Latest

चिनी एकाधिकारशाहीचे ‘कुटिल उद्योग’

backup backup

हेमंत महाजन, ब्रिगेडियर (निवृत्त)

जगभरातील उद्योजकांसाठी, गुंतवणूकदारांसाठी सोयीसुविधांच्या पायघड्या घालणार्‍या चीनमध्ये अब्जाधीशांचे, धनाढ्य उद्योगपतींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. सध्या बाओ फॅन या चीनमधील एका अब्जाधीशाच्या बेपत्ता होण्याच्या वृत्ताने जागतिक पटलावर खळबळ उडवून दिली आहे.

बाओ फॅन हे चीनमधील हायप्रोफाईल बँकर आहेत. खासगी उद्योगांकडे किंवा उद्योजकांच्या हाती अधिक मालमत्ता असून नये, अशी चीन सरकारची भूमिका आहे. शी जीनपिंग याला मोठा धोका समजतात. यामुळे गेल्या काही वर्षांपासून चीनमधील उद्योजकांची मालमत्ता जप्त करण्याचे आणि त्यांना अटक होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. चीनमधील शी जीनपिंग यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात तेथील जनतेमध्ये किती तीव्र असंतोष आहे, ही बाब काही महिन्यांपूर्वी 'झिरो कोव्हिड पॉलिसी' विरोधातील निदर्शनांदरम्यान दिसून आली होती.

कोरोना महामारी संपूर्ण जगात पसरवण्यास चीन आणि तेथील पीएलए सरकार कसे कारणीभूत आहे, याबाबत वुहानमधील विषाणू प्रयोगशाळेतील डॉक्टरांचे व्हिडीओ त्याकाळात व्हायरल झाले होते; परंतु काही दिवसांनी हे डॉक्टर बेपत्ता झाल्याचे किंवा त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे त्यानंतर चीनमधून अशा प्रकारचे व्हिडीओ अथवा माहिती येणेही आपसूकच थांबून गेले. चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अलिबाबा या ई-कॉमर्स कंपनीचे मालक जॅक मा बेपत्ता झाल्याचे प्रकरण दोन वर्षांपूर्वी जगभरात गाजले होते.

चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाविरोधात त्यांनी आवाज उठविला होता. चीनच्या कम्युनिस्ट राज्यकर्त्यांविरुद्ध आवाज उठविल्यानंतर कुणालाच न दिसलेल्या अनेक व्यक्ती आहेत. अनेक हाय प्रोफाईल लोक अशा प्रकारे गायब झाले आहेत. चित्रपट अभिनेत्री फॅन बिंगबिंग आणि जनुक बदलांच्या क्षेत्रातील शास्त्रज्ञ जियानकुई या बेपत्ता झाल्याचे वृत्तही मागील काळात खळबळ उडवून गेले होते.

सध्या बाओ फॅन या चीनमधील एका अब्जाधीशाच्या बेपत्ता होण्याच्या वृत्ताने जागतिक पटलावर खळबळ उडवून दिली आहे. बाओ फॅन हे चीनमधील हायप्रोफाईल बँकर आहेत. बाओ फॅन यांची कंपनी रेनसॉने हाँगकाँग स्टॉक एक्सचेंजला याची माहिती दिली आहे. कित्येक प्रयत्नांनंतरही बाओ यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. 52 वर्षीय बाओ फॅन हे गेल्या तीन-चार दिवसांपासून गायब आहेत, असे कंपनीने म्हटले आहे. हे वृत्त येताच कंपनीचे शेअर 50 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. बाओ यांच्या कंपनीचे अध्यक्ष कोंग लीन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यांचीही चौकशी करण्यात येत आहे.

चीनमध्ये कुठल्याही व्यावसायिकाची सरकारकडून चौकशी सुरू होताच तो व्यावसायिक अचानक गायब होतो, असे अनेकदा समोर आले आहे. बाओ हे चीनचे मोठे इन्व्हेस्टर बँकर आहेत. त्यांनी 2005 मध्ये चायना रेनसॉची सुरुवात केली होती. या कंपनीच्या मदतीने ते तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये डील घडवून आणतात. विशेषतः कंपन्यांमधील विलीनीकरणात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यांनी दीदी कॅब बुकिंग आणि कुएदीचे विलीनीकरण, फूड डिलिव्हरी अ‍ॅप मिशस आणि डायनपिंगच्या विलीनीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

याशिवाय त्यांनी जेडी डॉट कॉम या ई कॉमर्सचा आयपीओ आणण्याची मोठी जबाबदारी बजावली होती. त्यांच्या कंपनीने क्ट्रिप आणि क्युनारमध्ये समेट घडवून आणला होता. बाओ हे चीनमधील आघाडीचे ब्रोकरही आहेत. चायना रेनेसान्स ही कंपनी 2018 मध्ये हाँगकाँग स्टॉक एक्सचेंजच्या यादीत आली. वास्तविक त्यांनी ही कंपनी सुमारे 18 वर्षांपूर्वीच सुरू केली होती. फॅन यांच्याकडे या कंपनीचे 50 टक्क्यांहून अधिक समभाग आहेत.

एकामागून एक अब्जाधीश, उद्योजक आणि व्यावसायिक गायब होऊ लागल्यामुळे चीनमधील उद्योगवर्तुळात चिंतेचे वातावरण आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे चीन सरकारचे धोरण हे आहे. खासगी उद्योगांकडे किंवा उद्योजकांच्या हाती अधिक मालमत्ता असू नये, अशी चीन सरकारची भूमिका आहे. शी जीनपिंग याला मोठा धोका समजतात. यामुळे गेल्या काही वर्षांपासून चीनमधील उद्योजकांची मालमत्ता जप्त करण्याचे आणि त्यांना अटक होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. शी जीनपिंग यांनी 2012 मध्ये सत्तेत आल्यानंतर भ्रष्टाचाराविरोधी मोहीम राबवण्यास सुरुवात केली होती; पण आज या भ्रष्टाचारविरोधी कायद्यामुळे चीनच्या उद्योग जगतात भीतीदायक चित्र आहे.

जॅक मा यांचे उदाहरण पाहिल्यास त्यांनी चीनच्या आर्थिक नियामक आणि सरकारी बँकांवर टीका केली होती. त्यानंतर त्यांचा शी जीनपिंग यांच्यासोबतही वाद झाला होता. शांघायमध्ये केलेल्या एका भाषणामध्ये त्यांनी चीनमध्ये कोणतीही परिपक्व व्यवस्था नसल्याचे म्हटले होते. तसेच चिनी बँकिंग व्यवस्था व्याज खाणारी असल्याची टीका केली होती. त्यानंतर चीनच्या बाजार नियामकाने कारवाई करत अलिबाबा उद्योग समूहाविरुद्ध मत्तेदारीविरोधी तपास सुरू करत अँट ग्रुपचा आयपीओ थांबवला. एक काळ असा होता जेव्हा देश-विदेशामध्ये जॅक मा आणि अलिबाबाचे वर्चस्व होते.

जॅक मा, बाओ फॅन यांच्या आधी 2015 मध्ये 'फोसून इंटरनॅशनल'चे अध्यक्ष अब्जाधीश गुओ गुआंगचांग असेच बेपत्ता झाले. काही दिवसांनंतर ते सर्वांसमोर आले. 2017 मध्ये चीनचे अब्जाधीश उद्योगपती जिओ जियानहुआ हाँगकाँगमधून बेपत्ता झाले होते. त्यांना चीनचे वॉरेन बफेट म्हणून ओळखले जायचे. जिओंना त्यांच्या हॉटेलमधून चिनी सुरक्षा एजंटांनी उचलले होते. पाच वर्षांनंतर ते चीनमध्ये असल्याची बातमी आली. सरकारने त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 13 वर्षांची शिक्षा सुनावली आणि 66 हजार कोटींचा दंडही ठोठावला. 2020 मध्ये चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग यांचा जोकर असा उल्लेख केल्याने रेन झिकियांग काही महिन्यांसाठी गायब झाले होते.

रिअल इस्टेट एजंटर असलेले झिकियांग यांनी कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याने चीन सरकारवर टीका केली होती. इतेकच नव्हे तर त्यांनी चीन सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोपही केला होता; पण त्यानंतर त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले आणि त्यांंना 18 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. 10 फेब्रुवारी 2023 रोजी सीजेन ग्रुपचे अध्यक्ष क्यू देजून गायब झाल्याची बातमी आली होती. तेदेखील बाओंप्रमाणे अद्यापही बेपत्ता आहेत. जागतिक आर्थिक महासत्ता बनण्याची जबरदस्त महत्त्वाकांक्षा घेऊन वाटचाल करणार्‍या चीनमध्ये जर उद्योगपतींना, धनश्रीमंतांना अशा प्रकारच्या दबावाचा सामना करावा लागत असेल, तर ते निश्चितच निषेधार्ह आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT