बनासकांठा (गुजरात) : वृत्तसंस्था : पहिल्यांदा मी जेव्हा लोकसभेच्या मैदानात उतरलो, तेव्हा हा तर एक चहावाला आहे, असे मला हिणवायला काँग्रेसने सुरुवात केली आणि बघा देशाने असे उत्तर दिले की, कधीकाळी चारशेवर जागा मिळविणारा हा पक्ष 40 वर आणून ठेवला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर प्रहार केला. बनासकांठा येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी झालेल्या सभेत ते बोलत होते.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, याच चहावाल्याला या निवडणुकीनंतर देशातील जनता चारसौ पार जागा निवडून देणार आहे आणि हा चहावाला आपल्या या महान देशाला 140 कोटी देशवासीयांच्या सहकार्याने जगातील तिसरी सर्वात बलाढ्य अर्थव्यवस्था करून दाखविणार आहे. गेल्या 10 वर्षांत त्यासाठीच्या पायाभूत सुविधा आपण विकसित केल्या आहेत. आजवरचे आमचे काम म्हणजे एक
ट्रेलर आहे. पिक्चर तर पुढे सुरू होईल. देशाचा नुसताच जीडीपी वाढणार नाही. दरडोई उत्पन्नही वाढणार आहे. कोट्यवधी लोक दारिद्य्ररेषेतून गेल्या 10 वर्षांत बाहेर आलेले आहेत. आगामी काळात संपूर्ण देशवासी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तुम्ही मला पहिल्यांदा दिल्लीची जबाबदारी दिली, त्यापूर्वीचे चित्र आठवून पाहा. दररोज दहशतवादी हल्ले, त्यातले दररोजचे निरपराधांचे मृत्यू, भ्रष्टाचार याशिवाय बातम्या कानावर पडत नव्हत्या. त्या विदारक स्थितीतून देशाला बाहेर काढण्याचा मी नेटाने आणि टोकाचा आणि प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून आता दररोज अटल बोगदा, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताची यशस्वी मोहीम, विक्रमी स्टार्टअप, भारत जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था इत्यादी, इत्यादी अशा सकारात्मक बातम्या तुम्ही वाचत आहात आणि त्या तुमच्या कानावर पडत आहेत, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
मोदी नकोत म्हणून मोहब्बतचे कथित दुकान चालवणार्यांनी आता कटकारस्थाने सुरू केलेली आहेत. डीपफेक तंत्र वापरून आमच्या तोंडून त्यांना हवी असलेली 'एससी/एसटींचे आरक्षण काढून घेऊ'सारखी वाक्ये टाकून बनावट व्हिडीओ बनविण्याचे उद्योग काँग्रेसने सुरू केलेले आहेत. मोहब्बतच्या या कथित दुकानातून बनावट मालाची विक्री सुरू आहे, अशी टीकाही पंतप्रधानांनी केली.
म्हणाले, 'अब की बार आम्ही जाणार चारसौ पार'
…आणि देशाला जगातील तिसरी सर्वात बलाढ्य अर्थव्यवस्था बनविणार