Latest

‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याची तयारी अंतिम टप्प्यात

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जगदंब क्रिएशन निर्मित आणि डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचे प्रयोग येथील तपोवन मैदानात 7 ते 12 एप्रिल दरम्यान होणार आहेत. या प्रयोगांसाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून तिकीट विक्रीला जोरदार प्रतिसाद मिळत आहे, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास जिवंत करणार्‍या या महानाट्यात शंभूराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या बलिदानापर्यंतचा इतिहास या अडीच तासांत उभा करण्यात आला आहे.

तपोवन मैदानात उभारण्यात येत असलेल्या भव्य चार मजली सेटचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्याची रंगरंगोटी पूर्ण झाली आहे. या सेटला फिनिशिंग टच देण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे यांनी शहरातील प्रमुख व्यक्तींच्या भेटीगाठी घेत त्यांना हे महानाट्य पाहण्यासाठी आमंत्रित केले. डॉ कोल्हे यांनी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेत त्यांना निमंत्रण दिले. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील तसेच माजी मंत्री आणि आमदार हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन महानाट्याबाबत माहिती देत त्यांना प्रयोग पाहण्यासाठी आमंत्रित केले.

भावी पिढ्यांनी छत्रपती संभाजी राजांच्या चरित्रातून प्रेरणा घ्यावी, यासाठी हा या भव्य आयोजनामागील उद्देश आहे. मुलांना त्यांच्या समोरच हा इतिहास घडतोय अशी अनुभूती येईल. यासाठी हे महानाट्य पाहण्यासाठी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले आहे.

या महानाट्यात ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड महाराणी येसुबाईंच्या, महेश कोकाटे अनाजी पंतांच्या, रमेश रोकडे सरसेनापती हंबीररावांच्या, अजय तापकिरे कवी कलशाच्या, तर विश्वजित फडते दिलेरखान व मुकर्रबखानच्या दुहेरी भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

तिकीट विक्री केशवराव भोसले नाट्यगृह, हॉटेल विश्व शाहूपुरी पहिली गल्ली, कुलकर्णी आयुर्वेद शहाजी लॉ कॉलेज समोर, राजारामपुरी आणि हॉटेल दामिनी, ताराबाई पार्क आणि तपोवन मैदान, कळंबा रोड येथे सुरू आहे. बुक माय शोवरदेखील तिकिटे उपलब्ध आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT