Latest

New Parliament Building Inauguration : नूतन संसद भवनाचे रविवारी उद्घाटन; विरोधकांचा बहिष्कार

backup backup

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन (New Parliament Building Inauguration) येत्या रविवारी (28 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. संसदेची नवीन वास्तू देशाचा इतिहास, सांस्कृतिक वारसा, परंपरा तसेच सभ्यतेला आधुनिकेची जोड देण्याचा सुंदर प्रयत्न आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. 28 मे रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत पंतप्रधान ही वास्तू देशाला समर्पित करतील, असे त्यांनी सांगितले.

तसेच उद्घाटन कार्यक्रमावर राजकारण न करण्याचे आवाहनही विरोधी पक्षांना त्यांनी केले आहे. उद्घाटन कार्यक्रमात सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आल्याचेदेखील शहा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. (New Parliament Building Inauguration)

दरम्यान, काँग्रेस, तृणमूल, राजद, संयुक्त जद, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासह बहुतांश विरोधी पक्षांनी उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. हे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.

विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले आहे आणि त्यानुसार आम्हीही तसेच ठरविल्याची माहिती उद्धव ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी दिली. काँग्रेसही बहिष्काराच्या तयारीत काँग्रेसकडूनही बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने लवकरच एक संयुक्त निवेदन जारी केले जाऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. संसद भवनाच्या उद्घाटनास राष्ट्रपती मुर्मू यांना निमंत्रित न करून सरकारने त्यांचा अवमान केला आहे. हा देशातील आदिवासींचाही अपमान आहे, अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे खा. संजय सिंग यांनी व्यक्त केली.

लोकसभा व राज्यसभेबरोबर राष्ट्रपती हेही संसदेचे अविभाज्य भाग असतात. अशावेळी राष्ट्रपतींना उद्घाटनाचा मान न देणे घटनेच्या विरोधात आहे, असे मत भाकप नेते डी. राजा यांनी व्यक्त केले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीदेखील उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना न बोलावण्याच्या मुद्द्यावरून केंद्रावर सातत्याने टीका केली आहे.

ज्या दिवशी संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे, त्या दिवशी सावरकर जयंती आहे. यावरूनही विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला होता. यंदा त्यांची 140 वी जयंती साजरी केली जाणार आहे. याच दिवशी संसद भवनाचे उद्घाटन करणे हा निव्वळ योगायोग आहे की, हे सर्व सुनियोजित आहे, अशी टिपणी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली आहे.

'या' पक्षांनी घातला बहिष्कार

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेल्या पक्षांमध्ये राजद, संयुक्त जद, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप, माकप यांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : संसदेच्या नवीन वास्तूचा 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत पंतप्रधान ही वास्तू देशाला समर्पित करतील. विशेष म्हणजे, नवीन संसदेच्या भवनात ऐतिहासिक राजदंड (सेंगोल) ठेवला जाणार असून, यानिमित्ताने एक ऐतिहासिक परंपरा पुनर्जीवित केली जाणार असल्याचे शहा म्हणाले.
उद्घाटन कार्यक्रमात सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आल्याचेही शहा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले.
60 हजारांवर मजुरांचे योगदान संसदेची नवी इमारत विक्रमी वेळेत पूर्ण करण्यासाठी 60 हजारांहून अधिक मजुरांनी त्यांचे योगदान दिले आहे. उद्घाटन समारंभातून पंतप्रधानांच्या हस्ते त्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला जाईल.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पंतप्रधानांनी जे लक्ष्य निर्धारित केले होते, त्यातील एक लक्ष्य आपल्या ऐतिहासिक परंपरांचा सन्मान आणि पुनर्जागरणाचे आहे, असे शहा म्हणाले. शहा म्हणाले की, पंतप्रधानांच्या दूरदर्शितेची प्रचिती या नवीन संसद भवनाच्या वास्तूतून येते. संसदेच्या नवीन वास्तूत सेंगोल (राजदंड) ठेवला जाईल. सेंगोल हा सत्तांतरणाचे प्रतीक आहे. सेंगोल प्राप्त असलेल्यांकडून न्यायपूर्ण आणि निष्पक्ष शासनाची अपेक्षा केली जाते. अशात सेंगोलच्या स्थापनेसाठी देशाची संसद हेच सर्वात योग्य स्थान आहे. सेंगोल कुठल्याही संग्रहालयात ठेवणे योग्य ठरणार नाही. देशाला संसदेची इमारत समर्पित करताना पंतप्रधानांना तामिळनाडूतून आलेला सेंगोल प्रदान केला जाईल, असे शहा म्हणाले.

'संपदा' असा अर्थ असलेला सेंगोल हा एक तमिळ शब्द आहे. पंतप्रधानांना यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर याचा अभ्यास करण्यात आला. अभ्यासाअंती संसदेच्या उद्घाटन सोहळ्यातून सेंगोल देशासमोर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शहा म्हणाले.

काय आहे सेंगोल?

अध्यक्षांच्या आसनाजवळ पंतप्रधान 'सेंगोल' स्थापित करतील. हा एक ऐतिहासिक क्षण ठरेल. इंग्रजांकडून सत्ता हस्तांतरणाच्या रूपात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा सेंगोल स्वीकारला होता. आता हा सेंगोल नवीन संसद भावनात स्थापित केला जाईल.ॉ

हेही वाचा

SCROLL FOR NEXT