Latest

Lok Sabha Election 2024 : बेईमान बड्यांनी लुटलेला पैसा गरिबांना परत करणार

दिनेश चोरगे

मेरठ; वृत्तसंस्था : विरोधकांनी मिळून एक आयएनडीआय नावाची मोट बांधलेली आहे. देशातील विविध ठिकाणच्या कुटुंबांची मिळून ही मोट आहे. मोदी या इंडीला घाबरून जाईल, असे त्यांना वाटते. मी घाबरणार नाही. मी घाबरूच शकत नाही. कारण माझ्यासाठी संपूर्ण देश हेच माझे कुटुंब आहे. आज बडी बडी भ्रष्टाचारी धेंडे कारागृहांत आहेत. सर्वोच्च न्यायालयही त्यांना जामीन देत नाही. भ्रष्टाचाराच्या ठोस पुराव्यांशिवाय असे शक्य आहे काय? या बेईमानांनी जो पैसा लुटलेला आहे, तो परत मिळवून मी माझ्या भारतरूपी कुटुंबातील गरिबांना परत करणार आहे. 'न खाऊंगा, न खाने दूंगा' यावर मी आजन्म ठाम राहीन, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले.

लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील पंतप्रधानांची ही पहिलीच सभा होती. ते म्हणाले, गेल्या 10 वर्षांत विकासाचा ट्रेलर जनतेने पाहिलेला आहे. विकसित भारताचा पिक्चर अजून बाकी आहे. त्यामुळे लोकसभेची ही निवडणूक सरकार बनविण्यासाठी नाही, ती देश घडविण्यासाठी आहे, हे लक्षात घ्या. वृंदावनात राधा-कृष्ण होळीत रंगांची उधळण करतात हे तुम्ही पाहिलेले आहे. यावेळी तर अयोध्येत रामलल्लाही होळी खेळलेले आहेत. अशी बरीच परिवर्तने देश आणखी बघणार आहे.

कच्चाथिवू बेटाचा उल्लेख!

कच्चाथिवू बेटालगत आले म्हणून भारतीय मच्छीमारांना अटक केली जाते. एकेकाळचे हे आपलेच बेट काँग्रेस सरकारने
श्रीलंकेला गिफ्ट म्हणून देऊन टाकल्याने आपल्यावर ही वेळ ओढविली, असा उल्लेखही पंतप्रधानांनी या सभेत केला.

ही मोदींची गॅरंटी

भ्रष्टाचार्‍यांविरुद्ध कारवाई थांबणार नाही, हा माझा देशाला शब्द आहे. मोदींवर कितीही तुटून पडा. भ्रष्टाचारी, मग तो कितीही मोठा असो, त्याने लुटलेला देशाचा, जनतेचा पैसा त्याला आज ना उद्या देशाला, जनतेला परत करायला मी भाग पाडेनच. ही मोदींची गॅरंटी आहे, असेही पंतप्रधानांनी सुनावले.

पैसा सत्कारणी लावला…

पूर्वीच्या सरकारमधील विविध योजनांचे 10 कोटी बनावट लाभार्थी आम्ही रद्दबातल ठरविले. ज्याचा जन्मही झाला नाही, अशाच्या खात्यात सरकारचा पैसा जात असे. देशाचा हा पैसा थोडाथोडका नव्हे तर 2 लाख 75 हजार कोटी रुपये आम्ही वाचविला आणि सत्कारणी लावला, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

पंतप्रधानांचे भाषण 45 मिनिटे चालले. 'राम राम' अशा अभिवादनाने सुरू झालेल्या त्यांच्या या भाषणाचा समारोप 'भारत माता की जय'ने झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, एनडीएचे घटक पक्ष रालोद प्रमुख जयंत चौधरी, अपना दलच्या राष्ट्रीय अध्यक्षा अनुप्रिया पटेल, ओ. पी. राजभर, निषाद पार्टी अध्यक्ष संजय निषाद हे व्यासपीठावर होते. भाजप प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी पंतप्रधान मोदींना राम मंदिराची प्रतिकृती भेट म्हणून दिली. भारतरत्न चौधरी चरण सिंह गौरव समारंभ, असे या कार्यक्रमाचे नामकरण करण्यात आले होते. योगी आदित्यनाथ आदी नेत्यांची भाषणेही यावेळी झाली.

आगामी पाच वर्षांचा रोडमॅप

आम्ही आगामी पाच वर्षांचा रोडमॅप आताच तयार करत आहोत. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत आम्हाला कोणते मोठे निर्णय घ्यायचे आहेत, त्याची तयारी आम्ही आताच सुरू केलेली आहे. म्हणूनच मी म्हणतो, ही निवडणूक सरकार बनविण्यासाठी नव्हे तर देश घडविण्यासाठी आहे. त्यामुळे 4 जूनला 400 पार होणारच, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

ऊसपट्ट्यांना ऊर्जापट्टे बनवू

उसाच्या शेतीला साखर आणि गुळापर्यंत मर्यादित राहू द्यायचे नाही. आम्ही ऊसपट्ट्यांना ऊर्जा पट्टे बनविणार आहोत. इथेनॉलच्या उत्पादनात आताच दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत पंधरा पटींनी वाढ झालेली आहे. ती वेगाने वाढवत न्यायची आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT