वर्साव : पोलंडमधील लुकाझ स्पनर या 53 वर्षीय अवलियाने चक्क गिनीज रेकॉर्ड नोंदवण्यासाठी 4 तास 2 मिनिटे आईस बॉक्समध्ये उभे राहण्याचा अनोखा पराक्रम गाजवला. आश्चर्य म्हणजे यापूर्वीचा जुना विक्रम त्याने 50 मिनिटांच्या अंतराने पिछाडीवर टाकला.
हा विक्रम आपल्या खात्यावर करण्यासाठी त्याला आपले तोंड व मानेचा काही भाग वगळता सर्व शरीर बर्फाखाली ठेवायचे होते. या विक्रमादरम्यान त्याला फक्त स्विमिंग ट्रंक परिधान करण्याची आणि अति थंड बर्फामुळे खर्या अर्थाने दातखीळ बसू नये, यासाठी माऊथगार्ड वापरण्याची परवानगी दिली गेली होती.
प्रारंभी लुकाझला पूर्ण बर्फाच्या बॉक्समध्ये उभे राहणे खूपच कठीण गेले. त्याला यासाठी बराच त्रास सोसावा लागला, पण नंतर तो या तापमानाशी सरावला आणि यामुळे त्याला चार तासांपर्यंत आहे त्या स्थितीत उभे राहणे शक्य झाले. या विक्रमादरम्यान, त्याचे शरीराचे तापमान, त्याचे मानसिक स्वास्थ आणि त्याची एकंदरीत स्थिती यावर बारीक लक्ष ठेवण्यात आले. तो बेशुद्ध होणार नाही, याकडेही लक्ष ठेवले गेले. त्याने चार तासांचा टप्पा पूर्ण करताच सुरक्षिततेची खबरदारी म्हणून त्याला बाहेर येण्याची सूचना केली गेली.
यापूर्वी पॉलिश वॉलरस चॅम्पियनशिपमध्ये अति थंड पाण्यात राहण्याच्या स्पर्धेत तो उपजेता ठरला होता. त्यानंतर त्याने येथे आईस बॉक्समध्ये सर्वाधिक काळ उभे राहण्याचा विक्रम नोंदवण्याचा निश्चय केला आणि आता त्याला यात यशही मिळाले आहे. पोलंडमध्ये अशा प्रकारच्या स्पर्धात यश मिळवण्याचा विक्रम अनेक जणांनी केला आहे. पुरुष गटात आणखी तिघे जण व महिला गटात एक जण, अशा अन्य चौघांनीही या प्रकारच्या स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे, ते ही येथे उल्लेखनीय आहे.