नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : तिरंगा महोत्सव ही एक चळवळ व्हावी. देशातील नागरिकांनी घरोघरी तिरंगा फडकवावा तसेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचे प्रोफाईल पिक्चर (डी.पी.) म्हणून तिरंग्याचे छायाचित्र लावावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना रविवारी केले.
मंगळवारी देशाचा 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या स्वागतासाठी रविवारपासूनच सज्जता सुरू झाली आहे. सर्वत्र चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटस्चे प्रोफाईल पिक्चर बदलून तिरंगा केले असून त्यांनी 'हर घर तिरंगा' अभियानात सहभागी होण्याचे आवाहन देशवासीयांना केले आहे. आपले प्रोफाईल पिक्चर बदलून आपला प्रिय देश आणि आपल्यातील बंध आणखी घट्ट करावेत, असेही ते म्हणाले. गेल्या वर्षी 22 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहीम सुरू केली होती. यंदा 13 ते 15 ऑगस्ट या काळात 'हर घर तिरंगा'
मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचा राष्ट्रध्वज हे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकतेचे प्रतीक आहे. देशवासीयांना 'हर घर तिरंगा डॉट कॉम' वेबसाईटवर फोटो अपलोड करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.