Latest

पुणे : सकल मराठा समाजाच्यावतीने सरकारचा निषेध

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार्‍या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे, राजेंद्र कुंजीर, तुषार काकडे, सचिन आडेकर, अनिल ताडगे, मयुर गुजर, प्रफुल्ल गुजर, संभाजी ब्रिगेडचे प्रशांत धुमाळ, श्रृतिका पाडळे, पुजा झोळे, ज्योती कोंडे, अमर पवार, किशोर मोरे, युवराज दिसले, गुलाबराव गायकवाड यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी आणि मराठा समाजातील बांधव उपस्थित होते.

यावेळी राजेंद्र कुंजीर म्हणाले की, राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने लाखोंच्या संख्येचे 53 मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्चांची दखल जगाने घेतली. सध्याच्या राज्य सरकार मधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तमाम मराठा समाजाची माफी मागावी आणि संबधित पोलीस अधिकार्‍यांवर निलंबनाची कार्यवाही करावी. गृहमंत्र्यांनी याची जबाबदारी स्विकारुन त्वरीत राजीनामा द्यावा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा या दोघांनी सत्तेतून बाहेर पडावे. मराठा समाजाच्या मागणीला वेगळे वळण लावण्याचे काम सरकारच करीत आहे.

कोंढरे म्हणाले, जालना येथे झालेली घटना दुदैवी आहे. शांततेच्या मार्गाने चालू असलेल्या आंदोलनावर दडपशाही करणे चुकीचे असून याची चौकशी सरकारने त्वरीत करावी. संबंधित पोलिस अधिकार्‍याची ही चौकशी व्हावी. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन गावातील पोलिस बंदोबस्त हटवावा अन्यथा पुन्हा संघर्ष होऊ शकतो. मुख्यमंत्री उमुख्यमंत्र्यांसह सर्वांनी स्वतः जालनामध्ये जाऊन आंदोलकांबरोबर चर्चा करावी.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT