Latest

‘डीपफेक’ची धूळफेक

Arun Patil

लोकसभा निवडणुकांच्या तिसर्‍या टप्प्यातील प्रचाराचा धुरळा रविवारी सायंकाळी खाली बसला. देशात सरकार कोणाचे येणार हे ठरवण्यासाठी प्रत्येक टप्पा जसा महत्त्वाचा आहे, त्यातही या तिसर्‍या टप्प्यातील बारा राज्ये आणि चौर्‍यान्नव जागा महत्वाच्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांचे राजकीय बळ जोखणार्‍या निवडणुकीला तयार झालेली पार्श्वभूमी हवा तापवणारी ठरली. अयोध्येतील राम मंदिर, विद्यमान सरकारने घेतलेले धाडसी निर्णय, विकासाचे लक्ष्य आणि पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा, त्याचबरोबर विरोधकांनी इंडिया आघाडीच्या माध्यमातून निर्माण केलेले आव्हान यामुळे निवडणूक वादळी ठरते आहे.

मणिपूरमधील काही स्त्रियांना विवस्त्र करून मारहाण करण्यात आली, याचे व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाले, तेव्हा देशभर खळबळ माजली. विरोधी पक्षांनी त्यावरून केवळ मणिपूर सरकारलाच नव्हे, तर केंद्र सरकारलाही कोंडीत पकडले; परंतु पश्चिम बंगालमध्ये संदेशखाली येथे महिलांवर अत्याचार झाले, त्यामागील आरोपी तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेखचा चेहरा पुढे आला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न तृणमूलने केला, तेव्हा त्याबद्दल मात्र अन्य विरोधी पक्षांनी तोंडावर पट्टी बांधली. संदेशखालीचेही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरच त्याचे गांभीर्य लोकांच्या लक्षात आले. कर्नाटकातील माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू आणि जनता दल सेक्युलरचे लोकसभेतील उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांच्याशी संबंधित असलेल्या सेक्सकांडाच्या प्रकरणाची चर्चा व्हिडीओ व समाजमाध्यमातून प्रसारित झाल्यानंतरच आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. समाजमाध्यमांवरील तीन हजार आक्षेपार्ह ध्वनिफिती आणि छायाचित्रांच्या प्रकरणी रेवण्णांविरोधात लैंगिक शोषणचा गुन्हा दाखल झाला.

कर्नाटक सरकारने विशेष चौकशी पथकही स्थापन केले. त्यांच्या विरोधात 'लुकआऊट'ची नोटीस दिली. आता एच. डी. रेवण्णा यांना अटक झाली आहे. एकीकडे भाजपला देशाचे संविधान बदलायचे आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी करत आहेत, तर दुसरीकडे दलित व आदिवासी समाजाचे आरक्षण काढून घेऊन, ते मुस्लिमांना देण्याची काँग्रेसची भूमिका आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने करत आहेत. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी काही पुरावे आणि मुद्देही दिले आहेत. निकालानंतर काँग्रेसला आतापर्यंतच्या सर्वात कमी जागा मिळतील, असा हल्लाबोलही पंतप्रधानांनी केला आहे. निवडणुकांवेळी वेगवेगळे राजकीय पक्ष आणि नेते एकमेकांवर शरसंधान साधतात; परंतु आता यासाठी 'डीपफेक'सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, हे अधिक गंभीर आहे.

आरक्षण हटवणार असल्यासंबंधीचा खोटा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. धार्मिक आधारावर मुस्लिमांसाठी असलेले आरक्षण काढून टाकण्यासंबंधी मी बोलत होतो. प्रत्यक्षात सर्वच आरक्षणे काढण्यासाठी मी बोलत असल्याचा व्हिडीओ डीपफेक तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केला गेला, असा आरोप शहा यांनी केला. तेलंगणामध्ये झालेल्या सभेत शहा यांनी धार्मिक कारणांसाठी मुस्लिमांसाठी दिले जाणारे सर्व आरक्षण रद्द करू, असे सांगितले होते. प्रत्यक्षात, आम्ही सर्वांचीच आरक्षणे रद्द करू, असे शहा सांगत असल्याचे संबंधित क्लिपमध्ये भासवले गेले, असा आरोप आहे.

बनावट व्हिडीओ क्लीप प्रसारित केल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी काँग्रेस सदस्य अरुण रेड्डी यांना अटक केली. रेड्डी हे 'एक्स'वर 'स्पिरीट ऑफ काँग्रेस' हे खाते हाताळतात. शहा यांचा डीपफेक व्हिडीओ शेअर केला म्हणून झारखंड काँग्रेसच्या एक्स अकाऊंटवर कारवाई केली गेली. तसेच या संदर्भात काँग्रेसच्या समाजमाध्यम विभागाच्या पदाधिकार्‍यांना नोटीसही बजावण्यात आली. या संदर्भात झारखंड काँग्रेसचे प्रमुख राजेश ठाकूर यांना नोटीस बजावल्यावर, ही हुकूमशाही असल्याचे उद्गार त्यांनी काढले. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि त्या राज्याच्या प्रदेश काँग्रेस समितीच्या सदस्यांनाही या प्रकरणात नोटीस बजावली गेली. बनावट व्हिडीओ अपलोड करणे आणि शेअर करणे हा गुन्हाच आहे. याबाबत उत्तर प्रदेश, राजस्थान व मध्य प्रदेश राज्यांतील काही राजकीय पक्षांचे 22 नेते व कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या आहेत.

आश्चर्याची बाब म्हणजे, या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल युनिटच्या 'इंटेलिजन्स फ्युजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स' या विभागासमोर नोटिसा बजावलेल्यांपैकी एकही सदस्य हजर झालेला नाही. कोणी ना कोणी तरी या बनावट व्हिडीओंचा प्रसार केला आहे, हे नक्की. जेव्हा यशाबद्दल आत्मविश्वास नसतो, तेव्हा असल्या क्लृप्त्या योजल्या जातात. कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच डीपफेक तंत्रज्ञान ही आधुनिक युगाची देणगी असली तरी विकृती पसरवण्यासाठी आणि कोणाची तरी बदनामी करण्यासाठी त्याचा वापर ही आणखी चिंताजनक बाब आहे. 'माझे असे अनेक गमतीदार व्हिडीओ तयार केले असून, त्यामधून तरुण पिढीची सृजनशक्ती पाहायला मिळाली; परंतु त्याचवेळी डीपफेकचा गैरवापरही होऊ शकतो,' असा इशारा मध्यंतरी एका जाहीर कार्यक्रमात मोदी यांनी दिला होता. आज शहा यांना याचा फटका बसला; परंतु उद्या काँग्रेस, तृणमूल, आम आदमी पक्ष, तेलुगू देसम, बिजू जनता दल अशा कोणत्याही पक्षाला तो बसू शकतो.

मूळ संदर्भ बाजूला सारून वा तोडून माहिती देणे, खर्‍या माहितीत चुकीच्या संदर्भाची भेसळ करणे, ती तिखटमीठ लावून सादर करणे, गैरसोयीची माहिती लपवून केवळ सोयीची माहिती तेवढी सादर करणे, चेहरे बदलणे यांसारख्या विकृत गोष्टी डीपफेकमुळे साध्य होऊ शकतात. फोटो, व्हिडीओ किंवा ऑडिओ क्लिपमध्ये अशा प्रकारची छेडछाड करता येते. एवढेच नव्हे, तर 'एआय'मुळे कोणाच्याही आवाजाचा गैरवापर करून घेता येतो. डीपफेकमुळे व्यक्तीची बदनामी करून तिला आयुष्यातून उठवणेही शक्य होते. त्यामधून चारित्र्यहनन करता येते. तसेच दंगलीही घडवता येतात. समाजविघातक प्रवृत्तींना खर्‍याचे खोटे करणारे हे तंत्रज्ञान म्हणजे सुसंधीच वाटत असेल; मात्र राजकीय पक्षांनी तरी या बनावटगिरीपासून चार हात दूर राहिले पाहिजे. या तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखताना, समाजाचे या विघातक प्रवृत्तींपासून संरक्षण करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे.

SCROLL FOR NEXT