Latest

प्रज्ञावंत भारत

Arun Patil

अनंत आकाशाच्या पटावर भारताची 'चांद्रयान-3' मोहीम यशस्वी झाली. विक्रम लँडर चंद्रावर मोठ्या आत्मविश्वासाने उतरला आणि काही तासांनी प्रज्ञान रोव्हरने उतरून चंद्राची सैरही सुरू केली. चंद्रावर प्रज्ञान रोव्हर मुक्तपणे विहार करीत होता, त्याच सुमारास पृथ्वीतलावर भारताचा आणखी एक प्रज्ञावंत कर्तृत्व गाजवत होता, त्याचे नाव आर. प्रज्ञानंद. चंद्रावरचा प्रज्ञान आणि हा प्रज्ञानंद. एकूण भारतातील प्रतिभाशक्ती किती प्रज्ञावंत आहे, याची जितीजागती उदाहरणेच म्हणावी लागतील. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत मॅग्नस कार्लसनने टायब्रेकरमध्ये प्रज्ञानंदला हरवले; परंतु जगातल्या पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूशी प्रज्ञानंदने दिलेल्या झुंजीने जगभरातील बुद्धिबळ चाहत्यांची मने जिंकली. एकाने खेळात जिंकायचे आणि दुसर्‍याने शौकिनांची मने जिंकायची, ही खेळातील रीत नवी राहिलेली नाही.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या न्यूझीलंड संघाला विजेत्या इंग्लंडपेक्षा अधिक कौतुक आणि सन्मान वाट्याला आल्याची घटना फार लांबच्या भूतकाळातली नाही. 'चांद्रयान-2' मोहीम अपयशी ठरल्यानंतरची भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्रो) आणि तेथील शास्त्रज्ञांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. जिंकण्यातला आनंद वेगळा असतो, हे खरे असले तरी हरल्यानंतरही अनेकदा जिंकल्यापेक्षा अधिक लोकप्रियता आणि प्रेम मिळत असते.

भारताचा प्रख्यात बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंद बुद्धिबळाच्या विश्वचषक स्पर्धेत जगातील अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसन याच्याकडून पराभूत झाला; परंतु जगभर डंका वाजत राहिला तो आर. प्रज्ञानंदचा. पाच वेळा विश्वविजेतेपद मिळविणार्‍या कार्लसनच्या द़ृष्टीने फिडे बुद्धिबळ विश्वचषक महत्त्वाचा होता कारण त्याच्यासाठीही हा विश्वचषक जिंकण्याची पहिली संधी होती. त्यामध्ये त्याच्याहून वयाने आणि अनुभवाने खूप लहान असलेल्या भारताच्या आर. प्रज्ञानंदने त्याला दिलेली झुंज अविस्मरणीय ठरली. प्रज्ञानंद जगातील दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकाच्या खेळाडूंना हरवून अंतिम फेरीत पोहोचला. तिथेही तो चमत्कार घडवून कार्लसनला झटका देईल, अशी आशा निर्माण झाली होती. तो हरला; परंतु त्याने देशातील तमाम तरुण-तरुणींना, मुलांना प्रेरणा दिली.

असंख्य उगवत्या खेळाडूंसमोर त्याने आपल्या जिद्दीचा आदर्श ठेवला. समोर खेळाडू कोण आहे किंवा कोणत्या क्रमांकाचा आहे, याचा विचार न करता निडरपणे खेळत राहिले, तर धक्का देता येऊ शकतो. त्यासाठी नशिबावर विसंबून चालत नाही, तर प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. बुद्धिबळासारख्या खेळासाठी हवा असणारा कमालीचा संयम अंगी बाणवावा लागतो. तो कसा याचे मूर्तिमंत उदाहरण समोर ठेवणार्‍या प्रज्ञानंदने खेळाचे सखोल, चौफेर ज्ञान, कोणत्याही परिस्थितीत यश गाठण्याची जिद्द, त्यासाठी खडतर परिश्रमाची तयारी आणि यश-अपयश पचवणारी विजिगीषू वृत्ती ठेवण्याचा संदेश केवळ भारतीयच नव्हे, तर जगभरातल्या बुद्धिबळ चाहत्यांना दिला.

