Latest

उत्तर प्रदेशात मोदी-योगी यांचाच डंका!

दिनेश चोरगे

केंद्रातील सत्ता हस्तगत करण्यासाठी राजमार्ग ठरणार्‍या उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचंड लोकप्रियतेच्या जोरावर भाजपने 'अब की बार 400 पार'चा नारा बुलंद केला आहे. उत्तर प्रदेशातील संपूर्ण 80 जागा जिंकण्याचा भाजपने चंग बांधला आहे. मात्र, विजयी रथावर स्वार मोदी – योगी यांना रोखण्यासाठी विरोधकांनीही कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस-सपाच्या आघाडीने भाजपपुढे आव्हान उभे केले आहे. मायावती यांची बसपा स्वबळावर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात तिहेरी लढत बघायला मिळणार आहे.

उत्तर प्रदेशच्या 80 जागांवर सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी सहारनपूर, कैराना, मुजफ्फरनगर, बिजनौर, नगिना, मुरादाबाद, रामपूर आणि पिलीभीत या आठ मतदार संघात मतदान पार पडणार आहे. दुसर्‍या टप्प्यात 26 एप्रिल रोजी अमरोहा, मेरठ, बागपत गाजियाबाद, गौतम बुद्धनगर, बुलंदशहर, अलिगड आणि मथुरा या आठ मतदार संघात मतदान होणार आहे. तिसर्‍या टप्प्यात 7 मे रोजी संभल, हाथरस, आग्रा, फतेहपूर सिक्री, फिरोजाबाद, मैनपुरी एटा, बदायू, औतिया, बरेली दहा मतदार संघात होणार आहे.

मुलायमसिंग यादव परिवाराचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या कन्नौजसह इतर 13 मतदार संघात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. गांधी कुटुंबीयांच्या रायबरेली, अमेठीसह लखनौ, झाशी, हमीरपूरसह इतर 14 मतदार संघात 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 25 मे रोजी सहाव्या टप्प्यात 14 मतदार संघात मतदान होणार आहे. सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीसह गोरखपूर, खुशीनगर, बलिया, गाझीपूर आणि इतर 13 मतदार संघात एक जून रोजी मतदान होणार आहे.

भाजपने आतापर्यंत जाहीर केलेल्या 10 उमेदवार यादीतून 70 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. उरलेल्या दहापैकी पाच जागा मित्र पक्षांसाठी सोडल्या जाणार आहेत. भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने आघाडी केली आहे. सपा 63 तर काँग्रेस 17 जागा लढवणार आहे. आघाडीत लढून आमच्या पक्षाचे नुकसान झाल्याने यंदा आम्ही स्वबळावर निवडणूक लढवत असल्याचे बसपा प्रमुख मायावती यांनी जाहीर केले आहे. बसपाच्या या निर्णयामुळे राज्यात मतविभाजन होऊन भाजपला त्याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पल्लवी पटेल यांचा अपना दल आणि असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष देखील मैदानात आहे. 'अबकी बार मोदी सरकार' आणि 'अबकी बार 400 पार' हा नारा घेऊन भाजपची गाडी सत्तेच्या दिशेने सुसाट निघाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचार सभांमधून रान उठवले आहे. विरोधक आमच्या शक्तीला संपवू पाहत आहेत. मात्र, शक्तीचे सामर्थ्य ते संपवू शकणार नाहीत, असे मोदी प्रचारसभांमधून ठणकावून सांगत आहेत. जगभरात भारताचा जो डंका वाजतोय ना, तो मोदींचा नव्हे तुमच्या प्रेमाचा आहे, असे जनतेला उद्देशून बोलत आहेत. त्याला संपूर्ण राज्यात भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

आमच्यासाठी फॅमिली फर्स्ट-नेशन फर्स्ट हेच एकमेव ध्येय आहे. 'माफियाराज विरुद्ध कायदाराज' अशी आमची लढाई आहे, असे योगी आदित्यनाथ सांगताहेत. बाबा बुलडोझर म्हणून प्रसिद्ध योगींचा सर्वत्र जलवा आहे. भाजपचा हा असा झंझावाती प्रचार सुरू असतानाच काँग्रेस आणि सपाच्या गोटात मात्र संभ्रम आणि अविश्वासाचे वातावरण आहे.सपाने 63 जागांपैकी 49 उमेदवारांना तिकिटे वाटली, पण आठ मतदारसंघात ऐनवेळी उमेदवार बदलले. भाजपविरोधात कोण कुठून लढणार, याबाबत स्पष्टता नाही. सपाचे प्रमुख अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव यांच्यात तिकीट वाटपावरून अंतर्गत संघर्ष सुरू आहे. मेरठमध्ये भानुप्रताप वर्मा यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यानंतर ती बदलून अतुल प्रधान यांना देण्यात आली. आता प्रधान यांच्याऐवजी सुनीता वर्मा यांना तिकीट देण्यात आले आहे.

संभल, बदायु, मिश्रीख, बागपत, मुरादाबाद, नोएडा, गौतमबुद्धनगर या मतदार संघातील उमेदवार सपाने बदलले आहेत. बदायु येथून शिवपाल यादव यांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, आता त्यांचा मुलगा आदित्य यादव यांचे नाव पुढे आले आहे. अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव यांना मैनपुरी मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसनेही काही जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले आहेत. वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गाझियाबाद येथे डॉली शर्मा, तर मथुरामध्ये हेमामालिनी यांच्याविरोधात मुकेश धनगर काँग्रेसचे उमेदवार आहेत. रायबरेलीमधून यंदा सोनिया गांधी निवडणूक लढविणार नाहीत. मात्र, त्यांच्या जागी कोण लढणार, हे काँग्रेसने अद्याप जाहीर केलेले नाही. रायबरेलीत प्रियांका गांधी अथवा त्यांचे पती रॉबर्ट वधेेरा यांच्या नावाची चर्चा आहे. अमेठीतून राहुल गांधी लढतील की नाही, हा सुद्धा प्रश्न आहे.

काँग्रेस आणि सपाची आघाडी झाली असली तरीही प्रचारासाठी दोन्ही पक्षांची संयुक्त सभा अद्याप झाली नाही. निवडणुकीचा अजेंडाही ठरू शकलेला नाही. तिकीट मिळाले नसल्याने इकडून तिकडे उड्या मारणार्‍या आयाराम – गयाराम यांची संख्या वाढली आहे. या सर्व गोष्टींचा भाजपला चांगलाच फायदा मिळणार आहे.

भाजपमध्येही बंडखोरीची लागण आहे. मिशन 80 पूर्ण करण्यासाठी विद्यमान खासदारांना घरी बसविले जात आहे. जिंकून येण्याची क्षमता आणि जनतेमधील प्रतिमा तपासली जात आहे. त्यामुळेच प्रयागराजमधील खासदार रीता बहुगुणा यांचे तिकीट कापून त्यांच्या जागी नीरज त्रिपाठी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. फूलपूरमधून केसरीदेवी पटेल यांना घरी बसवून प्रवीण पटेल यांना तिकीट दिले आहे. बलियामधून माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे सुपुत्र नीरज शेखर यांना मैदानात उतरविण्यात आले आहे.

मेरठमध्ये रामायण फेम अरुण गोविल रिंगणात उतरले आहेत. महिला कुस्तीपटूंचा कथित लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेले कैसरगंज येथील खासदार ब्रीजभूषण शरण यांचेही तिकीट कापले आहे. एकंदरीत उत्तर प्रदेशात भाजपच्या आव्हानांना कुठला पक्ष समर्थपणे तोंड देतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

SCROLL FOR NEXT