Latest

Stray Dog : भटक्या कुत्र्यांना पकडणार्‍या मनपा कर्मचार्‍यांना विरोध

Shambhuraj Pachindre

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरात भटकी कुत्री जीवघेणे हल्ले करत आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष, संघटना आणि नागरिकांतून महापालिकेविरोधात रोष निर्माण होत आहे. परिणामी, महापालिकेने शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे; मात्र भटकी कुत्री पकडताना कनाननगर येथे काही महिलांनी कर्मचार्‍यांना तीव— विरोध केला. अशाप्रकारे विरोध होऊ लागल्यावर भटक्या कुत्र्यांवर कारवाई करायची कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Stray Dog)

एकवीस वर्षांच्या तरुणीचा भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीज होऊन मृत्यू झाल्याने विविध राजकीय पक्ष, संघटना महापालिकेवर मोर्चे, आंदोलन, निदर्शने करून महानगरपालिका अधिकार्‍यांना धारेवर धरत आहेत. त्यामुळे अधिकार्‍यांनी कठोर कारवाईसाठी पावले उचलली आहेत; मात्र कारवाईला नागरिकांकडूनच विरोध केला जात आहे. महापालिकेचे पथक कनाननगरमध्ये भटकी कुत्री पकडण्यासाठी गेले त्यावेळी काही कुटुंबांनी ही आमची पाळीव कुत्री असल्याचे सांगून कारवाईला विरोध केला. कुत्र्यांना स्वखर्चाने लस दिली आहे. ही कुत्री कुणाला चावत नाहीत, असे सांगून कर्मचार्‍यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाला. त्यामुळे कर्मचार्‍यांना माघारी फिरावे लागले. (Stray Dog)

प्रत्येक वॉर्डात अँटिरेबीज इंजेक्शनची सोय करा; बी वॉर्ड अन्याय निवारण समिती

शहरातील प्रत्येक वॉर्डात दक्षता केंद्र निर्माण करून त्याठिकाणी अँटिरेबीज इंजेक्शनची सोय करा, अशी मागणी बी वॉर्ड अन्याय निवारण समितीने अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे केली. कुत्री पकडण्यासाठी सक्षम आणि प्रशिक्षित कर्मचारी नियुक्ती करावेत, साधने द्यावीत, मोकाट कुत्र्यांसाठी शेल्टर तातडीने उभारावेत, भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी धडक मोहीम राबवावी, खाद्यपदार्थांच्या बेकायदेशीर गाड्या बंद कराव्यात आदी मागण्याही निवेदनात केल्या आहेत. शिष्टमंडळात जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, अध्यक्ष पद्माकर कापसे, डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, नितीन शेळके, अनिल कोळेकर, मुसा पटवेगार यांच्यासह इतरांचा समावेश होता.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT