बारामती; पुढारी वृत्तसेवा : बहुजन समाजातील महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जो कोणी प्रथम शाई फेक करेल त्याला ५१ हजार रुपयांचे बक्षिस जाहीर करणे सोमेश्वर सहकारी साखऱ कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांना भोवले आहे. भाजपकडून यासंबंधी त्यांच्यासह अन्य १४ जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल कऱण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तो पुढील तपासासाठी वडगाव निंबाळकर पोलिसांकडे वर्ग केला.
याप्रकरणी भाजपाचे बारामती तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी फिर्याद दिली आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून अनेक ठिकाणी पाटील यांचा निषेध करण्यात आला. बारामती तालुक्यातल्या करंजेपूल येथे १० डिसेंबर रोजी पाटील यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांना काळे फासणाऱ्या इसमाला आपण 51 हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊ, असे सोमेश्वरचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी जाहीर केले होते. त्यानंतर काही तासातच पिंपरी चिंचवडमध्ये एका पदाधिकाऱ्याच्या घरातून बाहेर येताना पाटील यांच्यावर शाईफेकीची घटना घडली होती. मनोज बरकडे यांनी ही शाईफेक केली होती. त्यानंतर गायकवाड यांनी शाईफेक करणारे समता सैनिक दलाचे मनोज घरबडे हे बक्षिसाचे मानकरी ठरल्याचे सोशल मिडियातून जाहीर केले होते.
पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणाचे बारामती कनेक्शन असल्याचे लक्षात येताच भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बारामती पोलिसांनी भारतीय दंड विधान संहिता 353, 109, 143, 149, 504, 506 नुसार ऋषिकेश गायकवाड मनोज घरबडे यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.