Latest

आणखी किती दाभोलकर हवेत..?

Arun Patil

पोथीबद्ध जुनाट आचार-विचारांना महात्मा जोतीबा फुल्यांनी बुद्धिप्रामाण्यतेच्या कसोटीवर घासून आव्हान दिले अन त्यामुळे स्वार्थ बुडू लागलेल्या धर्मनिष्ठांनी त्यांच्या हत्येचा डाव रचला. जोतीबांनी मारेकर्‍यांचीच मने जिंकून घेतल्याने तो डाव फसला…, मात्र त्यानंतर 158 वर्षांनी त्या निष्ठुर धर्मनिष्ठांची सरशी झाली, जोतीबांच्या पुढच्या धर्मचिकित्सकाची 20 ऑगस्ट 2013 ला निर्घृण हत्या करण्यात आली… पण त्यांचा विचार संपला नाही. दाभोलकरांचा कृतीशील विवेकवाद पुसला जाणार नाहीच. त्याच्या प्रकाशातच आधुनिक महाराष्ट्राला पुढची वाटचाल करावी लागेल.

जोतिबांवेळचे सनातनी समाजमन एक वेळ समजू शकते. समानतेची मूल्ये अन् विज्ञानाधिष्ठित ज्ञानाची पहाट नुकतीच होऊ लागली होती. समाजक्रांतिकारकाचा सूड घेण्याची इच्छा त्या कल्पनांवरच पोट असणार्‍या पुरोहित-प्रस्थापित वर्गाला झाली, त्यात नवल नव्हते; परंतु पाश्चात्त्य विद्येचे-मानवी मूल्यांचे-समानतेच्या तत्त्वाचे रोपटे रुजून त्याचा वटवृक्ष झालेला असतानाच्या काळात केवळ समाजाचे भले एवढाच हेतू ठेवून धर्मचिकित्सा करणार्‍याचा जीव घेण्याची इच्छा त्याच पोथीनिष्ठांना होणे याचा अर्थ काय? अजूनही अर्थहीन कर्मकांडात गुरफटलेल्या धर्मकल्पनांच्या, उच्च-नीचतेच्या जाणिवा बोथट झालेल्या नाहीत, हाच याचा अर्थ. कथित सुशिक्षितांमध्ये त्या जाणिवा अधिक टोकदार, अधिक प्रखर झाल्या आहेत, हाच याचा अर्थ.

जोतिबांनी महार-मांगांच्या मुलींसाठी 1848 पासून शाळा काढल्याने शिकवायला जाणार्‍या सावित्रीबाईंच्या अंगावर प्रस्थापितांनी खल-दगडांचा वर्षाव केला; पण त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला नाही. ते समाजाच्या धार्मिक शोषणाकडे वळले; मात्र या प्रस्थापित वर्गाने त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. खुळचट धार्मिक कल्पना मनात भरवून पुरोहितवर्ग अज्ञानी, अशिक्षित वर्गाचे कसे शोषण करतो आहे, याचे वर्णन जोतिबांनी 'तृतीय नेत्र' या आपल्या छोटेखानी नाटकामध्ये 1855 मध्ये केले; मात्र त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्यांच्यावर हल्ला झाला.

जोतिबांचे काम विसाव्या शतकात पुढे चालू ठेवणार्‍या दाभोलकरांची अवस्था काही वेगळी नव्हती. त्यांच्या अंधश्रद्धांविरोधातील लढ्याला धर्ममार्तंडांचा विरोध होत होता; मात्र दाभोलकरांचे प्रहार अधिक खोलवर, धर्मरूढींना अधिक आव्हान देणारे होऊ लागले, तेव्हा आपल्या हितसंबंधांवर घाला घातला जाऊ लागल्याने प्रस्थापित अस्वस्थ होऊ लागले. 'धार्मिकतेच्या कच्च्या मालावर धर्मविद्वेषाची, धर्ममांधतेची प्रक्रिया केली की, मतपेटीतून सत्तेचा पक्का माल बाहेर येतो,' असा त्यांनी झगझगीत प्रकाशझोत टाकला. 'धर्माचं सांस्कृतिकीकरण केलं जातयं अन् सांस्कृतिक राष्ट्रवाद आणला जातोय,' असे ठाशीवपणाने हे नवे जोतिबा मांडत राहिले अन् त्यातून त्यांच्या विरोधातला राग भडकत गेल्याचे दिसून आले.

बुवाबाजीविरोधातील डॉक्टरांच्या मोहिमांमुळे त्या त्या बाबांचा भक्तसंप्रदाय नाराज होई, पण समानमनाचा त्याला पाठिंबाच मिळत असे. पुढे डॉक्टर धर्माची कडक चिकित्साही करू लागल्यामुळे सनातन्यांमध्ये अस्वस्थता पसरली. ज्या समाजात धार्मिक, जातीय अस्मिता टोकदार, बळकट, धारदार करण्याचा कार्यक्रम होतो, त्या समाजात अंधश्रद्धा दूर करणं अवघड असतं, असे ते निदर्शनाला आणू लागले. जसजसा काळ पुढे चालला होता, तसतशी डॉक्टरांची धर्मचिकित्सा अधिक प्रखर, प्रभावी होत होती. दाभोलकर सांगू लागले, 'धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वात बदल करण्याचा अधिकार संसदेलाही नाही; पण धर्माचं जमातीकरण करणं अन् सांस्कृतिक राष्ट्रवाद वाढवणं सुरू आहे'.

अन् 2013 मधील 20 ऑगस्टचा दिवस उगवला. या दिवशी एकशेसाठ वर्षांच्या प्रबोधनाची, परिवर्तनाची चळवळ स्तब्ध झाली. महात्मा फुल्यांनी बुद्धिप्रामाण्यतेचे-चिकित्सेचे रोपटे लावले. दलितांमध्ये प्रखर स्फुल्लिंग पेरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या रोपट्याचे संगोपन केले. लोकहितवादी, गोपाळ गणेश आगरकर, राजारामशास्त्री भागवत, राजा राममोहन रॉय, बाळशास्त्री जांभेकर, महादेव गोविंद रानडे, बाबा पद्मनजी, डॉ. रामकृष्ण भांडारकर, शाहू महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील, भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे आदींमुळे त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला.

जुन्या धर्माला आधुनिक काळानुसार प्रवाही, अर्थपूर्ण, मानवहितकारी, स्नेहाद्र रूप देण्याची फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीपासून सुरू झालेली प्रक्रिया अधिक परिपक्व होत असल्याचा विश्वास येऊ लागला होता. याचवेळी दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यात आल्याने दीडशे वर्षांतील सत्यशोधकी हजारो ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम मातीमोल झाले. पुरोगामित्वाची बिरुदे मिरवणारा-विचारमंथनात देशाचे नेतृत्व करणारा महाराष्ट्र एकशेसाठ वर्षे मागे गेला. महाराष्ट्रजनांमध्ये केवळ बाह्य वागणुकीत आधुनिकता आली; पण मनोवृत्ती तशीच कर्मठ, सनातनी व हिंसक राहिल्याचे व आपण अजूनही 1840 च्या वातावरणातच रेंगाळत असल्याचे त्यामुळे सिद्ध झाले.

युरोपात विज्ञान युग आल्यानंतर त्या देशांत अनेक शतके वैचारिक घुसळण झाली, तशी आपल्याकडे झाली नाही. 'धर्मग्रंथांत काहीही असले तरी मला पटेल तेच मी मानेन,' असे म्हणणार्‍या रॉजर बेकनला वीस वर्षांची शिक्षा झाली. पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणणार्‍या ब्रूनोला जिवंत जाळण्यात आले. गॅलिलिओला जन्मठेप झाली. भारतात वैज्ञानिक द़ृष्टिकोन आला; पण तो उपरा आला. वैज्ञानिक द़ृष्टिकोनाची शोधकता आली; पण निर्भयता आणि कृतिशीलता यांचा संबंध आला नाही. अंधश्रद्धेवर प्रहार करणे अशक्य मानले जाऊ लागले.

या सरंजामी, बुरसटलेल्या, झापडबंद, पोथीनिष्ठ, सनातनी प्रवृत्तींना एक ढळढळीत सत्य समजलेले नाही आणि ते म्हणजे एखाद्या व्यक्तीला ठार करून त्याचे विचार मरत नाहीत. युरोपप्रमाणे प्रबोधनाच्या घुसळणीनंतर विवेकाचे, सामंजस्याचे, बंधुभावाचे, समानतेचे नवनीत बाहेर पडणार असेल तर हौतात्म्यासाठीही शेकडो दाभोलकर तयार होत आहेत. अंतिम विजय मात्र झुंडशाहीचा, धर्मांधतेचा, संकुचिततेचा नसेल, तर तो मानवतेचा, समानतेचा, न्यायाचा, धर्मनिरपेक्ष तत्त्वांचा असेल.

SCROLL FOR NEXT