Latest

…तर बाळही होईल तंदुरुस्त

Arun Patil

गर्भवती आईला सर्वच जण आराम करायला सांगतात. एका मर्यादेपर्यंत ते खरेही आहे; पण गरोदरपणी तुम्ही आनंदी, समाधानी असाल, तर तुमचे बाळही तसेच समाधानी, आनंदी जन्माला येईल. त्यासाठी तुम्हाला योग्य आहार, योग्य आराम आणि योग्य व्यायामाचीही गरज असते. गरोदरपणी व्यायाम करण्याने शरीरात उत्साह आणि ऊर्जा टिकून राहते. त्याचबरोबर स्नायू आणि सांध्यांमध्ये लवचिकता आणि मजबुती येते.

हातपाय आखडणे, कंबर दुखणे, वेरिकोज वेन आणि अन्य आजारांपासून बचाव होतो. तणावापासून मुक्त राहण्यासाठीही गरोदरपणी व्यायाम करणे आवश्यक आहे. शिवाय या अवस्थेत व्यायाम करणार्‍या महिलांना मळमळणे, उलटी होणे आणि लठ्ठपणा या समस्यांपासून दूर राहता येते. अर्थात, गरोदरपणी थोडा व्यायाम केल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटते. नियमित व्यायाम केला, तर उत्साही वाटते आणि अतिरिक्त चरबी नाहीशी होते. गरोदरपणात सक्रिय राहिल्याने अनेक प्रकारची गुंतागुंत टळते आणि प्रसूतीच्या वेळी वेदनाही कमी होतात.

ज्या महिला नोकरी, व्यवसाय करतात, त्या गरोदरपणात सक्रिय असतात. या काळात सक्रिय असल्याने तब्येतीविषयीच्या अनेक तक्रारी दूर होतात. त्यांचा रक्तदाब आणि वजन दोन्ही काबूत राहते. इतकेच नव्हे तर बाळाचे वजनही योग्य राहते.

गरोदरपणात फिट राहण्यासाठी सुरुवातीच्या काळात फिरायला जाणे योग्य ठरते. या काळात नियमितपणे व्यायाम केल्याने विशिष्ट प्रकारच्या मधुमेहाचा धोकाही कमी होतो. अशा प्रकारचा मधुमेह केवळ गरोदर महिलांनाच होण्याची शक्यता असते. याशिवाय स्ट्रेचिंग, श्वासाचे व्यायाम, काही योगासने असा व्यायाम गरोदरपणात केले जातात. अर्थात, डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन आणि मार्गदर्शकाच्या देखरेखेखालीच हे व्यायाम केले जावेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT