Latest

अर्थकारण : ओमानमधील बंदर आणि भारत

Arun Patil

दुकम या ओमानमधील सामरिकद़ृष्ट्या महत्त्वाच्या बंदरात भारताला थेट प्रवेश मिळाला आहे. यामुळे पर्शियन गल्फमधून होणारा व्यापार मोठ्या प्रमाणात सुलभ होणार आहे. ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्या नवी दिल्ली दौर्‍यानंतर दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीनंतर दुकम बंदराची कमान भारताकडे सोपवण्यात आली आहे. दुकम बंदर हे धोरणात्मकद़ृष्ट्या महत्त्वाचे आहे.

आशिया खंडामध्ये भारताची कोंडी करताना चीन भारताच्या चहुबाजूंनी असणार्‍या विशेषतः भारताच्या समुद्रकिनार्‍यालगतच्या शेजारील देशांना प्रचंड प्रमाणावर आर्थिक मदत देऊन तेथील विकास प्रकल्पांमध्ये पैसा गुंतवत आहे. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत भारताच्या शेजारच्या छोट्या देशांमधील बंदरे ताब्यात घेऊन तेथे लष्करी तळांची उभारणीही चीनकडून केली जात आहे. चीनच्या या आक्रमक विस्तारवादी भूमिकेने हैराण असलेले देश अन्य देशांशी लष्करी करार करून बेट आणि बंदरांवर आपली टेहळणी जहाजे किंवा चीनच्या जलमार्गावर असलेल्या बंदरांवर सैनिकी तळ स्थापन करण्याच्या आघाडीवर वेगाने काम करत आहेत. या माध्यमातून चीनच्या रणनीतीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा या देशांचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारताला हिंदी महासागरात मोठ्या कूटनीतीच्या पातळीवर एक यश मिळाले आहे.

भारत-ओमान यांच्यातील सामरिक करारानुसार दुकम बंदर भारताच्या हवाली करण्यात आले आहे. उत्तरेकडील भागात सीमावाद उकरून काढत चीनकडून दबाव निर्माण करण्यासाठी हिंदी महासागरात चीनची टेहळणी जहाजे फिरत असताना भारताला ओमानचे बंदर मिळाले आहे. या हेरगिरी जहाजांच्या उपस्थितीबाबत जागतिक पटलावर भारताने अनेकदा आक्षेप नोंदविला. तरीही चीनची ही हेरगिरीची कृत्ये सुरूच राहिली. श्रीलंकेच्या हबनटोटा बंदरानंतर मालदीव येथे चीनचे हेरगिरी करणारे जहाज दाखल झाले आहे. त्यामुळे भारताला चीनच्या या सागरी दहशतीला शह देण्यासाठी ठोस कृतीची गरज होती. ओमान येथील सामरिकद़ृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असणारे बंदर मिळाल्याने यासंदर्भात एक मोठे पाऊल पडले आहे, असे म्हणता येईल. या बंदरामुळे फारस खाडीमार्गे होणार्‍या जलवाहतुकीत आणि व्यापारात भारताला बरीच मुभा मिळण्याची अपेक्षा आहे.

भारताला ओमानच्या दुकम बंदराचा ताबा ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्या भारतीय दौर्‍याच्या दोन महिन्यांच्या आतच मिळाला. त्यामुळे पश्चिम आणि दक्षिण हिंदी महासागर क्षेत्रात भारताच्या देखरेखीत वाढ होण्यास हातभार लागेल. हे पाऊल लाल समुद्र आणि पश्चिम हिंदी महासागर क्षेत्रात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाचा दबदबा वाढण्यास मदत करणारे आहे.

