Latest

हाऊ टू विन पीपल?

दिनेश चोरगे

डेल कार्नेगी नावाचा एक झंझावात 1888 मध्ये अमेरिकेच्या मिसुरीमध्ये जन्माला आला. गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डेलने जगातील प्रथितयश, नामवंत कार्पोरेट कंपन्यांतील व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ यांना, त्यांनी लोकांशी अर्थात त्यांचे कर्मचारी आणि ग्राहक यांच्याशी कसे वागावे आणि त्यांना आपलेसे कसे करावे, याची कला शिकवली. डेल यांच्या मृत्यूनंतर आजही 160 पेक्षा अधिक देशांमधील कार्पोरेट कंपन्या, हजारो विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांमध्ये 'How to Win Friends & Influence People' याचे धडे दिले जात आहेत. आधुनिक व्यावसायिक वर्तनाचा जनक म्हणून डेल यांचे नाव आदराने घेतले जाते.

विज्ञानाच्या सर्व शाखांचा उगम तत्त्वज्ञानात झाला आहे. कारण तत्त्वज्ञानाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे संशोधकांनी प्रयोगशाळेत शोधली अन् विज्ञानाचा उगम झाला. अ‍ॅरिस्टॉटल, गॅलिलिओ गॅलक्सी अगदी वराहमिहीर आणि महर्षी कणाद यांच्या विज्ञान संशोधनांना आधी तत्त्वज्ञानाची किनार लाभली. त्यानंतर प्रयोगशाळेत वैज्ञानिक कसोट्यांवर हे तत्त्वज्ञान विज्ञान असल्याचे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले. जॉन ग्रेगर मेंडल हा साधू मठात राहत असे. त्याने मठाच्या शेतात लावलेल्या वाटाण्यांच्या रोपट्यांना तो आपली मुले मानत असे. या मुलांमध्येच ग्रेगर मेंडल याने गुणसूत्रे आणि त्यातील जनुके शोधली अन् तो अनुवंशशास्त्राचा जनक ठरला. असेच काहीसे डेल यांचेही आहे. जेमतेम पदवीपर्यंत शिकलेला आणि गरीब, परिस्थितीमुळे गांजलेला डेल अमेरिकेत सुरुवातीला डुकराचे खारवलेले मांस विकत असे. मात्र, प्राध्यापक किंवा लोकांना जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणारा उत्तम वक्ता व्हावे, अशी महत्त्वाकांक्षा त्याने उराशी बाळगली होती. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डेलने 1911 साली सेल्सबॉयची नोकरी सोडली. त्याने न्यूयॉर्कमध्ये वायएमसीएच्या मॅनेजरला निव्वळ 80 टक्के कमाईच्या मोबदल्यात क्लास घेण्याची परवानगी मागितली. यावेळी त्याने विद्यार्थ्यांवर एक अफलातून प्रयोग केला. 'मला राग येईल असे काहीतरी बोला.' असा हट्ट त्याने धरला. या रागाचे व्यवस्थापन करीत त्याने विद्यार्थ्यांना राग नियंत्रित कसा करायचा, हे शिकवले आणि येथूनच 1912 मध्ये विकसित झाला 'डेल कार्नेगी कोर्स.'

डेल हा पुढे जगभर विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जाऊ लागला. डेल यांची मानवी वर्तनाबाबतची गृहीतके आजही संस्कृत सुभाषितासारखी प्रभावी आहेत. तुम्हाला रोज भेटणारे एक तृतीयांश लोक सहानुभूतीचे भुकेले असतात. त्यामुळे त्यांच्याशी तुम्ही सहानुभूतीने वागा. अशा लोकांना त्यांची स्तुती कुणीतरी करावी, असे सदैव वाटत असते, असा गुरुमंत्र डेल देतात.
2012 ते 2018 सालापर्यंत भोपाळच्या जंगलातील डीबी व्हॅलीमध्ये डेल यांचे हे धडे पत्रकार, सीईओ, मॅनेजर यांना देशातील एका मोठ्या वृत्तपत्र समूहाने दिले. या समूहाने त्यांच्या कर्मचार्‍यांमध्ये टीम वर्क, 'हाऊ स्टॉप वरियिंग अँड स्टार्ट लिव्हिंग', 'हाऊ टू शेअर अँड केअर टू कलिग्स' या आणि अशा अनेक संकल्पना मन आणि मस्तिष्कामध्ये उतरवल्या आहेत.

जग बदलणार्‍या मनाच्या प्रयोगशील कथांचे धडे डेल यांनी विकसित केलेल्या व्यवस्थापन तंत्रातून अनेक कार्पोरेट कंपन्या आणि त्यांच्या कर्मचार्‍यांना दिले जात आहेत. या तंत्राने लाखो लोकांचे आयुष्य पार बदलून गेले आहे. सार्वजनिक ठिकाणी बोलायचे कसे? भाषण द्यायचे कसे? किंवा टीम लीडर असेल तर त्याने त्याच्या टीममधील सहकार्‍यांच्या शंकांचे निरसन करायचे कसे? या सार्वत्रिक समस्येवर डेल यांनी अनेक उपाय योजले आहेत. ते सांगतात, 'तुमचे अनुयायी, कार्यकर्ते असोत वा कर्मचारी. तुम्ही त्यांच्यातील उणिवांवर बोट ठेवू नका. तुम्हाला काहीच येत नाही, तुम्हाला अक्कल नाही, असे संबोधून त्यांचे अवसान गाळू नका! त्यांच्यावर टीका करू नका किंवा त्यांच्यावर संतापून त्यांना गोंधळात टाकू नका. तर जो टास्क तुम्ही त्याला दिला असेल, तो निम्मा त्याने पूर्ण केला असेल तर त्याबद्दल तुम्ही त्याचे कौतुक करा. जे काम तो करू शकला नाही, त्यामागची कारणे शोधून ती त्याला समजावून सांगा आणि उर्वरित काम करण्यासाठी तू हे काम करू शकतो, असा आत्मविश्वास त्याच्यात निर्माण करा.' डेल यांची ही शिकवण आज अनेक व्यवस्थापनांच्या कामी येत आहे. डेल यांचा 'हाऊ टू विन फ—ेेंड्स अँड इंफ्लुएन्स पीपल' हा अभ्यासक्रम वॉरेन बफे यांनी वयाच्या 20 व्या वर्षी घेतला आणि ते जगप्रसिद्ध उद्योगपती बनले. अभिनेत्री डोना रिड हिच्यावर या पुस्तकाचा एवढा प्रभाव पडला की, तिने हे पुस्तक वाचून मिळालेल्या प्रेरणेने कॉलेज क्विनचा किताब पटकावला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT