Latest

पुढारी News पॉलिटिकल सर्व्हे : महाराष्ट्रातील जनतेची पसंती मोदीच!

मोहन कारंडे

महाराष्ट्राचे राजकारण बेचव झालेले आहे, यावर सर्वांचेच एकमत आहे. परंतु त्याचबरोबर ते अधिक रंगतदार झालेले आहे का, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांच्याही पक्षांतील फुटीमुळे राज्याच्या राजकारणावर, विशेषत: जनमानसावर काही परिणाम कसे दिसतात, हे 'पुढारी न्यूज' च्या 'महापोल मधून जाणून घेतले. हे जाणून घेताना तीन बाबी ठळक दिसतात. महाराष्ट्रातील अव्वल पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचा मतदारही विभाजित झालेला आहे आणि मनसे, वंचित बहुजन आघाडी या पक्षांना निर्णायक भूमिका बजावता येईल, अशी स्थिती अद्याप दिसत नाही.

लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक पसंती देत असतानाच ती निर्विवादपणे नरेंद्र मोदींमुळे आहे. हे पुढारी न्यूज'च्या 'महापोल'मधून स्पष्ट झाले आहे. मोदी यांनी स्वतःचा तयार केलेला 'अँड अद्यापही लोकप्रिय आहे. ही अधोरेखित होताना दिसते. पुढील पंतप्रधान न असावा याचे उत्तर नरेंद्र मोदी हेच आहे. राहुल गांधीही दुसऱ्या क्रमांकाची पसंती आहे; परंतु त्यांची आकडेवारी मोदींच्या निम्मीही नाही. महाराष्ट्रातून पंतप्रधानपदासाठीच्या पसंतीक्रमात पहिल्या तीन क्रमांकांत नितीन गडकरीही दिसून येतात, हे या पाहणीचे वैशिष्ट्य. उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्रातील जनता खूप गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. त्याचबरोबर ममता बनर्जी, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल यांचाही विचार महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात नाही हेही उळकपणे पुढे येते.

महिला मतदारांतही मोदीच सर्वाधिक पसंतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याविषयी महिलावर्गात सहानुभूती असल्याचे बोलले जाते, परंतु लोकसभा निवडणूक आणि पंतप्रधानपदाचा विचार करताना त्याचे प्रतिि पडताना दिसत नाही. सर्वसाधारण पसंतीपेक्षा अधिक टक्के तरुण मोदींना पंतप्रधानपदासाठी मान्यता देताना दिसतात. मध्ये नितीन गडकरी यांच्या पसंतीचा टक्काही किंचितसा वाढताना दिसतो. महाराष्ट्रातील विभागनिहाय पंतप्रधानपदाचा पसंतीक्रम पाहता, नरेंद्र मोदीच पुढे आहेत. परंतु मुंबईत मोदींची पसंती पन्नास टक्क्यांवर पोहचताना दिसते. तर विदर्भात ती त्याखालोखाल येते. कोकण, मराठवाडा देश आणि सर्वात शेवटी पश्चिम महाराष्ट्र असा मोदींचा पसंतीक्रम आहे. पश्चिम महाराष्ट्रात नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदासाठीची पसंती चाळीस टक्क्यांच्या आत येताना दिसते. राहुल गांधी यांची पंतप्रधानपदासाठीची सर्वाधिक पसंती पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, मराठवाड्यात दिसते; परंतु कोकण, खान्देश, विदर्भात ती वीस टक्क्यांच्याही खाली जाताना दिसते. विदर्भात काँग्रेसचा भक्कम आधार असतानाही राहुल गांधीची पसंती कमी दिसते आहे. पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांना अद्यापही पुरेशी पसंती केवळ पश्चिम महाराष्ट्रातच दिसते.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा विदर्भ भाजपने पूर्णतः काबीज केला असल्याची आकडेवारी या पाहणीतून समोर येते आहे. विदर्भातील ४४ टक्के जनता भाजपच्या पाठीशी, तर त्याच्या निम्मी म्हणजे २२ टक्के जनता काँग्रेसच्या पाठीशी असल्याचे दिसते.
लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यातील एक्केचाळीस टक्के जनता मोदींच्या पाठीशी आहे. मराठवाड्यातील बहुसंख्य शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गेलेले असले, तरीही येथे लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिंदे यांच्या गटापेक्षा तिप्पट अधिक पसंती मिळताना दिसते आहे.

