पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.१२) देशभरातील १० नवीन वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला. यात अहमदाबाद-मुंबई सेंट्रल, सिकंदराबाद-विशाखापट्टणम, म्हैसूर-डॉ. एमजीआर सेंट्रल (चेन्नई), पाटणा-लखनौ, न्यू जलपाईगुडी-पाटणा, पुरी-विशाखापट्टणम, लखनौ-डेहराडून, कलबुर्गी-सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळूर, रांची-वाराणसी, खजुराहो-दिल्ली (निजामुद्दीन) या वंदे भारत रेल्वेचा समावेश आहे. (Vande Bharat trains)
पंतप्रधान मोदी आज अहमदाबादमध्ये आहेत. तेथून त्यांनी आज १० नवीन वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधानांनी २०१० मध्ये दिल्ली ते वाराणसी या पहिल्या वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला होता. आता भारतीय रेल्वे नेटवर्कवर अशा एकूण ४१ रेल्वे कार्यरत आहेत.
अहमदाबाद येथून अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "भारत हा एक तरुणांचा देश आहे, येथे तरुणांची मोठी लोकसंख्या आहे. मी तरुणांना सांगू इच्छितो की आज जे उद्घाटन झाले ते तुमच्या वर्तमानासाठी आहे. आज झालेली पायाभरणी तुमच्या उज्वल भविष्याची हमी घेऊन आली आहे. स्वातंत्र्यानंतर आलेल्या सरकारांनी केवळ राजकीय स्वार्थाला प्राधान्य दिले. भारतीय रेल्वे याचा मोठा बळी ठरली. मी सर्वप्रथम रेल्वेचा समावेश सरकारच्या अर्थसंकल्पात केला होता. त्यामुळे सरकारचा निधी आता रेल्वेच्या विकासासाठी वापरला जातो.".
"हा दिवस इच्छाशक्तीचा जिवंत पुरावा आहे. देशातील तरुण ठरवतील त्यांना कोणत्या प्रकारचा देश आणि रेल्वे हवी आहे. हे १० वर्षांचे काम केवळ ट्रेलर आहे, मला तर आणखी पुढे जायचे आहे." असेही मोदी म्हणाले.
याआधी महाराष्ट्राला ७ वंदे भारत रेल्वे मिळाल्या आहेत. आता आणखी एक मिळाली आहे. रेल्वे स्थानकावर स्थानिकांना रोजगारासाठी प्राध्यान्य दिले जात असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यांनी महाराष्ट्राला वंदे भारत रेल्वे दिल्याबद्दल पीएम नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
अहमदाबाद-मुंबई मार्गावर दुसरी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सुरू होत आहे. अधिक माहितीनुसार, नवीन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे रविवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावेल. नवीन निळ्या आणि पांढऱ्या रंगाची रेल्वे AC चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारने सुसज्ज आहे आणि दोन्ही दिशांना वडोदरा, सुरत, वापी आणि बोरिवली स्टेशनवर ती थांबेल.
डिसेंबर २०२३ मध्ये पीएम मोदी यांनी ६ अतिरिक्त वंदे भारत गाड्यांचे उद्घाटन केले. यामध्ये कटरा ते नवी दिल्लीला जोडणारी दुसरी रेल्वे होती. इतर मार्गांमध्ये अमृतसर ते दिल्ली, कोईम्बतूर ते बंगळूर, मंगळूर ते मडगाव, जालना ते मुंबई आणि अयोध्या ते दिल्ली यांचा समावेश होता. दिल्ली आणि वाराणसी दरम्यानच्या दुसऱ्या रेल्वेचेही डिसेंबर २०२३ मध्ये उद्घाटन करण्यात आले होते. (Vande Bharat trains)
हे ही वाचा :