बुद्धिबळ हा बैठ्या खेळांपैकी जगातील सर्वाधिक प्रसिद्ध खेळ. जगभरात सुमारे 60 कोटी लोक विविध माध्यमातून बुद्धिबळ खेळतात. हा बैठा खेळ असला तरी त्यामध्ये कला आणि शास्त्राचा मिलाफ असल्यामुळे त्याला जागतिक पातळीवर विशेष महत्त्व दिले जाते. बुद्धी आणि बळ असे दोन शब्द त्यामध्ये असले तरी प्रामुख्याने तो बुद्धीचाच खेळ! तिथे बुद्धीच्याच बळाचा कस लागतो. या खेळात भारताने आपला दबदबा निर्माण केला, तो विश्वनाथ आनंदच्या माध्यमातून. दहा वर्षांपूर्वी विश्वनाथ आनंद बुद्धिबळातील जगज्जेता होता.

महिलांमध्ये कोनेरू हंपीने भारताचा दबदबा जागतिक पातळीवर निर्माण केला. त्यानंतर नाव घ्यावे लागते, ते आर. प्रज्ञानंदचे. एकीकडे विश्वनाथ आनंदचे रुबाबदार आणि बुद्धिमान वाटावे असे व्यक्तिमत्त्व नजरेसमोर असलेल्या भारतीयांपुढे आर. प्रज्ञानंदचे साधे व्यक्तिमत्त्व विशेष लक्षवेधी ठरले. शाळेत शेवटच्या बाकावर बसणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये खपून जाईल, असे प्रज्ञानंदचे व्यक्तिमत्त्व. डोक्याला चपचपीत तेल आणि कपाळावर चंदनाचा टिळा लावलेला, असे सर्वसामान्य मुलांसारखे व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रज्ञानंदच्या डोळ्यातील चमक विलक्षण. अलीकडच्या काळात त्याने आपल्या असामान्य प्रतिभेचे दर्शन घडवून जागतिक पातळीवर भारताला अभिमानाचे क्षण दिले.

फिडे जागतिक स्पर्धेत प्रज्ञानंदचा सामना कार्लसनशी होत होता, ज्याने क्लासिक फॉरमॅटमधले पाच किताब जिंकले. सहा वेळा जागतिक विजेतेपद मिळवले. 2011 सालापासून म्हणजे बारा वर्षांपासून कार्लसन अग्रस्थानी आहे. कार्लसन 2005 साली पहिली विश्वचषक स्पर्धा खेळला होता, ज्यावर्षी प्रज्ञानंदचा जन्म झाला होता. खेळाडूंच्या यशामध्ये त्यांचे कष्ट असतातच; परंतु त्यांच्या पालकांचे परिश्रम आणि त्यागही तेवढेच महत्त्वाचे असतात. खेळाडूंइतकाच किंबहुना त्याहून अधिक दबाव त्यांना सहन करावा लागतो.

प्रज्ञानंदची आई नागलक्ष्मी यांच्या शब्दातच सांगायचे, तर सामना सुरू असताना इतकी शांतता असते की, आपल्या हृदयाची धडधड लोकांना ऐकू जाईल, अशी भीती त्यांना वाटत असते. परदेशात सामन्यांच्यावेळी प्रज्ञानंदची आई स्टोव्ह आणि भांडी घेऊन त्याच्यासोबत जात असते, जेणेकरून स्पर्धेच्या काळात त्याला नीट जेवण मिळावे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू असेच तयार होत नाहीत, त्यामागे अनेक घटकांचे कष्ट असतात.

प्रज्ञानंदने आपल्या खेळाने अशी काही वातावरणनिर्मिती केली होती की, मॅग्नस कार्लसनलाही प्रज्ञानंद बाजी उलटवू शकेल, याची शेवटी शेवटी धास्ती वाटत होती. कार्लसनने स्वतः ती भीती बोलूनही दाखवली होती. प्रज्ञानंदच्या पराभवानंतरही संपूर्ण जग त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहे आणि बुद्धिबळ जगतातला उद्याचा तारा म्हणून त्याचा गौरव केला जात आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरवणारे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) शास्त्रज्ञ आणि बुद्धिबळाच्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारा प्रज्ञानंद, ही खरी भारताची प्रज्ञा! तिची जपणूक करण्यासाठी, तिच्या वाढीसाठी प्रयत्न केले तर भारताचा जागतिक पातळीवरील दबदबा वाढतच राहील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT