Latest

‘हातभट्टी’मध्ये नशेच्या गोळ्यांची भुकटी; सांगलीवाडीतील प्रकार

दिनेश चोरगे

सांगली : सांगलीवाडी येथे विषारी दारूचा बाजार मांडलेला 'अण्णा' पुन्हा सक्रिय झाला आहे. ठिकाण बदलून रात्रीच्यावेळी त्याचा खेळ सुरूच आहे. 'किक' बसण्यासाठी तो नवसागर आणि नशेच्या गोळ्यांच्या भुकटीचे हातभट्टी दारूमध्ये मिश्रण करीत आहे. हा सारा कारभार हरिपूर व सांगलीवाडीतील नदीकाठी सुरू आहे.

अनेक वर्षांपासून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविण्याचा व गोरगरिबांच्या जिवाशी खेळ करण्याचा हा बेकायदेशीर प्रकार राजरोस सुरू आहे. शरीराला घातक ठरणार्‍या हातभट्टी दारूचे आजही सांगलीवाडी व हरिपूर नदीकाठी पाऊचमध्ये पॅकिंग केले जात आहे. सांगलीवाडीतून या विषारी दारूची विक्री सुरू झाली. त्याचे लोक आता सांगलीत व विश्रामबागपर्यंतच्या पट्ट्यापर्यंत पोहोचले आहेेत.
दानोळी येथे या प्रकाराचे उगमस्थान आहे. तिथे असणार्‍या उसाच्या शेतात हातभट्टी दारूचे बेकायदेशीर गाळप केले जाते. तिथून ती कृष्णा नदीपात्रातून हरिपूर व सांगलीवाडीच्या तिरावर आणली जाते. त्या ठिकाणी नशेच्या गोळ्यांच्या भुकटीचे मिश्रण करून मिसळले जाते. तिथून ती सांगलीवाडी, हरिपूर, कोल्हापूर रस्ता, शंभरफुटी रस्ता, चांदणी चौक, विश्रामबागपर्यंत वितरित केली जाते.

गोरगरीब आणि विशेषत: कामगारवर्ग या विषारी दारूचे बळी ठरत आहेत. त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधित विभागाचे व पोलिस खात्याचेही या बेकायदेशीर प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. दानोळी येथे 24 तास हातभट्टी दारूच्या भट्ट्या पेटलेल्या असतात. नदीतून सांगलीवाडी व हरिपुरात मध्यरात्री दोन वाजता ही दारू पोहोच होते, तीही नावेमधून. यासाठी पंधरा ते वीसजणांची फौज पॅकिंग करण्यासाठी नियुक्त केली आहे.

अडीच हजाराहून अधिक पाऊचचे पॅकिंग केले जाते. या सार्‍या प्रकारामागे 'अण्णा' नामक व्यक्ती आहे. गेल्या महिन्यात 'पुढारी'तून वृत्त प्रसिद्ध होताच 'अण्णा' गायब झाला होता. त्याने या व्यवसायाची सूत्रे 'बापू'कडे दिली होती. पण 'बापू'ला हा 'डोलारा' सांभाळता आला नाही. अण्णा काही दिवस शांत बसला. मात्र आठ दिवसांपासून त्याचा हा उद्योग ठिकाण बदलून पुन्हा सुरू झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT