Latest

युद्धशास्त्रनिपुण छत्रपती शिवाजी महाराज

Arun Patil

छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहासातील स्थान अढळ आहे. ते असामान्य, कर्तृत्ववान आणि धोरणी राजे होते. ते सर्वसामान्यांचे कैवारी, कार्यकुशल, शासनकर्ते होते. त्यांचे नेतृत्व जागतिक दर्जाचे होते. ते जाणता राजा होते. अत्याचाराने दबलेल्या जनतेच्या मनात त्यांनी स्वराज्याची ज्योत निर्माण केली होती. अशा राजाधिराज कर्तव्यदक्ष शिवरायांचे इतिहासातील स्थान हे अमर आणि अमीट आहे.

रयतेला परकीयांच्या आक्रमणातून मुक्त करून स्वराज्याचे स्वप्न साकारणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांची आज परंपरेने जयंती. 17 व्या शतकात शिवाजी महाराजांनी शत्रूला नामोहरम केले आणि त्यानंतर पुढची शेकडो वर्षे मराठ्यांनी ते साम्राज्य टिकवले. शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूंचे आव्हान बहुआयामी होते. तसेच शत्रू समतुल्य नव्हता. तो सैन्य, धनदौलत अशा सर्वच बाजूंनी सशक्त होता. मात्र, अशा शत्रूला महाराजांनी चाणाक्षपणे, मुत्सद्दीपणे आणि युद्धनीतीचा अचूक वापर करत पराभूत केले आणि स्वराज्याची उभारणी केली. गनिमी काव्याच्या डावपेचात शत्रूच्या रसद पुरवणार्‍या मार्गांवर हल्ला केला जात असे, ज्यात स्थानिकांची मदत मिळत असे. कौटिल्याच्या युद्धशास्त्रानंतर सुमारे दोन हजार वर्षांनंतर शिवाजी महाराज्यांच्या तालमीत तयार झालेल्या रामचंद्रपंत अमात्य यांनी युद्धनीतीवर एक प्रबंध तयार केला होता. त्याचा आजही अभ्यास करता येईल. सह्याद्रीचा डोंगराळ परिसर हा गनिमी काव्यासाठी योग्य होता, तर महाराष्ट्राची जनताच महाराजांचे सैनिक होती. अनेक शेतकरी युद्धप्रसंगी हातातील नांगर सोडून तलवार घेत होते. त्यांचा प्रत्येक नागरिक हा प्रथम सैनिक आणि गुप्तहेर असा होता.

शिवाजी महाराजांनी मुघल सैन्याचा आणि त्यांच्या युद्धाच्या डावपेचांचा चांगला अभ्यास केला होता. त्याला योग्य प्रत्युत्तर म्हणून सैन्य, युद्धाचे डावपेच, गुप्तहेर जाळे आणि नेतृत्व तयार केले होते. शिवाजी महाराज हे पहिले राज्यकर्ते होते, ज्यांनी समुद्री किल्ल्यांच्या मदतीने समुद्रात पण स्वराज्य निर्माण केले होते. महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी अनेक किल्ले बांधले. त्यासाठी अनेक ठिकाणी तटबंदी, मनोरे, खंदक तयार केले, ज्यावर हल्ला करणे शत्रूंना कठीण होते.

मुघल सैन्य त्यावेळचे सर्वात प्रचंड ताकदवान सैन्य होते. हे सैन्य म्हणजे हलते-फिरते शहरच होते. त्यांचा चालण्याचा वेग दिवसाला 30-35 किलोमीटर होता. मात्र, हे सैन्य भाडोत्री आणि वेगवेगळ्या विचारसरणीचे होते. नंतर मुघलशाही वाढली तसे ते सैन्य आळशी, अत्याचारी झाले. छत्रपतींनी सैन्याचा पाया घोडदळावर उभा केला. त्यांच्याकडे घोडदळ 45 हजार, बारगीर 60 हजार शिलेदार होते. त्यांच्या घोडदळाचा वेग हा मोगलांच्या वेगापेक्षा तिपटीने अधिक होता. छत्रपतींचे पायदळ हे चपळ आणि काटक होते. अंगरक्षक शूर मावळे होते. गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी जाधव होते. अफजल खानावरचा हल्ला, सुरतेवरचा हल्ला हा गुप्तहेर माहितीच्या आधारेच केला गेला. महाराजांचे नौदल हे सुमारे 25 ते 30 हजार एवढ्या संख्येचे होते. त्यांच्याकडे 100 हून अधिक गलबते आणि इतर लढाऊ जहाजे होती. 17 व्या आणि 18 व्या शतकांचा इतिहास वाचतो तेव्हा या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, मराठे सोडता बाकी सगळीकडे देशातील राज्यकर्त्यांचा पराभव होत होता. त्या पराभवी वृत्तीला परतवण्यात छत्रपतींनी मोठे काम केले.

छत्रपती दूरद़ृष्टीचे राज्यकर्ते होते. शत्रूची कमजोर बाजू ओळखून, एकावेळी एकाच शत्रूशी लढणे, शत्रू बेसावध असताना हल्ला करणे हे छत्रपतींचे वैशिष्ट्य होते. युद्धशास्त्राचे तज्ज्ञ होते, कधी शत्रूवर हल्ला करायचा, कधी त्यापासून रक्षण करणे हे त्यांना चांगले माहीत होते. त्यांचे सैन्य 'सह्याद्री'च्या कड्याकपारीतून युद्धाच्या वेळी एकत्र येत असे. किल्ल्यांचा वापर सुरक्षित स्थान म्हणून केला जात असे. मोगलांवर एकाच वेळी दोन किंवा तीन दिशेने हल्ले व्हायचे. शत्रू सैन्याच्या हालचालींवर आणि रसद पुरवणार्‍या मार्गांवर गनिमी काव्याने हल्ला केला जायचा.

ब्रिटिश, पोर्तुगीज इतिहासकारांनी छत्रपतींची तुलना ज्युलिअस सीझर, अलेक्झांडर, हनीबल या महायोद्ध्यांशी केली आहे. आजसुद्धा अमेरिकन सैन्य भारताची युद्धकला शिकण्यासाठी भारतीय लष्कराकडे येतात. भारतीय सैन्याची मराठा रेजिमेंट छत्रपतींचा वारसा पुढे चालवते. हिमालय, काश्मीर या डोंगराळ भागात युद्धे/दहशतवादी विरोधी अभियाने होतात. त्यावेळचे आपले किल्ले आणि आज पाकिस्तान, चीन सीमेवरील सैन्याची पिकेट यांची तुलना केली जाऊ शकते. जसा शाहिस्तेखानावर छत्रपतींनी अचानक हल्ला केला होता, तशाच प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक आपण पाकिस्तानमध्ये केला होता. पावनखिंड जशी बाजीप्रभूंनी लढवली तसाच पराक्रम भारतीय सैन्याने काश्मीरमधील हाजीपीर खिंडीत गाजवला. सिंहगडावरचा हल्ला आणि कारगिलमध्ये टायगर हिलवर हल्ला याची तुलना होऊ शकते. पुरंदर किल्ल्याने शत्रूंपासून मराठ्यांचे रक्षण केले, तशीच लढाई 1971 मध्ये राजस्थानमध्ये लोंगेवालामध्ये झाली होती. त्याचे चित्रण बॉर्डर चित्रपटात झाले होते.

शिवाजी महाराजांनी 300 ते 350 किल्ले बांधले. नळदुर्ग. किल्ल्यासारखी बुलंद, शूर, निष्ठावान, पराक्रमी माणसे. शिवाजी महाराजांचे अनुयायी तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कंक, मुरारबाजी, प्रतापराव गुर्जर, हंबीरराव मोहिते हे शूर वीर होते. त्यांचे इतिहासातील स्थान अढळ आहे. अशा कर्तव्यदक्ष, स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणार्‍या, सतर्क-सजग मावळ्यांची देशाला नेहमीच गरज असते. छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहासातील स्थान अढळ आहे. ते असामान्य, कर्तृत्ववान आणि धोरणी राजे होते. त्यांचे लढाईचे नैपुण्य, दूरद़ृष्टी, शक्ती आणि युक्ती यांचा वापर जगप्रसिद्ध आहे. ते सर्वसामान्यांचे कैवारी, कार्यकुशल, शासनकर्ते होते. त्यांचे नेतृत्व जागतिक दर्जाचे होते. ते जाणता राजा होते. असामान्य बुद्धिमत्ता, युद्धशास्त्राचे कौशल्य, तत्कालीन परिस्थितीला साजेशी युद्धयंत्रणा त्यावेळी तयार केली होती. अत्याचाराने दबलेल्या जनतेच्या मनात त्यांनी स्वराज्याची ज्योत निर्माण केली होती. अशा राजाधिराज कर्तव्यदक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहासातील स्थान हे अमर आहे. आज सुरक्षेची अनेक आव्हाने देशासमोर आहेत. अशा वेळी छत्रपतींच्या रणनीतीचा वापर करून त्याला तोंड देऊ शकतो.

– हेमंत महाजन, ब्रिगेडियर (निवृत्त)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT