Latest

पीएसआय भरती गैरव्यवहार प्रकरण : ब्लू टूथद्वारे सांगितली उत्तरे

Arun Patil

बंगळूर ; पुढारी वृत्तसेवा : पोलिस उपनिरीक्षक पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत गैरव्यवहारप्रकरणी (PSI Exam Scam) सीआयडीकडून कसून तपास सुरू आहे. या प्रकरणाच्या सूत्रधाराने उमेदवारांना ब्लू टूथद्वारे प्रश्‍नांची उत्तरे सांगितल्याचे उघडकीस आले आहे.

परीक्षेआधी प्रश्‍नपत्रिका फुटल्याचे तपासावेळी दिसून आले. त्या प्रश्‍नपत्रिकेतील उत्तरे सूत्रधाराने शोधली. आधीच या कामासाठी पैसे घेतलेल्या उमेदवारांना ती उत्तरे ब्लू टूथद्वारे सांगितली. सीआयडी अधिकार्‍यांनी अटकेतील संशयितांची कसून चौकशी केली. त्यानंतर संबंधित ठिकाणी छापे घातले. त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक उपकरणे सापडली. काही एटीएमही सापडले.

इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या आधारे उत्तरे पोहोचवण्यात आले. वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्‍न विचारण्यात आले होते. त्या प्रश्‍नांसाठी चार पर्याय देण्यात आले होते. त्याची उत्तरे सूत्रधाराने उमेदवारांना सांगितली. एक दिवस आधी काँग्रेस आमदार प्रियांक खर्गे यांनी उमेदवार आणि एजंट यांच्यातील संभाषणाचा ऑडिओ जाहीर केला होता. (PSI Exam Scam)

आता सूत्रधाराकडून उमेदवारांना उत्तरे सांगतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सीआयडीकडून या प्रकरणात अडकलेल्यांची कसून चौकशी केली जात आहे. अटक केलेल्या संशयितांकडून इतरांची नावे उघड झाल्यास आणखी माहिती उघड होणार आहे. संशयितांनी तोंड उघडले तर अटकेची भीती अनेकांना लागून आहे. इतर संशयितांच्या पायाखालची वाळू घसरली असून काहीजण अज्ञातस्थळी गेले आहेत.

SCROLL FOR NEXT