नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विधानसभा पत्रकार गॅलरीत बसून विदर्भातील प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा संताप व्यक्त करीत एका वृत्तपत्राचे पत्रकार प्रकाश पोहरे यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याची घटना आज (दि. १४) घडली. या प्रकरणी पोहरे यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे निर्देश तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी दिले आहेत.
आज (दि. १४) विधानसभेचे कामकाज सुरु असताना पत्रकार गॅलरीत येऊन पोहरे यांनी तालिका अध्यक्षांकडे बघत हातवारे करीत विदर्भाबद्दल का बोलत नाही असे विचारले. दरम्यान, घडलेल्या प्रकाराकडे लक्ष वेधून विधानसभा भाजपा मुख्य प्रतोद आमदार आशिष शेलार यांनी ही कसली सुरक्षा? असा थेट सवाल केला. संसदेत घडलेल्या घटनेनंतर आज (दि. १४) विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत कोणीतरी येतो, अध्यक्षांकडे हातवारे करून घोषणाबाजी करतो? कोण आहे ही व्यक्ती? त्यांना प्रवेश कसा मिळाला? विधानसभेची सुरक्षा कशी काय भेदली? असे प्रश्न उपस्थित करुन या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली.
तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी मागणी मान्य करीत चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे एवढ्यावरच थांबले नाहीत तर खाली उतरून मीडिया पोडियमसमोर येऊन स्वत:च पत्रकारांना बाईट दिला. अधिवेशनात विदर्भाच्या मुद्द्यांवर कुणीच गांभीर्याने बोलत नसल्याचे सांगितले. लगेच झालेल्या प्रकारावरून विधिमंडळ सुरक्षारक्षकांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात काहीवेळ झटापट झाली. शेवटी सुरक्षारक्षकांनी पोहरे यांना तिथून हटवून ताब्यात घेतले. यानंतरही मी संपादक आहे, आपल्याला विधानसभा अध्यक्षांकडे घेऊन चला, मलाच त्यांना भेटायचे आहे. 200 टक्के ठरवून सर्व प्रकार सुरू आहे. विदर्भाचे कुणाला घेणेदेणे नाही, खेळखंडोबा सुरू असल्याचा आरोप पोहरे यांनी यावेळी केले.