Latest

धुळे प्रशिक्षण केंद्रात पोलिसांना विषबाधा; जेवणानंतर मैदानात सराव करताना मळमळ, उलटीचा त्रास

backup backup

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात अन्नातून विषबाधा झाल्याने सुमारे 80 पोलिसांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यात सुमारे 200 जणांना विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. जेवण झाल्यानंतर मैदानात रोल कॉल करताना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाल्याने हा प्रकार निदर्शनास आला. दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सुमारे 80 जवानांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून यातील आठ जवानांना जास्तीचा त्रास होत आहे .मात्र स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे यांनी दिली आहे.

धुळे येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून सध्या 630 भावी पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे. आज सायंकाळी या जवानांना मेस मधून जेवण देण्यात आले .जेवण केल्या नंतर मैदानात नियमित रोल कॉल साठी हे पोलीस जवान हजर झाले. मात्र रोल कॉल सुरू होताच यातील बहुसंख्य जवानांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. या जवानांनी मैदानावरच उलटी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकच गोंधळ सुरू झाला. यावेळी जवळपास सर्वच पोलिसांना हा त्रास होत असल्याचे जाणवल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे तातडीने जास्तीचा त्रास होत असलेल्या जवानांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले .तत्पूर्वी भ्रमणध्वनीने ही माहिती वैद्यकीय महाविद्यालयास कळवण्यात आल्याने वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे तसेच डॉक्टर रवंदळे आणि अन्य वैद्यकीय स्टाफ यांनी उपचाराची तयारी करून ठेवली. यानंतर त्रास होत असलेले जवान रुग्णालयात पोहोचताच त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. यातील सुमारे 12 ते 15 जवान धुळे शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात देखील उपचारासाठी पोहोचले .मात्र त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्राने दिली. दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अचानक मोठ्या प्रमाणावर मळमळ आणि उलटीचा त्रास होत असलेले जवान दाखल झाल्याने त्या ठिकाणी देखील गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू करून स्थिती नियंत्रणात ठेवली. दरम्यान या सर्व जवानांची परिस्थिती धोक्याबाहेर असली तरी त्यांचे निरीक्षण आणि उपचार केले जात आहे. या जवानांमधील सुमारे आठ जणांना जास्तीचा त्रास होत असून त्यांच्यावर देखील तातडीचे उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टर भामरे यांनी दिली आहे. दरम्यान जवानांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाल्याने धुळे शहरातील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT