पुणे, पुढारी वृत्तसेवा : बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस हवालदाराला दुचाकीवरून खाली पाडत मारहाण करणाऱ्या आरोपीसह त्याच्या आईवर कोथरूड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी व आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश बाळू भरेकर (23, रा. जय भवानी नगर पौडरोड कोथरूड) व त्याची आई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोथरूड पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार शिवाजी मारुती पारगे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे एस राजे यांच्या न्यायालयात बाल लैंगिक अत्याचाराच्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. त्यातील आरोपी असलेल्या गणेश भरेकरला फिर्यादी पारगे आणि त्यांचे सहकारी कर्मचारी पोलीस नाईक बांदल हे न्यायालयाच्या आदेशानुसार अजामीनपात्र वॉरंट बजावण्यासाठी गुरुवारी दुपारी एकच्या दरम्यान आरोपीच्या घरी गेले होते. यावेळी गणेश ला दोघेजण त्याच्या गाडीवरून घेऊन जात असताना त्याने दोघांशी झटापट करून दोघांना खाली पाडले.
त्यावेळी गणेश पळून जात असताना त्याला पारगे यांनी पुन्हा पकडले. त्याच वेळी आरोपीची आई तेथे पळत आली. फिर्यादी यांच्याशी झटापट करत मोठयाने आरडा ओरडा करत शिवीगाळ करून तुम्हाला मी पाहून घेते, तुमची कमिशनरकडे तक्रार करते म्हणत पोलिस कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की केली. तसेच मुलाला अटक करण्यापासून अटकाव केला. यामुळे आरोपी पळून गेल्याने सरकारी कामात अडथळा, पळून जाणे, मारहाण करणे, धमकावणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कोळी करत आहेत.