Latest

२०२४ ची निवडणूक जिंकणारच : नरेंद्र मोदी

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य भारतीयांच्या आयुष्यात प्रचंड बदल झाले. आज भारत गरुडझेप घेण्यास सज्ज आहे, हे भारतीयांना ठाऊक आहे. म्हणूनच 2024 च्या निवडणुकीत आम्हीच जिंकणार आहोत, असा आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत व्यक्त केला. लंडनच्या 'द फायनान्शियल टाइम्स' या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी भारतात अल्पसंख्याकांच्या बाबतीत कसलाही भेदभाव केला जात नाही, असेही ठणकावून सांगितले.

भारताची प्रगती, लोकशाही, निवडणुका आणि इतर अनेक विषयांवर पंतप्रधान मोदी यांनी या मुलाखतीत सविस्तर उत्तरे दिली. ते म्हणाले की, 2013 च्या आधी केवळ विदेशी गुंतवणुकीवर आर्थिक तब्येत अवलंबून असणार्‍या देशांच्या यादीत भारत होता. आज तोच भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य भारतीयांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आला. सामाईक मनुष्यबळ अहवालाच्या आकडेवारीनुसार, गेल्या दहा वर्षांत बेरोजगारीचा दर घटत चालला आहे. उत्पादकता, पायाभूत सुविधांचा विस्तार, या निकषांवर बघितले असता, भारतात रोजगारनिर्मिती वाढली आहे. तरुणांच्या शक्तीला गती मिळाली आहे. एवढेच नव्हे, तर आज जगाला भारतात गुंतवणुकीसाठी यावे वाटते. ही अशी सर्वसमावेशक, जागतिक दर्जाची यंत्रणा उभी करण्याची भारताची मनीषा आहे. त्यामुळेच भारत आता गरुडझेप घेण्याच्या तयारीत आहे, याची भारतीयांना खात्री झाली आहे. त्यामुळेच आम्ही 2024 च्या निवडणुकीत निश्चितच जिंकू, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

घटनेत बदल होणार नाही

तिसर्‍यांदा सत्तेत आल तर भाजप सरकार घटनेत बदल करेल, या विरोधकांच्या आरोपांबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भाजप तिसर्‍यांदा सत्तेत येणार यात काहीच शंका नाही आणि देशाच्या घटनेतही बदल केले जाणार नाहीत. ही चर्चा अर्थहीन असून, घटनेला हात न लावताही सरकार जनतेच्या सहभागाने अनेक बदल करत आहे, हे सर्वांनी बघितले आहे. त्यामुळे घटनेत बदल होण्याची भीती पसरवणे चुकीचे आहे; पण भाजपचे विरोधक त्यांची मते व्यक्त करण्यासाठी स्वतंत्र आहेत. असे घटना बदलण्याचे आणि लोकशाही धोक्यात असल्याचे दावे करणे, हा देशातील जनतेच्या सदसद्विवेक बुद्धीचा अपमान आहे.

भारतात मुस्लिम सुरक्षितच

मुस्लिमांवरील अत्याचार आणि देशातील अल्पसंख्याकांचे भविष्य, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला थेट उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय समाजात धर्माच्या आधारावर कधीच भेदभाव केला जात नाही. पारशी समाजाचेच बघा, जगभर छळ आणि भेदभाव सोसणारा हा समाज भारतात सुरक्षित आहे, आनंदी जगत असतानाच प्रगतीही करीत आहे. त्यामुळे मुस्लिम सुरक्षित नाहीत, अशी ओरड करणे साफ चूक आहे. भारतात धर्मावर आधारित भेदभाव केला जात नाही. मुस्लिमही भारतात अत्यंत सुरक्षित आहेत.

माहिती द्या, कारवाई करू

खलिस्तानी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येच्या कटामागे भारत असल्याचा अमेरिकेने केलेला आरोप गाजत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर प्रथमच भाष्य केले. ते म्हणाले की, कायद्याचे राज्य आम्ही मानतो. जर कुणी आम्हाला माहिती दिली, तर नक्कीच त्यात लक्ष घालून कारवाई करू. जर कुणी भारतीय नागरिक चांगल्या किंवा वाईट कृत्यात सहभागी असेल, तर आम्ही नक्कीच लक्ष घालू.

SCROLL FOR NEXT