Latest

पंतप्रधान ऋषी सुनाक बनले इमिग्रेशन अधिकारी

Arun Patil

लंडन, वृत्तसंस्था : भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांनी इमिग्रेशन अधिकारी म्हणून एक दिवस काम केले. ब्रिटनमध्ये बेकायदा घुसखोरी करणार्‍या अन्य देशांच्या लोकांच्या विरोधात सर्च ऑपरेशन राबविले. या मोहिमेवेळी 20 देशांतील 105 नागरिकांना अटक केली. इमिग्रेशन अधिकारी बनल्याची माहिती खुद्द सुनाक यांनी सोशल मीडियावरून दिली.

ऑपरेशनदरम्यान सुनाक यांनी बुलेटप्रुफ जॅकेट घातले होते. पंतप्रधान ऋषी सुनाक यांनी अन्य अधिकार्‍यांसमवेत उत्तर लंडनमधील ब्रेंट परिसरात बेकायदा राहणार्‍या अनिवासींच्या ठिकाणावर छापेमारी केली. वेगवेगळ्या माध्यमातून ब्रिटनमध्ये घुसणार्‍या अनिवासी नागरिकांविरोधात कारवाई करणे हा सुनाक सरकारचा निवडणूक अजेंडा आहे. सुनाक म्हणाले, एक दिवस इमिग्रेशन अधिकार्‍यांसमवेत काम करून बेकायदा घुसखोरी करणार्‍या अनिवासी नागरिकांवर कारवाई करून दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. ब्रिटनमध्ये कोणी राहावे याचा निर्णय सरकार घेईल. कोणत्याही गुन्हेगाराला ब्रिटनमध्ये घुसखोरी केली जाऊ देणार नाही.

इमिग्रेशन विभागाने मोटारी साफ करण्याची ठिकाणे, केशकर्तनालये आणि रेस्टारंटसह 157 ठिकाणी छापे मारले. यावेळी बेकायदेशीररीत्या ब्रिटनमध्ये घुसून काम करणार्‍या नागरिकांना पकडण्यात आले.

SCROLL FOR NEXT