भारताचे माजी परराष्ट्र सचिव ललित मानसिंग यांनी ऑगस्ट 2011 मध्ये 'भारताचा प्रादेशिक सामरिक प्राधान्यक्रम' या विषयावर एका थिंक टँकमध्ये बोलताना 'नेकलेस ऑफ डायमंड प्लॅन'चा उल्लेख केला होता. ते म्हणाले की, भारत आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी जे काही केले पाहिजे ते करत आहे. चीनच्या 'स्ट्रिंग ऑफ पर्ल्स'च्या रणनीतीचा मुकाबला करण्यासाठी भारताची स्वतःची रणनीती आहे, ज्याला 'नेकलेस ऑफ डायमंडस्' म्हणतात. ज्याप्रमाणे चीन शेजारील राष्ट्रांमध्ये बंदर सुविधा निर्माण करत आहे, त्याचप्रमाणे भारतही महासागर क्षेत्रातील सर्व बलाढ्य देशांशी नौदल सहकार्य करत आहे. या रणनीतीमध्ये लष्करी, सुरक्षा आणि आर्थिक द़ृष्टिकोनातून इतर देशांशी युती करून स्पर्धात्मक नेटवर्क स्थापन करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. इंडोनेशिया, जपान, मंगोलिया, ओमान, सेशेल्स, सिंगापूर, व्हिएतनाम, मध्य आशियाई प्रजासत्ताक इत्यादी भौगोलिक आणि सामरिकद़ृष्ट्या महत्त्वाच्या देशांसोबतचे सहकार्य भारत वाढवत आहे. यामध्ये संयुक्त संरक्षण सराव, पोर्ट कॉल, लष्करी शिष्टमंडळांच्या परस्पर भेटी, संयुक्त प्रशिक्षण, भारत आणि इतर देशांमधील आर्थिक सहकार्य या मुद्द्यांचा समावेश आहे.

हिंदी महासागर क्षेत्रात 28 देश असून, ते 3 खंडांमध्ये पसरलेले आहेत. हिंदी महासागर हा अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना जोडणारा आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी प्रमुख मार्ग आहे. आजघडीला सुमारे 80 टक्के सागरी तेल व्यापार हा फक्त होर्मुझची सामुद्रधुनी, मलाक्का सामुद्रधुनी, बाब अल मंडेबची सामुद्रधुनी या तीन चोकपॉईंटस्मधून जातो. या भागावर चीनला आपली स्थिती मजबूत करायची आहे. 'स्ट्रिंग ऑफ पर्ल्स' आणि 'सिल्क रूट' यासारख्या रणनीतींनी चीन हिंदी महासागरात आपला ठसा वाढवत आहे. त्यामुळे चीनला टक्कर देऊन हिंदी महासागरात भारतीय शक्ती वाढवणे भारतासाठी महत्त्वाचे आहे.

दुकम बंदर सामरिकद़ृष्ट्या होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आणि एडनच्या आखाताच्या जवळ आहे. हे बंदर हॉर्न ऑफ आफ्रिकेमध्ये पाकिस्तानचे ग्वादर बंदर आणि जिबुतीदरम्यान आहे. दुकम बंदर हे मुंबईच्या पश्चिमेकडे थेट सरळ रेषेत आहे. मस्कतपासून 550 किलोमीटर अंतरावर हे बेट आहे. या बंदराच्या माध्यमातून आपला माल जमीन मार्गाने सौदी अरब आणि त्यापुढेही नेऊ शकतो. त्यामुळे एडनची खाडी आणि लाल समुद्रालगतच्या भागातील हौथी बंडखोरांच्या हल्ल्यांचा मुकाबला करता येणे शक्य आहे. सागरी सहकार्याच्या क्षेत्रात भारतासाठी एक मजबूत आधार म्हणून या बंदराचा भारताला उपयोग होणार आहे.

या बंदराच्या मदतीने मानवतावादाच्या माध्यमातून आपत्तीकाळात तातडीने मदत करण्याच्या द़ृष्टीने भारताची भूमिका अधिक सक्रिय राहू शकते. हे बंदर भारत आणि आफ्रिकेतील बाजारपेठेमध्ये जलमार्गे होणार्‍या मालवाहतुकीसाठी सहज उपलब्ध होईल. या बंदरामुळे खाडी क्षेत्र, हिंदी महासागर आणि अरबी समुद्राला सहजपणे बायपास करता येऊ शकते. दुकम बंदराच्या स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये जहाज दुरुस्ती आणि ड्राय डॉक सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे जहाज दुरुस्तीचे काम सहजपणे पार पाडले जाईल.

