१४) चार वर्षे पूर्ण होत आहे. २०१९ मध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफ जवानांवर भ्याड हल्ला केला होता. यात ४० हून अधिक जवान शहीद झाले होते. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर काश्मीर झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी आज सांगितले की, या हल्ल्यात सहभागी असलेल्या एकूण १९ अतिरेक्यांपैकी ८ ठार झाले आहेत. ७ जणांना अटक करण्यात आली आहे. तर ४ दहशतवादी पाकिस्तानात फरार झाले आहेत.

सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी एम एस भाटिया म्हणाले की, पुलवामा हल्ल्यानंतर (Pulwama Attack) जम्मू- काश्मीरमधील परिस्थिती सुधारली आहे. सुरक्षा दलांनी केलेल्या उपाययोजनामुळे असे हल्ले पुन्हा होण्याची शक्यता फार कमी आहे. दहशतवादी मॉड्यूल्सचा भंडाफोड केला जात आहे. त्यांच्या इकोसिस्टमचा पर्दाफाश झाल्याने आम्हाला खात्री आहे की, अशा प्रकारचा हल्ला पुन्हा होणार नाही.

ते पुढे म्हणाले की, सध्या एकूण ३७ स्थानिक दहशतवादी सक्रिय आहेत. त्यापैकी फारुख नल्ली आणि रियाझ छत्री यांच्यासह फक्त दोनच वृद्ध आहेत. अल्पसंख्याक समुदायावरील हल्ले हे भ्याडपणाचे कृत्य आहे. अशा हल्ल्यांमागे असलेले लोक मारले गेले आहेत, तर असे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आम्ही अल्पसंख्याकांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. या संदर्भात अनेक मॉड्यूल्स निष्प्रभ करण्यात आले आहेत. CRPF सीआरपीएफ आणि पोलीस आणि इतर सुरक्षा दले अल्पसंख्याक समुदायाच्या संरक्षणाची खात्री देत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, भारतीय लष्कराने पुलवामा घटनेचा बदला घेत अवघ्या १२ दिवसांनंतर २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे एअर स्ट्राईक करत जैश -ए- मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT