काँग्रेसला सत्ता मिळालेल्या हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेला पेच सोडविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आणि मुख्यमंत्रिपदी सुखविंदर सुक्खू यांची निवड होऊन त्यांचा शपथविधीही पार पडला. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी अपेक्षेप्रमाणे भूपेंद्र पटेल यांची फेरनिवड झाली. या दोन्ही राज्यांतील विधानसभांमध्ये म्हटले तर अपेक्षित, म्हटले तर अनपेक्षित निकाल लागले. अपेक्षित अशा अर्थाने की, गुजरातमध्ये भाजप जिंकण्याबाबत कुणाच्याही मनात शंका नव्हती आणि हिमाचलमध्ये दर पाच वर्षांनी सत्ताबदल होत असतो. अनपेक्षित अशा अर्थाने की, काँग्रेस नेतृत्वाने फारसा जोर न लावताही हिमाचल प्रदेशची सत्ता मिळाली आणि गुजरातमध्ये भाजपला अपेक्षेहून मोठे यश मिळतानाच काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळू नये, एवढी वाताहत या पक्षाची झाली. हिमाचलमध्ये मुख्यमंत्री निवडीवरून राजकारण तापले. गुजरातमध्ये मुख्यमंत्री निवडीचा काहीच प्रश्न नव्हता. तिथे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या नेहमीच्या शैलीप्रमाणे काही धक्कातंत्राचा वापर करतात का, एवढेच कुतूहल होते; परंतु तसे काही झालेले नाही.
भूपेंद्र पटेल यांनाच तिथे पुन्हा संधी देण्यात आली आहे. अर्थात, त्याचीही काही ठोस कारणे आहेत. माधवसिंह सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली 1985 साली काँग्रेसने 149 जागा मिळवल्या होत्या. तो विक्रम मोडण्याचे स्वप्न भारतीय जनता पक्षाकडून पाहिले जात होते; परंतु आजवरच्या सहा निवडणुकांमध्ये ते शक्य झाले नव्हते. यावेळची सातवी निवडणूक असल्यामुळे प्रस्थापितविरोधी वातावरणाचा फटका बसण्याचा धोका होता. त्यासाठी निवडणुकीआधी बरेच बदल करून नव्या चेहर्यांना संधी दिली होती. उमेदवारी देतानाही अनेकदिग्गजांना घरी बसवले होते.
निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदी यांनी विक्रमी विजय मिळवण्याचे आवाहन करताना, 'नरेंद्रचा विक्रम भूपेंद्र मोडेल आणि त्यासाठी नरेंद्र प्रचंड मेहनत करील', अशी ग्वाही दिली होती. मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे खरोखर विक्रम मोडला, त्यामुळे भूपेंद्र पटेल यांना संधी देताना संभ्रम निर्माण झाला नसावा. भाजपला प्रचंड यश मिळाल्यामुळे आणि विधानसभेत विरोधकांचे संख्याबळ तुलनेने नगण्य असल्यामुळे कारभार करणे सोपे जाणार आहे. बहुमत मोठे असल्यामुळे लोकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. मानव विकास अहवालाबरोबरच पिछाडीवर असलेल्या अनेक गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची संधीही गुजरातच्या नव्या सरकारपुढे आहे.
काँग्रेसच्या खात्यामध्ये राजस्थान आणि छत्तीसगडपाठोपाठ हिमाचल प्रदेशाच्या रूपाने तिसर्या राज्याची भर पडली आहे. सत्ता मिळाल्यानंतरही नेतृत्वाच्या रस्सीखेचीमुळे पक्षापुढे संकट निर्माण झाले होते आणि त्यातून मार्ग काढण्याचे आव्हान काँग्रेस नेतृत्वापुढे होते. रस्सीखेच आणि गटबाजीचा फायदा घेऊन भाजपकडून फूट पाडण्याचे प्रयत्न केले जाण्याची भीती होती. हिमाचलचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांच्या पत्नी श्रीमती प्रतिभा सिंह या सुरुवातीपासून मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार होत्या.
हिमाचलच्या जनतेने पक्षभेद विसरून वीरभद्र सिंह यांच्यासाठी काँग्रेसला मतदान केल्याचा दावा त्या करीत होत्या. याव्यतिरिक्त निवडणूक प्रचारप्रमुख सुखविंदर सुक्खू आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री हेही मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते. या गटबाजीचा फायदा भाजपने घेऊ नये, यासाठीही काँग्रेसने सुरुवातीपासून व्यूहरचना आखली होती. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडे सूत्रे सोपविली होती. अखेर सुखविंदर सुक्खू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 68 सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसच्या 40 सदस्यांपैकी निम्म्याहून अधिक सदस्यांचा पाठिंबा हे, त्यांच्या निवडीचे प्रमुख कारण सांगितले जाते.
सुक्खू हे हमीरपूर जिल्ह्याचे रहिवासी आहेत आणि माजी मुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते प्रेमकुमार धूमल तसेच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर याच जिल्ह्यातील रहिवासी असतानाही येथील पाचपैकी चार जागा काँग्रेसने जिंकल्या. शिवाय पाचवी जागाही काँग्रेसच्या बंडखोरालाच मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या प्रतिभा सिंह आणि मुकेश अग्निहोत्री हे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या छायेत वाढले आहेत, त्यांची स्वतंत्र ओळख नाही. याउलट सुक्खू हे स्वयंभू नेते असून, त्यांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतून संघर्ष करीत पुढे येत राजकारणात स्थान निर्माण केले आहे. अलीकडच्या काळात हिमाचलच्या राजकारणात 'फायरब्रॅंड नेते' म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे.
ते भविष्यात भाजपविरोधात आक्रमकपणे लढू शकतील, अशा विचारातून काँग्रेसने त्यांना संधी दिलेली दिसते. सुक्खू यांचा हमीरपूर जिल्हा हा राजधानी सिमल्याहून वेगळे क्षेत्र असले तरी विद्यार्थीदशेपासून राजकारणात सक्रिय असल्यामुळे त्यांच्यासाठी सिमला अनोळखी नाही. चार दशके त्यांनी काँग्रेस पक्षात सर्व पातळ्यांवर काम केले आहे. राहुल गांधी यांच्या प्रारंभीच्या टीममधील सदस्यांपैकी ते एक आहेत. प्रतिभा सिंह यांच्याकडे सूत्रे दिली असती तर पुन्हा एकदा काँग्रेसवर घराणेशाहीचा तसेच राजघराणेकेंद्रित राजकारण केल्याचा आरोप झाला असता. सुक्खू यांच्यासारख्या तळागाळातून आलेल्या कार्यकर्त्याला संधी देऊन काँग्रेसने एक वेगळा संदेशही दिला आहे.
मुख्यमंत्रिपदाचे दुसरे दावेदार मुकेश अग्निहोत्री यांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रतिभा सिंह यांच्याकडे केंद्रीय संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्याबरोबरच त्यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांना मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते देण्यात येणार आहे. एकूण काँग्रेसने यापूर्वीच्या घडामोडींपासून धडा घेऊन हिमाचलचा तिढा काळजीपूर्वक सोडविण्यात यश मिळवले. राजकारणात जातीय समीकरणे महत्त्वाची असतात. सुक्खू हे ठाकूर-राजपूत समुदायाचे प्रतिनिधित्व करतात आणि या समुदायाची लोकसंख्या एक तृतीयांश आहे. हिमाचलच्या राजकारणात या समुदायाने सातत्याने वीरभद्र सिंह यांची पाठराखण केल्यामुळे जातीय संतुलनही राखले गेले आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे आव्हान काँग्रेस सरकारपुढे असेल.