इंटरनेट पॅकेजवाल्या महिनाभरात तीनशे-चारशे रुपये खर्चून एक जीबी डेटा कसाबसा पुरवून वापरणार्या आम्हा भारतीयांवर जेमतेम पाचेकशे रुपयांत दररोज दोन जीबी डेटा देऊन तू आम्हाला त्रास दिला आहेस.
तू त्रास देत आहेस की काय, असे वाटायला लावले आहेस. व्हॉटस्अॅप नावाचे ते एक अॅप आमच्या दैनंदिन जीवनात ताप होऊन बसले आहे. भरपूर वापरूनही लोकांचा डेटा दशांगुळे उरतोच आहे. सकाळी जागे होताच जर आपण आपला मोबाईल डेटा सुरू केला की, पहाटे पाच वाजल्यापासून मोबाईलचा स्क्रीन उघडण्याची वाट पाहणारे (आणि आपल्या दिवसाची वाट लावणारे) मेसेज, चित्रे, व्हिडीओ धडाधड येऊन पडायला लागतात. सकाळी जागे होताच कराव्या लागणार्या महत्त्वाच्या शारीरिक कृतींना प्राधान्य देण्याऐवजी व्हॉटस्अॅप सुरू करायला लावणारा किमयागार तूच आहेस इंटरेनट पॅकेजवाल्या.
धन्य तुझे माता-पिता ज्यांनी तुझ्यासारख्या सुपुत्राला जन्म दिला आणि तू इंटरनेट नेटवर्कला जन्म दिलास. काही लोकांना असे पाच-पन्नास मेसेज इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे पाठविल्याशिवाय सकाळी ओक्के होत नसावे बहुतेक, अशी इलेक्ट्रॉनिक सवय तू लावून ठेवलीस; मग हे महाभाग जागे होताच संबंधित सर्व ग्रुप्सवर असे गुड मॉर्निंग मेसेज टाकूनच कार्याला लागतात. व्हॉटस्अॅप ग्रुप म्हणजे टोळ्या आणि त्यांचे टोळीप्रमुख हा आणखी एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. क्षणात कुणाला वाढदिवस शुभेच्छा की, पाठोपाठ शोकसंदेश, काही क्षणात तत्काळ फॉरवर्ड करा, असा आग्रह यात माणूस भांबावून जातो. हे सगळे त्रास तुझ्यामुळेच रे इंटरनेट पॅकेजवाल्या! देश तब्बल वीस दिवस चालविता येईल इतकी तुझी संपत्ती आहे म्हणे; परंतु आहे तसा देश बरा चालावा ही तुझी जबाबदारी नाही काय?
इथून पुढे प्रत्येक मोबाईलधारकला अशी शपथ घेणे सक्तीचे केले पाहिजे, 'शपथपूर्वक निवेदन करतो की, मी कधीही सकाळी जागे होताच व्हॉटस्अॅपवर कुणाही व्यक्तीला किंवा कोणत्याही ग्रुपवर गुड मॉर्निंग तसेच आयुष्य कसे जगावे किंवा आनंदी कसे राहावे किंवा पुढे दिवसभरात आर्य-चाणक्यपासून अनेकांचे बहुमोल विचार देणारे मेसेज; शिवाय प्रत्येक बर्यावाईट पोस्टवर ते अंगठे किंवा त्या वाकड्यापासून चकण्यापर्यंतच्या स्माईल्या, 'वर' गेलेल्या प्रत्येकाला दिलेला 'आरआयपी' हा शतकातील सर्वात भावपूर्ण निरोप इत्यादी नंतर पुढे रात्री गुड नाईट असे किंवा तत्सम मेसेज इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे पाठविणार नाही.'
इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे, असे म्हणतात; पण इतकेही नको की, ज्यामुळे लोकांना केवळ व्हॉटस्अॅपमध्ये डोके घालायला लावले आहे. विशेषतः, महिलावर्गाने यामध्ये विशेष आघाडी घेतल्याचे दिसून येते. घरात कोणाला विचारणार नाही; पण व्हॉटस्अॅपवर यांचे हजारो मित्र आणि मैत्रिणी. प्रत्यक्ष कधी भेटणार नाहीत; पण रोज व्हॉटस्अॅपवर मात्र हे लोक सातत्याने भेटणार हे नक्कीच! नातेसंबंध कसे जपायला हवेत, हेच हे लोक विसरून गेले आहेत, बहुधा! एखाद्याचा वाढदिवस असला की, मैत्रीच्या जीवनातील राजामाणूस असे अनेक संदेश नेहमीच पाहायला मिळतात; पण मित्र कधी अडचणीत आला की, हे लोक खरेच एकमेकांच्या मदतीला धावतात की नाही, हे डोके खाचवणारा विषय आहे. आता रोज एवढा डेटा मिळतो; मग करा मजा, बाबानो!