दुकमपासून रस्ते मार्गाने सहजपणे सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरातपर्यंत जाता येते. चीन आणि पाकिस्तान हे हौथी बंडखोरांच्या हल्ल्यांपासून सागरी मालवाहतूक वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. एडनच्या खाडीजवळ जिबुती येथे चिनी नौदलाचा तळदेखील आहे; मात्र आतापर्यंत सागरी मार्गाने होणार्‍या व्यापारावरील धोका टळलेला नाही. पाकिस्तानदेखील चीनबरोबर कराची ते जिबुतीपर्यंत गस्त घालत आहे. मात्र, तो एडनच्या खाडीत जाण्यात धजावत नसल्याचे दिसून येते. अशावेळी भारत ओमानच्या बंदराचा वापर करून चीनच्या या क्षेत्रावरच्या वर्चस्वाला धक्का देऊ शकतो. प्रामुख्याने ओमान हा फारस खाडी आणि अरबी समुद्राच्या संगमावर अरबी बेटांचा समूह असलेला आग्नेय किनार्‍यावरचा देश आहे.

या देशाचा बहुतांश भाग वाळवंट, वनराईविहिन आणि ओसाड आहे. रुब अल खली नावाने हा भाग ओळखला जातो. मात्र, हे क्षेत्र तेल आणि नैसर्गिक वायूने समृद्ध आहे. हा भाग शुष्क आणि वालुकामय असला, तरी किनारपट्टीवरील भाग हिरवागार आहे. ओमानची समृद्ध उत्तर किनारपट्टी आणि पर्वतरांगांदरम्यान वसलेला हा भाग आहे. या हिरव्यागार आणि सुपीक क्षेत्रात द्राक्षे आणि अन्य पिके घेतली जातात. दुकम बंदर हे ओमानच्या अल वुस्टा प्रशासकीय भागात मोडते. या ठिकाणी जहाजाची दुरुस्ती होते आणि ड्राय डॉक आहे. दुकम बंदराचे एकूण क्षेत्रफळ 188 चौरस किलोमीटर आहे आणि यात उद्योगासाठीची जमीन, तेलसाठ्याचे टर्मिनल, वाणिज्य आणि सरकारी बर्थ (जहाजबांधणीचे ठिकाण), एक गोदी आणि संबंधित भूभागाचा समावेश आहे. तेथे एक मुख्य ब्रेकवॉटर (कृत्रिम उंच किनारपट्टी) आणि दुसरे ब्रेकवॉटर असून, तो संरक्षित भाग आहे. प्रमुख ब्रेकवॉटरची उंची समुद्रसपाटीपासून 11 मीटर आणि समुद्रतळापासून सरासरी 22 मीटर उंच आहे. त्याची लांबी 4.1 किलोमीटर आहे. दुसर्‍या ब्रेकवॉटरची उंची 4.6 किलोमीटर आहे.

या ठिकाणच्या वाणिज्यिक बर्थमध्ये चार स्टेशन आहेत आणि सुमारे 1,600 मीटर लांबीचे दोन कंटेनर टर्मिनल आहेत. यात सुमारे 3.5 दशलक्ष क्षमतेचे कंटेनर हाताळण्याची क्षमता आहे. याशिवाय 5 लाख टन वार्षिक क्षमता असलेले गोदाम या ठिकाणी उभारण्यात आले असून, त्याचबरोबर 8 लाख टन वार्षिक क्षमतेचे तसेच दोन लाख मोटारींना वाहून नेण्याच्या क्षमतेचे बहुपयोगी टर्मिनलदेखील आहे. 23 जुलै 2014 पासून या बंदरावरच्या विमानतळावरून नियमितपणे राजधानी मस्कतसाठी प्रवासी सेवा सुरू करण्यात आली. 17 सप्टेंबर 2018 रोजी त्याची प्रवासी क्षमता पाच लाख वार्षिक झाली होती. त्याची मालवाहतुकीची क्षमता 25 हजार टन आहे. त्याच्या धावपट्टीची लांबी चार किलोमीटर आहे आणि त्यावर मोठे विमान उतरवता येणे शक्य आहे. हे विमानतळ 75 मीटर लांबीच्या देशांतर्गत रस्ते मार्गाला जोडलेले आहे.

ओमान हा भारताचा अतिशय जुना सामरिक सागरी भागीदार आहे. आखाती प्रदेशातील हा एकमेव देश आहे, ज्यासोबत भारतीय सशस्त्र दलांच्या तिन्ही सेवा नियमित द्विपक्षीय सराव करतात. चाचेगिरीविरोधी मोहिमेसाठी अरबी समुद्रात भारतीय नौदलाच्या तैनातीला ओमान महत्त्वपूर्ण सहकार्य करत आला आहे. आता दुकम बंदरामुळे दोन्ही देशांतील संबंध नव्या उंचीवर पोहोचणार आहेत.

SCROLL FOR NEXT