Latest

Lok Sabha Election 2024 | हातकणंगलेत राजकीय बलाबल काटाजोड

Arun Patil

कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघ नेहमीच गाजत आला आहे. वादळात दिवा लावणारा जागरूक मतदार हे याचे वैशिष्ट्य. येथे महाविकास आघाडी व महायुतीचे राजकीय बलाबल काटाजोड आहे. थोडेसे इकडे तिकडे झाले की, निकाल बदललाच, अशी स्थिती आहे. सध्या मतदारसंघांतर्गत काही विधानसभा मतदारसंघांत विधानसभा निवडणुकीचेच वातावरण आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट आहे.

सहापैकी तीन मतदारसंघ हे महाविकास आघाडीकडे, तर तीन मतदारसंघ महायुतीकडे आहेत. विधानसभेसाठी इच्छुकांची मोठी संख्या राजकीय गणित बदलवणारी ठरू शकते; मात्र महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवारच अद्याप ठरलेले नाहीत. विद्यमान खासदार मूळचे शिवसेनेचे व सध्या शिंदे शिवसेनेत असलेले धैर्यशील माने उमेदवारीसाठी मुंबईत तळ ठोकून आहेत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी व महायुतीपासून समान अंतर म्हणत प्रचार सुरू केला आहे. ठाकरे शिवसेनेने डॉ. सुजित मिणचेकर व सत्यजित पाटील-सरूडकर यांना तयार राहण्यास सांगितले आहे.

इचलकरंजी : उमेदवार कोण यावर ठरणार

ताराराणी पक्षाचे प्रकाश आवाडे आमदार असून, ते भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावर पालकमंत्र्यांनाही येथील जनतेने जुमानलेले नाही. वाढत्या लोकंख्येला लागणारे पाणी उपलब्ध नाही, त्याचा असंतोष आहे. भाजपातून विधानसभेसाठी प्रकाश आवाडे व सुरेश हाळवणकर इच्छुक आहेत. काँग्रेसचे राहुल खंजिरे, शशांक बावचकर व संजय कांबळे दावेदार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मदन कारंडे व नितीन अशोक जांभळे इच्छुक आहेत. येथे प्रचाराची साधारण परिस्थिती अशीच राहील; मात्र उमेदवार कोण, यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत.

हातकणंगले : विधानसभेची गणिते डोळ्यांसमोर ठेवूनच प्रचार

मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसचे राजूबाबा आवळे करत आहेत. तेच पुढेही काँग्रेसकडून उमेदवारीचे दावेदार असतील. शिवसेना शिंदे गटाची मदार जनसुराज्य शक्ती पक्ष व भाजपवरच आहे. डॉ. सुजित मिणचेकर हे ठाकरे शिवसेनेचे आहेत. ते गोकुळचे संचालक असून, विधानसभेसाठी इच्छुक आहेत. महाविकास आघाडी व महायुतीकडून इच्छुक असलेले उमेदवारीची गणिते डोळ्यांसमोर ठेवूनच प्रचारात उतरतील, तर महायुतीकडून जनसुराज्य शक्ती, तसेच भाजपाकडून डॉ. अशोकराव माने विधानसभा डोळ्यांसमोर ठेवूनच महायुतीच्या प्रचारात उतरतील.

शिरोळ : दुरंगी की तिरंगी यावरच पुढील राजकारण

शिरोळने सन 2019 मध्ये अपक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना साथ दिली. त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला व आरोग्य राज्यमंत्री झाले; मात्र सत्तांतरात त्यांनी शिवसेना शिंदे गटाला साथ दिली. यड्रावकर व माने यांच्यातील विरोध टोकाचा आहे. यड्रावकर व माधवराव घाटगे यांच्यावरच महायुतीची मदार आहे. राजू शेट्टी यांना महाविकासने आपल्या कोट्यातून स्थान दिले, तर येथील गणिते बदलू शकतात. मग ते व उल्हास पाटील एकत्र येतील.

काँग्रेसची मदार 'दत्त'चे सर्वेसर्वा गणपतराव पाटील यांच्यावर असेल. तसे झाले नाही तर उल्हास पाटील व गणपतराव पाटील शेट्टींच्या विरोधात आघाडी उघडतील. यड्रावकर गट हीच राष्ट्रवादी होती.

शाहूवाडी : कोेरे व सरूडकर यांच्याकडेच नेतृत्व

शाहूवाडीतून जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे यांनी सलगपणे हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला आहे. तेथे माजी आमदार ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील-सरूडकर यांना लोकसभेसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. तसे झाले तर येथील राजकीय चित्र नेहमीपेक्षा वेगळे दिसेल. तसे झाले नाही तर मात्र कोरे महायुतीचे, तर सरूडकर महाविकासचे नेतृत्व करतील. पन्हाळा व शाहूवाडीतील इतर घटक त्यांना मदत करतील, असे चित्र आहे.

इस्लामपूर : प्रदेशाध्यक्षपदामुळे लक्ष

शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हा मतदारसंघ महाविकास आघाडीला बहुमत देणारा आहे. जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक येथून लोेकसभेसाठी इच्छुक आहेत; मात्र जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. तेथून भाजपचे निशिकांत पाटील हे महायुतीची बाजू लढवतील, तर गौरव नायकवडी हे शिवसेनेचे गेल्यावेळचे उमेदवार महाविकास आघाडीबरोबर राहतील, असे दिसते.

शिराळा : महाविकास व महायुतीत कमालीची चुरस

शाहूवाडीला लागून असलेल्या या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा कब्जा आहे. मानसिंगराव नाईक हे तेथून निवडून आले आहेत. शिवाजीराव नाईक हे भाजपमधून पुन्हा शरद पवार राष्ट्रवादीकडे आले आहेत. ते महाविकास आघाडीची बाजू लढवतील, तर सम्राट महाडिक, सत्यजित देशमुख हे महायुतीचे काम करतील. येथे प्रत्येकजण विधानसभेला आपली ताकद किती, हे आजमावणार असून, त्यामुळे महाविकास व महायुतीत कमालीची चुरस दिसून येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT