Latest

Pune Bypoll : गिरीश बापटांच्या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची तयारी सुरू, अधिकार्‍यांची मागविली माहिती

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीची शक्यता गृहीत धरून जिल्हा निवडणूक विभागाकडून निवडणुकीसाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी, महापालिकेतील राजपत्रित अधिकार्‍यांची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने पालिका प्रशासनाकडून तातडीने मागविली आहे.

खासदार गिरीश बापट यांचे 29 मार्च 2023 रोजी निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाल्यानंतर नियमानुसार, सहा महिन्यांच्या आत त्या जागेवर पोटनिवडणूक घेतली जाते. बापट यांच्या निधनानंतर लोकसभेच्या निवडणुकीसाठी वर्षभरापेक्षा अधिक कालावधी शिल्लक आहे, त्यामुळे या मतदारसंघाची पोटनिवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता आहेे. हे लक्षात घेऊन निवडणूक विभागाने तयारीला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेकडून राजपत्रित अधिकार्‍यांची यादी मागविण्यात आली आहे. त्यानुसार पालिकेने 15 अधिकार्‍यांची माहिती तत्काळ कळविली आहे.

राजकीय घडामोडी सुरू !

जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून निवडणुकीची तयारी सुरू असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी बापट यांचे चिरंजीव गौरव बापट यांची घरी जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे, पोटनिवडणूक जाहीर झाल्यास भाजपकडून बापट कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्याबाबत चाचपणी तर सुरू नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. बापट यांच्या कुटुंबातच उमेदवारी देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.

SCROLL FOR NEXT