Latest

‘प्रतापशेठ साळुंखे’-गलाई व्यवसायिकांचा आधारवड हरपला

स्वालिया न. शिकलगार

विटा : पुढारी वृत्तसेवा – येथील प्रसिद्ध गलाई व्यावसायिक, नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रतापशेठ महादेव साळुंखे (वय ८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.

खानापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सांगली सातारा सोलापूरच्या दुष्काळी भागातील गलाई व्यवसायिकांचे ते जणू 'मसीहा' आणि खऱ्या अर्थाने आधारवड होते.

गेल्या काही दिवसांपासून प्रताप शेठ साळुंखे यांची प्रकृती बरी नव्हती. ते रक्तदाब आणि कंप वाताने आजारी होते. प्रताप शेठ साळुंखे यांचे मुळगाव खानापूर तालुक्यातील पारे. नुकतीच या गावची यात्रा झाली. गेले ५०-६० वर्षात पहिल्यांदाच असे घडले असेल की यात ते सहभागी नव्हते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील गलाई बांधवांची मोठी हानी झाली आहे.

प्रतापशेठ यांना वयाच्या १३ व्या वर्षी घरची आर्थिक परिस्थिती पाहून आपले शिक्षण अर्धवट सोडले आणि केरळमधील आलेप्पी या शहरात सोने गलाईच्या कामासाठी जावे लागले. तिथे नारळाच्या झावळ्या आणि केळीच्या खुंटांपासून तयार केलेल्या आडोशावर सोने गाळण्याची भट्टी सुरू केली. तिथून सुरू झालेला त्यांचा गेल्या ७० वर्षांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांना एकूण सहा भावंडे आणि हे सर्वात मोठे. त्यामुळे या सर्वांची कौटुंबिक जबाबदारी त्यांच्याकडेच होती. ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यांचे दोन भाऊ जयहिंद शेठ आणि सुरेशशेठ हे गलाई व्यवसायात मोठे आहेत, तर तिसरे विलासराव हे वैद्यकीय क्षेत्रात मोठे होते. बहिण संगीताक्का यांना दिवंगत मंत्री डॉ. पतंग राव कदम यांचे बंधू माजी आमदार मोहन शेठ कदम यांच्या घराण्यात विवाह करून दिले आहे, तर दुसऱ्या देवकर घराण्यात, त्या वैद्यकीय क्षेत्रात आहेत-डॉ. सविता देवकर.

परिस्थितीशी झुंज देत अनेक संकटे पार करीत त्यांनी खानापूर तालुक्याच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक, सहकार, कृषी, क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांनी काही वर्षे खानापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषविले आहे. परंतु राजकारणापेक्षा त्यांना सामाजिक कामात प्रचंड रस होता. तसेच त्यांनी शिवप्रताप मंगल कार्यालय, शिव प्रताप नागरी सहकारी पत संस्था, शिवप्रताप मेडिकल अकॅडमी आणि सर्वात मोठे व्यापारी संकुल असलेले विट्यातील शिवप्रताप गोल्ड टॉवर याची उभारणी केली आहे.

आपल्या गलाई व्यवसायाबद्दल त्यांना प्रचंड अभिमान आणि आपुलकी होती. येथील गलाई व्यवसाय देशभर पसरलेला आहे. अनेकांना त्यांनी या व्यवसायात आणले, मोठे केले. मात्र गेल्या काही दशकांमध्ये सोने गाळणी या व्यवसायात आलेल्या स्थित्यंतरा नंतरच्या अडचणी निर्माण झाल्या. या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी ऑल इंडिया नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी असोसिएशन या नावाने देशभरातील गलाई बांधवांची मोठी संघटना गेल्या १० वर्षां पूर्वी बांधली. प्रतापशेठ साळुंखे यांचे सतीश आणि शेखर हे दोन्ही चिरंजीव वेगवेगळ्या व्यवसायात असून आपापल्या परीने वडिलांचे कार्य पुढे नेत आहेत.

SCROLL FOR NEXT