Latest

खेडमध्ये बॅनरबाजीवरून राजकीय शिमगा; उद्योजक सदानंद कदम यांची प्रशासनाकडे तक्रार

निलेश पोतदार

खेड शहर: पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेतली पहिली तक्रार बॅनरबाजी बद्दल दाखल करण्यात आली आहे. संमती नसताना घराच्या कंपाउंडवर राजकीय बॅनर लावल्याची तक्रार व्यावसायिक सदानंद कदम यांनी खेड पोलिसात दिली आहे. रामदास कदम आणि आपले कौटुंबिक वाद सर्वश्रुत असताना आपली राजकीय फायद्यासाठी बदनामी होत असल्याचा सदानंद कदम यांच्या तक्रारीत आरोप केला आहे. प्रशासनाने हा बॅनर काढावा अन्यथा आपण स्वतःहून काढणार असेही सदानंद कदम यांनी तक्रारीत म्हटले आहे.

एकीकडे शिमगोत्सवाची धूम कोकणात सुरू असताना, दुसऱ्या बाजूला शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे लहान भाऊ उद्योजक सदानंद कदम यांच्यातील कौटुंबिक वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिमगोत्सवानिमित्त जामगे या त्यांच्या निवासस्थानी लावण्यात आलेला बॅनर या वादाला निमित्त ठरला आहे. सदानंद कदम यांच्या जामगे येथील घराच्या कंपाउंडवर त्यांची संमती नसताना कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी बॅनर लावला आहे. या बॅनरवर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय फायद्यासाठी आपला फोटो लावला आहे. सोबत आमदार योगेश कदम यांचा व अन्य लोकांचे फोटो लावण्यात आले आहेत. हा राजकीय डाव असून, आपले रामदास कदम यांच्याशी कौटुंबिक वाद आहेत. नुकत्याच मोठ्या संकटातून आपण बाहेर पडलो आहे. राजकीय फायद्यासाठी आपल्या घरावर अनधिकृतरीत्‍या परवानगी नसताना लावण्यात आलेला बॅनर तात्काळ हटवावा अन्यथा मला स्वतःला हटवावा लागेल. हे करत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाई करावी असेही उद्योजक सदानंद कदम यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

तसेच असे बॅनर लावून आपली केलेल्या बदनामीची भरपाई करण्यासाठी समाजात गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी आपल्याला देखील खुलासा करण्यासाठी बॅनर लावण्याची परवानगी द्यावी अशी मागणी देखील सदानंद कदम यांनी केली आहे.

SCROLL FOR NEXT