Latest

लवंगी मिरची : कर्तृत्ववानांना सलाम!

Arun Patil

स्वातंत्र्य दिनाच्या देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा. यावर्षीचा स्वातंत्र्य दिन अनेक अर्थांनी मनापासून साजरा करावा, असाच आहे. सर्वसाधारणतः गेल्या तीन वर्षांतील बातम्या पाहिल्या, तर काश्मीरमधील दहशतवाद खूप आटोक्यात आला आहे आणि विकासाच्या महामार्गावर काश्मीरने पाऊल टाकले आहे, ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. दहशतवादी हल्ल्याच्या सावटाखाली स्वातंत्र्य दिन साजरा करताना जीव गुदमरून जायचा. आज या दहशतवादावर चांगल्यापैकी मात करून देश मोकळा श्वास घेत आहे. सिक्कीमच्या सीमेवर चीनच्या कुरापती कमी झाल्या आहेत आणि सीमावाद टाळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यामध्ये चर्चेच्या सुमारे 19 फेर्‍या झाल्या आहेत.

देशाच्या सीमा सुरक्षित असतील, तर स्वातंत्र्य दिन खर्‍या अर्थाने सुरक्षित आणि आनंददायी असतो याचा अनुभव तमाम देशवासीय घेत आहेत. अस्थमा, गुडघेदुखी या आजारांना जुनाट आजार म्हणतात तसेच आपल्या देशाच्या वाट्याला आलेले पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही आजार आता आटोक्यात आले आहेत. देशाच्या सीमेवर काही गडबड करण्याची उरलीसुरली शक्ती पाकिस्तान गमावून बसला आहे. अंतर्गत यादवीपासून स्वतःच्या देशाला वाचवण्याचे काम तेथील लष्करावर आणि राज्यकर्त्यांवर आलेले आहे. त्यामुळे सीमेवरून होत असलेली दहशतवाद्यांची आयात जवळपास थांबलेली आहे, ही बाब अत्यंत सुखावह आहे. देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करताना कुठलेही भीतीचे सावट नसले पाहिजे. तत्पर लष्कर, मजबूत नाविक दल आणि लक्षणीय कामगिरी करणारे हवाई दल आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्याचे काम अहोरात्र करत असतात. या तिन्ही सैन्यदलांच्या प्रत्येक सैनिकाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

रेल्वेचे जाळे झपाट्याने विस्तारत आहे. देशभर अत्यंत आधुनिक अशा नवीन रेल्वे गाड्या वाढीव वेगाने धावत आहेत. इतकी मोठी लोकसंख्या असूनही देशाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अत्यंत लक्षणीय कामगिरी केलेली आहे. रेल्वे आणि स्थानकांवर असलेली अस्वच्छता, कोलमडलेले वेळापत्रक या सर्वांना बाय बाय करून रेल्वे अत्यंत वेगाने धावत आहे ही एक आणखी आनंददायी बाब आहे. गरिबातील गरीब व्यक्तीलासुद्धा अत्यंत कमी दरात उत्कृष्ट असा प्रवास रेल्वे देत असते. या रेल्वेच्या प्रगतीसाठी झटणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना आणि उत्साहाने प्रवास करणार्‍या रेल्वे प्रवाशांनाही स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

नवनवे कीर्तिमान प्रस्थापित करणार्‍या 'इस्रो'मधील सर्व शास्त्रज्ञ, कर्मचारी यांना शुभेच्छा. तुम्ही घेत असलेली गगनभरारी आम्हा सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा विषय आहे. त्यात विशेषत्वाने महिला या सर्व अवकाश योजनांचे नेतृत्व करत आहेत, ही कुणाही देशासाठी मान उंचावणारी बाब आहे. विहित केलेल्या मार्गाप्रमाणे आणि वेळेमध्ये चांद्रयान-3 लवकरच चंद्रावर उतरणार आहे. या चांद्रयानाचे चंद्रावरील आगमन कसे असेल याकडे लहान, थोर सर्व डोळे लावून आहेत. ही मोहीम यशस्वी होणे हा देशाच्या प्रगतीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. लवकरच 'याची देही, याची डोळा' आपले चांद्रयान-3 चंद्रावर उतरलेले पाहण्यासाठी तमाम भारतीयांना शुभेच्छा.

झपाट्याने विस्तारणारे रस्त्यांचे जाळे ही देशाला एकत्र ठेवणारी महत्त्वाची विकास योजना आहे. आसेतु हिमाचल रस्त्यांची कामे सुरू आहेत. प्रचंड मोठ्या महामार्गांनी देशातील सर्व प्रमुख शहरे जोडली जात आहेत. महाराष्ट्रामध्ये 'समृद्धी'सारखा आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार असणारा महामार्ग विदर्भ आणि मुंबईला जोडत आहे. महामार्गावरून प्रवास करताना आपल्याला प्रगत देश घेतात ती काळजी घ्यावी लागेल. सुरक्षित प्रवास ही केवळ सरकारची जबाबदारी आहे, असे म्हणून चालणार नाही. रस्ते वाहतूकसंबंधी कार्यरत असणार्‍या प्रत्येकाला ही काळजी घ्यावी लागणार आहे.

SCROLL FOR NEXT