Latest

हितेंद्र ठाकूर दिसताच प्रवीण दरेकर म्हणाले ‘आप्पा, मी ऐकलं तुम्ही मला शिव्या दिल्या’, संवाद कॅमेऱ्यात कैद

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. या निवडणुकीत भाजपने राज्यसभेप्रमाणे एक उमेदवार जास्त उभा केला आहे. तसेच पाचही जागांवर आपले उमेदवार निवडून येणार, असा भाजपने दावा केला आहे.

भाजपने त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने त्यांचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा अशक्य असा विजय मिळवत चमत्कार घडवून आणला होता. यावेळी देखील भाजप असाच चमत्कार घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. याचाच एक भाग म्हणून भाजप नेत्यांनी आज बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली.

भाजप नेतेआणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. या तिघांची अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन जेव्हा बविआ नेते हितेंद्र ठाकूर यांच्या घराजवळ गाडीतून खाली उतरले तेव्हा त्यांच्यात जो गंमतीशीर सवांद झाला तो कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

प्रवीण दरेकर, गिरीश महाजन आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेलं संभाषण :

प्रवीण दरेकर : आप्पा मी ऐकलं मला तुम्ही शिव्या दिल्या आहेत. म्हणून मला यावं लागलं आहे. हे मला प्रसादनं सांगितलं. मी म्हणालो, असं असेल तर मी दहावेळा आप्पांकडे जातो.

गिरीश महाजन : हे रेकॉर्ड होतंय!

हितेंद्र ठाकूर : मी प्रसादला घातल्या असत्या. (तीनही नेते हितेंद्र ठाकूर यांच्या घरात प्रवेश करतात.)

दरम्यान आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार गिरीश महाजन यांनी रस्ते मार्गाने प्रवास न करता लोकल ट्रेनने विरारला जाणे पसंत केले.

SCROLL FOR NEXT