Latest

पाकमध्ये राजकीय अस्थिरता; निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

दिनेश चोरगे

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : आर्थिकद़ृष्ट्या जर्जर झालेल्या पाकिस्तानात राजकीय अस्थिरता पसरण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींनी 90 दिवसांत सार्वत्रिक निवडणुका घेण्याची काळजीवाहू सरकारला दिली आहे. पैशाची चणचण असल्यामुळे पाकमध्ये पुढील वर्षीच निवडणूक घेण्याबाबत काळजीवाहू सरकारचा व्होरा राहणार असल्याचे दिसून येते. लष्करी राजवटीबाबत कायद्यात सुधारणा करण्यात आली असली तरी लष्करी राजवटीचे संकटही पाकवर येण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी 9 ऑगस्टला मध्यरात्री राष्ट्रपतींना पत्र लिहून संसद विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रपतींनी पुढील तीन दिवसांत काळजीवाहू पंतप्रधानपदी नियुक्ती करण्याचा सल्ला सरकारला दिला आहे. याशिवाय तीन महिन्यांत अर्थात 90 दिवसांत सार्वत्रिक निवडणुका घेण्याचीही सूचना केली आहे. पाकची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तोशाखाना भ्रष्टाचारप्रकरणी थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली असून त्यांच्यावर 200 हून अधिक खटले दाखल आहेत. शिवाय, निवडणूक आयोगाने त्यांना पाच वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे.

इम्रान खान यांना बाजूला करण्यात सत्ताधार्‍यांना यश आले असले तरी तूर्त निवडणुका घेण्याऐवढी पाकची ऐपत नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि चीनकडून मिळालेल्या अर्थसहाय्यावर पाक अर्थव्यवस्थेचा डोलारा अवलंबून आहे. त्यामुळे सुरक्षा आणि राजकीय स्थैर्याचा मुद्दा पुढे करून निवडणुका लांबणीवर टाकण्याचा काळजीवाहू सरकारचा प्रयत्न राहणार आहे. पाकमधील राजकीय अस्थैर्यामुळे अमेरिकेने सावध पवित्रा घेतला असून पाकमधील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवले आहे. पाकमधील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देशात हिंसक अथवा दहशतवादी कारवायात वाढ होण्याची शक्यता असल्याने अमेरिकेने पाकबाबतीत अलर्ट जारी केला आहे, अशी माहिती व्हाईट हाऊसमधील सूत्रांनी दिली.

पाकमध्ये लष्करी उठावाची भीतीही व्यक्त करण्यात येते आहे. पाकच्या 74 वर्षांच्या इतिहासात निम्म्याहून अधिक काळ पाकमध्ये लष्करी राजवटीचा अमल राहिला आहे. पाकमध्ये 1947 पासून आतापर्यंत तीन वेळा लष्कराने उठाव करून पाकमध्ये लष्करी राजवट स्थापन केली होती.

पाकमधील लष्करी राजवटीचा इतिहास

1958 मध्ये जनरल याह्या खान यांनी पहिल्यांदा लष्करी उठाव करून मिर्झा यांच्याकडून सत्ता हस्तगत केली.
1977 ः जनलर झिया उल हक यांनी उठाव करून झुल्फिकार अली भुट्टो यांना नजरकैदेत ठेवले.
1999ः नवाज शरीफ यांना पदच्युत करून जनरल परवेझ मुशर्रफ यांनी लष्करी राजवट स्थापन केली.

SCROLL FOR NEXT