Latest

लवंगी मिरची : विरोधकांची वज्रमूठ!

Arun Patil

मित्रा, काल मुंबईत जी बैठक झाली आहे, अरे म्हणजे तीच ती, इंडिया आघाडीची बैठक आहे म्हणे! लोकशाहीत प्रभावी विरोधी पक्ष असण्याची गरज आहे. त्यांनी जी वज्रमूठ बांधली आहे, ती कायम राहावी, हीच अपेक्षा आहे. मोदींचा 2024 मध्ये पराभव करण्यासाठी त्यांचे सगळे विरोधक एकत्र आले आहेत आणि त्यांनी मुंबईमध्ये आपला मेळावा भरवला आहे. या मेळाव्यामध्ये बिहारचे एक नेते आहेत ज्यांनी मोदींना तत्काळ हटवण्याची शपथ घेतली आहे. सदरहू लालूप्रसाद या नावाचे बडे नेते या बैठकीला हजर आहेत.

बिहारमधील चारा घोटाळ्यातील आरोप त्यांच्यावर आहेत. त्यासाठी त्यांनी जेलमध्ये शिक्षाही भोगली आणि प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मिळवून ते काही काळाने बाहेर पडले. साहजिकच त्यांना ज्यांनी जेलमध्ये टाकले त्यांच्यावर त्यांचा राग असणारच आहे. मला एक सांग, अशा प्रकारचे असे नेते एकत्र आणून जो देशासाठी गेली नऊ वर्षे अखंड विश्रांती न घेता राबतो आहे, अशा व्यक्तीला हे सगळे कसे हटवू शकणार आहेत? हे बघ हटवू शकतील की नाही, हा वेगळा भाग आहे. परंतु, त्यांच्या मनात तशी इच्छा येणे साहजिक आहे.

गेल्या नऊ वर्षांत ज्यांची ज्यांची घराणेशाहीची दुकाने बंद झाली, भ्रष्टाचाराची दुकाने बंद झाली त्यांना ही राजवट अन्यायकारी वाटण्यात काही वावगे आहे, असे मला वाटत नाही. लोकशाहीची खरी गंमत हीच आहे की, विरोध करता आला पाहिजे, विरोध करण्याची परवानगी असली पाहिजे, तरच लोकशाहीला काही अर्थ आहे. एकदा लोकशाही मान्य केली की, त्याचे फायदे आणि तोटे स्वीकारले पाहिजेत. काळ किती पुढे गेला आहे, याची या लोकांना अजिबात कल्पना नाही, असे म्हणावे लागेल. हे म्हणजे विकासाच्या तळपत्या सूर्यासमोर एका झाकण नसलेल्या बाटलीत काही मरणासन्न काजवे टाकून उजेड पाडण्याचा प्रकार आहे. ज्यांच्या आयुष्यभराच्या राजकीय करिअरमध्ये अंधार आहे, ते लोक आयुष्याच्या उत्तरार्धात कशाचा उजेड पाडतील, हेच मला काही समजत नाही.

महाराष्ट्राचे एक बरे आहे. हे राज्य बर्‍याच लोकांना आपल्या हक्काचे राज्य आहे, असे वाटते. गेल्या कितीतरी वर्षांत जे लोक कुठलेही दाखवण्यासारखे विकासाचे काम करू शकले नाहीत, ते फक्त द्वेषाचा चष्मा लावून आमच्या चष्म्यामधून पाहा, असा लोकांना आग्रह करीत आहेत. जनता अत्यंत बारकाईने बघत असते. राज्य पातळीवर आणि देशपातळीवर आपले हित कशात आहे, हे जनतेला समजत असते. जागोजागी विणले गेलेले रस्त्यांचे जाळे, वेळोवेळी सक्षम निर्णय घेऊन परदेशातून येणारी दहशतवाद्यांची थांबलेली आवक, जवळपास संपलेले दहशतवादी हल्ले, ज्ञान-विज्ञान आणि तंत्रज्ञानात देशाने साधलेली प्रगती, झपाट्याने दारिद्य्ररेषेच्या वर येत जाणारी लोकांची संख्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देश जगातील पाचवी आर्थिक महासत्ता झालेला पाहणे या सर्व बाबी भारतीय नागरिकाला सुखावणार्‍या आहेत.

या बैठका आणि त्यानंतर होणार्‍या पत्रकार परिषदा म्हणजे करमणुकीची धमाल आहेत. मी तर ऑफिसला सुट्टी टाकून दोन दिवस हेच पाहत बसलो आहे. असे योग पुन्हा पुन्हा येत नसतात. त्यात पुन्हा देशभरातील सरकारचे विरोधक मुंबईत एकत्र यावेत, हा आपल्या महाराष्ट्रासाठी स्वाभिमानाचा आणि गौरवाचा विषय आहेच. महाराष्ट्राविना देशगाडा न चाले हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत असेल, तर आपल्याला त्याचा अभिमान वाटणार आहे. कोणी देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी लढत आहे, तर कोणी देशाची प्रगती करण्यासाठी आम्हीच योग्य आहोत, असे सांगत आहेत.

SCROLL FOR NEXT