पुणे; पुढारी वृत्तसेवा : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओचा संचालक शास्त्रज्ञ प्रमोद कुरुलकर हा सरळसरळ सेक्स्टॉर्शनचा शिकारी ठरल्याचे खळबळजनक वृत्त हाती आले आहे. हे सेक्स्टॉर्शनचे डीआरडीओच्या अतिथिगृहातच झाल्याने बिंग फुटले. उच्चस्तरीय सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार, कुरुलकर याला पाकिस्तानी हेरांनी घेरले आहे, याची सुतराम कल्पनाही आली नाही. सामान्य माणसाला जसे सेक्स्टॉर्शनचे फसवे कॉल येतात, तसाच कॉल कुरुलकर याला आला. सद्सदि्ववेक बुद्धी हरवल्याने कुरुलकर तिथेच फसला आणि पाकिस्तानी हेर तरुणीच्या जाळ्यात अलगद अडकला.
कुरुलकर याला विश्रामगृहात भेटण्यासाठी येणार्या तरुण व तरुणीचा सखोल तपास सुरू आहे. तसेच त्याच्याकडे कोण कोण भेटायला येत होते, याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. यामध्ये ती पाकिस्तानी हेर तरुणी कधी आली होती, याचा शोध एटीएस घेत आहे.
आपले वरिष्ठ सेक्स्टॉर्शनचे शिकार झाले असून, त्यांच्याकडून देशविघातक कृत्य झाल्याचे डीआरडीओतील काही प्रामाणिक अधिकार्यांच्या लक्षात आले आणि सर्व पुरावे हाती येताच अखेर कुरुलकर याला एटीएसच्या ताब्यात देण्याचे धाडस त्यांनी दाखवले.
कुरुलकर हा डीआरडीओच्या क्वार्टर्समध्ये राहात असल्याने अनेक तरुणी त्याला तिथे भेटायला येऊ लागल्या. कुरुलकर शास्त्रज्ञ असल्याने तेथील सुरक्षारक्षकांना संशय आला, तरी कुठलेही ठोस पुरावे नसल्याने काहीही करता आले नाही. अखेर सेक्स्टॉर्शनचे पूर्ण शिकार होऊन कुरुलकरच्या हातून बर्याच गोष्टी निसटल्या अन् त्या पाकिस्तानी हेरांच्या हातात गेल्या. तोवर कॉल करून आपण कुठे फसत चाललो आहोत, हे कळलेच नाही. कामांध झाल्याने त्याने अनेक गुपितं शत्रूच्या हाती दिल्याचे डीआरडीओच्या काही वरिष्ठ अधिकार्यांच्या लक्षात आले.
कुरुलकरकडे अनेक तरुणी भेटायला येत असत. त्यातच एक काश्मिरी अत्यंत सुंदर तरुणी आली. तिची आधी त्याच्याशी सोशल मीडियावर ओळख झाली होती. तिनेच कुरुलकरला फ्रेंड रिक्वेस्ट टाकली होती. त्या ओळखीतून हे प्रकरण सेक्स्टॉर्शनपर्यंत गेले. तिने सर्व गुपितांचे हरण केल्यानंतरच ती पाकिस्तानी असल्याचे समजले.
कुरुलकरकडे तरुणींची ये-जा असल्याचे लक्षात येताच डीआरडीओने काही दिवस त्याला अकार्यकारी पदावर बसवले. त्यानंतर त्याच्यावर नजर ठेवण्यात आली. त्याच्या कार्यालयातून गेलेले मेल, फोन याचा डाटा गोळा करून शहानिशा करण्यात आली. तब्बल महिनाभराच्या निरीक्षणानंतर एटीएसकडे तक्रार नोंदवली. एटीएस अधिकार्यांनीदेखील तक्रारीची शहानिशा करून आठ दिवसांनंतर गुन्हा दाखल करून कुरुलकर याला ताब्यात घेतले.