सुरत; पीटीआय : माझ्या पंतप्रधानपदाच्या तिसर्या कारकिर्दीमध्ये भारत जगातील तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असे आत्मविश्वासपूर्ण प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले. ही मोदींची आणखी एक गॅरंटी असल्याचे त्यांनी सांगितले. सुरत डायमंड बोर्स या विशालकाय संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या संकुलाच्या माध्यमातून आठ लाख रोजगार निर्माण होणार असून भारताला जगातील आधुनिक हिरे, रत्ने आणि दागिन्यांची बाजारपेठ म्हणून विकसित करणे हा त्यामागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुरतच्या शिरपेचात या संकुलाच्या माध्यमातून आणखी एक लखलखता हिरा स्थानापन्न झाला आहे, अशी आपल्या भाषणाची सुरुवात करून मोदी म्हणाले, या माध्यमातून आणखीही प्रचंड रोजगार निर्मिती होणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात शक्तिशाली बनविण्याचे लक्ष्य माझ्या सरकारने निश्चित केले आहे. माझ्या तिसर्या कार्यकाळात भारत निश्चितपणे जगातील तिसर्या क्रमांकाची आर्थिक महाशक्ती होईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
संपूर्ण विश्वात जेव्हा जेव्हा हिर्यांच्या व्यवसायाबद्दल चर्चा केली जाईल, तेव्हा तेव्हा सुरत डायमंड बोर्सचा उल्लेख होणे आता अटळ आहे. ही दिमाखदार वास्तू म्हणजे आधुनिक भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि मेड इन इंडिया या संकल्पनेचा अनोखा आविष्कार आहे, असे गौरवाद्गार त्यांनी काढले.
वेगवान आर्थिक विकासाचा ध्यास माझ्या सरकारने घेतला आहे. या संकुलाच्या उभारणीमुळे भारताच्या क्षमतेचा जगाला पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या यशानंतर मोदींची गॅरंटी हा शब्द प्रचलित झाला. मात्र, सुरतवासीयांसाठी ही संकल्पना नवी नाही. हिरे व्यापाराच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल, असा विश्वास मोदी यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
या संकुलासाठी 3500 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. त्याचे बांधकाम फेब्रुवारी 2015 मध्ये सुरू झाले आणि एप्रिल 2022 मध्ये पूर्ण झाले. याची स्थापना सुरतच्या हिरे उद्योगाने उत्पादन आणि व्यापार दोन्हीसाठी एक स्टॉप हब म्हणून केली आहे. सुरत शहर जगातील नैसर्गिक हिरे बनवण्यासाठी जगप्रसिद्ध आहे.
या इमारतीचे आरेखन दिल्ली येथील वास्तुविशारद सोनाली व मनीत रस्तोगी आणि त्यांची फर्म मॉर्फोजेनेसिस यांनी तयार केले आहे. एकाच वेळी सुमारे 65 हजार लोक ये-जा करू शकतील, अशी ही वास्तू म्हणजे जणू एखादे फुटबॉल स्टेडियमच आहे. या ठिकाणी अत्युच्च दर्जाची अत्याधुनिक सुरक्षाव्यवस्थाही ठेवण्यात आली आहे. इमारतीत प्रवेश करणे आणि बाहेर येणे सुलभ व्हावे यासाठी या संकुलाचा आकार मणक्यासारखा ठेवण्यात आला आहे. पाठीचा कणा लहान हाडांच्या मालिकेपासून बनलेला असतो आणि त्याला कशेरुक असे संबोधले जाते. त्याच धर्तीवर या संकुलातील इमारती परस्परांशी जोडण्यात आल्या आहेत.
– देशातून हिरे, रत्ने आणि दागिन्यांची आयात-निर्यात आणि व्यापाराला चालना देणे.
– हिरे उत्पादन आणि व्यापारात गुंतलेल्यांना अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
– कटिंग, पॉलिशिंग आणि प्रोसेसिंगसह डायमंड, जेम्स आणि ज्वेलरीशी संबंधित व्यवसायाचा विस्तार करणे.
– एकाच ठिकाणी हिरे व्यापार्यांना व्यवसायाची सुलभ संधी निर्माण करणे.