ओतूर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: देशात यंदा कांदा लागवडीखालील क्षेत्र ६४ हजार हेक्टरने घटले आहे. उन्हाळी कांद्याचे उत्पादन २२ लाख टनांनी घटले आहे. प्रती हेक्टर उत्पादन क्षमताही नैसर्गिक कारणांमुळे घटली आहे. मात्र तरीही बाजारभावात सुधारणा होत नाही, ही शोकांतिका आहे, अशी खंत राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पानसरे यांनी व्यक्त केली.
कांद्याच्या असमाधानकारक भावाबद्दल पानसरे यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी केंद्र व राज्य सरकारांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. उन्हाळी कांद्याची लागवड एकट्या महाराष्ट्रात ४२ हजार हेक्टरने घटली आहे. काही वर्षांपासून कांद्याला मिळणाऱ्या मातीमोल बाजारभावामुळे शेतकरी अन्य पिकांकडे वळल्याचे निदर्शनास येत आहे. निसर्गाचा लहरीपणा, अवकाळी पाऊस, गारपीट, उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ, मजूरांकडून कांदा उत्पादकांची अडवणूक, असमाधानकारक बाजारभाव आदींमुळे कांदा उत्पादक मेटाकुटीला आला आहे. राज्य सरकारने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल ३५० रूपये अनुदान जाहीर केले आहे. त्याची व्याप्ती व मुदत वाढवून मे महिनाखेरपर्यंत करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
काही वर्षांपासून देशांतर्गत कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नाहीत. केंद्राकडून कांदा निर्यातीस प्रोत्साहनासाठी योग्य योजना आखल्या जात नाहीत. यामुळे कांदा उत्पादकांमध्ये नाराजी आहे. नाफेडचा दुधारी शस्त्रासारखा वापर करून घेतला जात आहे. शेतकऱ्यांकडून कमी दराने कांदा खरेदी करायचा आणि थोडेफार दर वाढले तर लगेच तोच कांदा पुन्हा बाजारात आणून कांद्याचे बाजारभाव नियंत्रीत करायचे असा प्रकार चालू आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. खराब हवामानामुळे कांदा चाळीतही सडून चालल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आल्याचे पानसरे यांनी पत्रात म्हटले आहे.