मुंबईची शिवसेनेबरोबर असलेली नाळ आणि ठाकरे कुटुंबाबरोबर असलेले आत्मीयतेचे संबंध याच्यामुळे लोकसभा निवडणुकीत येथे भाजपला साथ किती लाभणार आणि तुलनेत उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळणारी साथ किती, हे पाहणे औत्सुक्याचे होते. मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाची पसंती शिंदे गटापेक्षा दुपटीहून अधिक असली, तरी भाजपच्या निम्मी आहे. भाजपला मुंबईत लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरीसाठी कदाचित शिंदे गटाबरोबरच मनसेच्या साहाय्याची गरज लागू शकते, असे म्हणता येईल.
काँग्रेस सर्वत्र भाजपच्या खालोखाल दिसत असताना, कोकण आणि मुंबईत शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट दुसऱ्या पसंतीचा पक्ष ठरताना दिसतो आहे. कोकणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटापेक्षा अधिक मान्यता अजित पवार यांच्या गटाला मिळताना दिसते आहे.

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य राहिलेले आहे. परंतु फुटीनंतर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा गट अजित पवार गटापेक्षा अधिक वजनदार असल्याचे पाहणीतून दिसून आले. या भागात अजित पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या तिघांचेही गट दहा टक्क्यांच्या आत राहताना दिसतात.

खान्देशात भाजपच्या खालोखाल काँग्रेस व शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट दिसतो आहे.

भाजप अव्वल, काँग्रेस दुसऱ्या स्थानावर

लोकसभा निवडणुकांच्या बाबतीत जनता गांभीर्याने भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांचाच विचार करते, हे या पाहणीतून पुन्हा एकदा अधोरेखित झालेले आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाखाली अनुक्रमे 'एनडीए' आणि 'इंडिया' या आघाड्या आहेत. परंतु या आघाड्यांमधील सर्व पक्ष व कोणत्याही आघाडीत नसलेल्या पक्षांना लोकसभेसाठी मतदान करणार का, असा प्रश्न विचारला असता, जनता प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपचाच अग्रक्रमाने विचार करते, हे दिसून येते. भाजपला २०१९च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ३८ टक्के मते मिळालेली होती, ती टक्केवारी गाठत असताना त्याच्यात किंचतशी वाढ होईल, असे ही पाहणी सांगते. काँग्रेसला गेल्या निवडणुकीत १६ टक्के मते मिळालेली होती. त्याच्यात दीड टक्क्याने वाढ होताना दिसते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांत उभी फूट पडलेली आहे. ही फूट फक्त विधिमंडळात असल्याचे सांगितले जाते, परंतु जमिनीवर या फुटीचा परिणाम दोन्ही पक्षांवर झाल्याचे या पाहणीतून स्पष्ट होते आहे. या दोन्ही पक्षांचे चार भाग झालेले असल्याने त्याचे प्रतिबिंब पाहणीत पडलेले दिसते आहे. उद्धव ठाकरे गट वगळता अन्य तीनही गट लोकसभेसाठी पसंतीचा दुहेरी आकडाही गाठताना दिसत नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व पक्षांच्या वैगुण्यावर बोट ठेवत असल्यामुळे त्यांच्याकडे मतदार वळू शकतो, अशी चर्चा मोठ्या प्रमाणात घडताना दिसत होती. परंतु त्यांना मतदान करू, असे म्हणणाऱ्यांची टक्केवारी अडीच टक्क्यांपर्यंतही पोहोचताना दिसत नाही.

ओबीसीत मोदी, एससीत टक्कर

मोदी हा भाजपचा सर्वात मोठा ओबीसी चेहरा आहे, याचा निर्विवाद लाभ होताना दिसतो आहे. आज लोकसभा निवडणूक झाल्यास भारतीय जनता पक्षाला मतदान करणाऱ्यांची टक्केवारी चाळीस टक्क्यांहून अधिक असताना इतर कोणत्याही पक्षाला वीस टक्केही पसंती मिळताना दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार या गटांची ओबीसींमधील पसंती दोन अंकीही नाही. अजित पवार यांच्याकडे धनंजय मुंडे, छगन भुजबळ हे मोठे ओबीसी चेहरे असतानाही हे चित्र फारसे बदलत नाही.

मागासवर्गीय समाज हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार राहिलेला आहे. हा वर्ग काँग्रेसकडे पुन्हा वळताना दिसतो आहे. या मतपेढीत भाजप आणि काँग्रेसमध्ये टक्कर असल्याचे चित्र पाहणीतून पुढे आले आहे. या गटात काँग्रेस आणि भाजप या दोघांचीही पसंती तुल्यबळ आहे; तर वंचित बहुजन आघाडी पसंतीक्रमात शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादीचा शरद पवार गट, शिवसेनचा शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट या सर्वांना मागे टाकून आघाडीवर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT