Latest

रान झाले मुके..!

Arun Patil

कवी ना. धों. महानोर यांच्या निधनामुळे रानातल्या कविता स्तब्ध झाल्या आहेत. झाडे, वेली मुक्या झाल्या आहेत. सहा दशकांहून अधिक काळ मराठी मनावर रानगंधाचे गारुड करणारा आपला लाडका कवी निघून गेल्यामुळे मराठी मनांची अवस्था सैरभैर झाली आहे. महानोर हे केवळ रानातल्या कविता लिहिणारे कवी नव्हते, तर मातीत राबणारे प्रयोगशील शेतकरी आणि शेतकर्‍यांच्या सुख-दुःखाची समरस होऊन जगणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. म्हणूनच जेव्हा महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या तेव्हा त्यांनी आपल्या शेतकरी बांधवांना 'हा रस्ता आपला नव्हे' अशी आर्त साद घातली होती. महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर ते साहित्यिकांचे प्रतिनिधी म्हणून निवडले गेले असले, तरी त्या मंचावरून त्यांनी प्रामुख्याने मांडले ते शेतकर्‍यांचे दुःख आणि त्यांच्या व्यथा-वेदना. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या दुःखांना वाचा फोडणारे महानोर यांच्यासारखे प्रतिनिधी विधिमंडळाच्या इतिहासात फार कमी आढळतील. अजिंठ्याच्या पायथ्याशी वसलेल्या पळसखेड या छोट्याशा गावी सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नामदेव महानोर यांनी संत साहित्यातील नामदेवांचा आणि ज्ञानेश्वर-तुकारामादी संतांचा वारसा पुढे नेण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला.

बहिणाबाईंची गाणी आणि बालकवींची निसर्ग कविता यांचा समृद्ध वारसा लाभलेल्या मराठी कवितेचे महानोर यांनी थेट शेती-मातीशी आणि शेतकर्‍यांच्या घामाशी नाते जोडले. रानातल्या पाखरांच्या गाण्याची वेल्हाळ शब्दकळा घेऊन अवतरलेली महानोर यांची कविता वार्‍यावर स्वार होऊन महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचली. सर्वसामान्य रसिकांनी ही कविता डोक्यावर घेतलीच, शिवाय आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, गानकोकिळा लता मंगेशकर, आशा भोसले, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्यासारखे चाहते त्यांना कवितेने मिळवून दिले आणि या मंडळींनी त्यांची कविता ऐकण्यासाठी थेट त्यांचे पळसखेडचे शेत गाठले. मराठी कवितेला आणि कवीलाही अपवादाने लाभावे असे भाग्य महानोर यांना लाभले; परंतु त्यांचे मातीतले पाय मातीतच रमले. मुंबई-पुण्याच्या शहरी वातावरणापेक्षा ते पळसखेडच्या शेतातच अधिक रमले. कारण, तोच त्यांच्या कवितेचा ऊर्जास्रोत होता.

सातशे वर्षांहून मोठी परंपरा असलेल्या मराठी साहित्यात आपली हिरवी बोली जिव्हाळ्याने स्वीकारली गेली, याचा त्यांना आनंद होता. तो आनंद ते आयुष्यभर कवितेच्या रूपाने वाटत राहिले. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांत खेड्यापाड्यांतून ते कवी संमेलने, साहित्य संमेलने, व्याख्यानांसाठी गेले. खेड्यापाड्यातून लिहिणार्‍या नव्या कवी-लेखकांना प्रोत्साहन देत राहिले. छोट्या संमेलनांना आवर्जून उपस्थित राहायचे, अभिप्रायासाठी पाठवलेल्या कवितासंग्रहावर आवर्जून प्रतिक्रिया पाठवायचे. त्यांचे कौतुकाचे शब्द नव्या लेखकासाठी उभारी देणारे, आत्मविश्वास वाढवणारे असायचे. आपल्या उमेदीच्या काळात यशवंतराव, लतादीदींनी दाद दिली, त्याची कृतज्ञ जाणीव त्यांच्या या प्रतिसादामागे असायची. त्यांच्या निधनामुळे नव्या लेखक-कवींना प्रोत्साहन देणारा, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारा हात काळाच्या पडद्याआड गेला आहे.

'ह्या शेताने लळा लाविला असा असा की, सुख-दुःखाला परस्परांशी हसलो रडलो..' असे म्हणता म्हणता कवीवर्य ना. धों. महानोर, 'आता तर हा जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो…' अशी द्वाही फिरवतात. स्वतः कवी हिरव्या बोलीचा शब्द होतो, त्याची अवघी कविताच निसर्गाशी एकरूप होऊन जाते. 'ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतूनि चैतन्य गावे', अशी प्रार्थना म्हणणारा हा कवी 'जोंधळ्याला चांदणे लखडून जावे', असे म्हणतो तेव्हा तो मातीत राबणार्‍या तमाम शेतकर्‍यांसाठी ऐश्वर्याचे मागणे मागत असतो. महानोर यांची कविता ही अशी शेतकर्‍यांसाठी निर्मिकाकडे दान मागणारी कविता आहे. त्याचवेळी मातीत राबणार्‍या या शेतकर्‍याच्या दुःखाला कवेत घेणारी कविता आहे.

'रानातल्या कविता', 'पावसाळी कविता', 'अजिंठा', 'वही', 'पानझड', 'गंगा वाहू दे निर्मळ' या कवितासंग्रहांनी मराठी साहित्य आणि काव्यरसिकांना वेड लावले. 'अजिंठा' या दीर्घकाव्यातून त्यांनी अजिंठ्याच्या कुशीत फुललेली रॉबर्ट गिल आणि पारो यांची प्रेमकथा तरलपणे मांडली आहे. 'गांधारी' या कादंबरीतून त्यांनी मराठी कादंबरी वाङ्मयातही आपले वेगळेपण नोंद करून ठेवले आहे. 'गपसप' आणि 'गावाकडच्या गोष्टी'मधून त्यांचे खेड्यातले गोष्टीवेल्हाळ मन प्रतिबिंबित झाले आहे. त्यांच्या 'आजोळच्या गाण्यां'ना लता मंगेशकर यांनी अजरामर केले आहे.

'जैत रे जैत', 'मुक्ता', 'एक होता विदुषक', 'सर्जा' या चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेल्या गाण्यांनी मराठी चित्रपट संगीताला समृद्ध केले आहे. महानोरांनी मोजक्याच चित्रपटांना गाणी लिहिली; परंतु ती सगळीच्या सगळी मराठी रसिकांच्या ओठावर रुळली. साहित्याच्या क्षेत्रात चौफेर मुशाफिरी केली असली, तरी महानोर यांची खरी ओळख आहे, ती कवी म्हणूनच. खेड्यातले आणि शेतकर्‍याचे जगणे त्यांनी समग्रतेने कवितेमध्ये आणले. त्या जगण्यात निसर्गातला आनंद होता, पिकांचे डोलणे होते, शृंगार होता, शेतकर्‍यांचे जगणे होते आणि मातीत राबताना वाट्याला येणारे दुःखही होते. विधान परिषदेमध्ये राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये खर्‍या अर्थाने साहित्यिक, कलावंतांना स्थान देण्याचा प्रयत्न करणारे नेते होते. त्या काळात ग. दि. माडगूळकर, ना. धों. महानोर यांच्यासारखे साहित्यिक विधान परिषदेमध्ये गेले.

तिथे गेल्यानंतर महानोर यांनी अत्यंत जबाबदारीने काम केले. साहित्य-सांस्कृतिक क्षेत्राचे प्रश्न मांडलेच, शिवाय प्राधान्याने शेती आणि शेतकर्‍यांचे प्रश्न मांडले. वयाच्या अठराव्या वर्षापासून शेती करणार्‍या महानोर यांचे पहिले प्रेम शेती हेच होते. 40 वर्षांपूर्वी त्यांनी पळसखेडला 26 सिमेंट बंधारे, 26 दगडी बंधारे आणि तीन तलाव बांधून घेतले होते. शेतीच्या विकासातला तो महत्त्वाचा प्रयोग मानला जातो. असा हा कवी आपल्या अर्धांगिनी सुलोचना महानोर यांच्या निधनानंतर पार खचून गेला होता. कवितेच्या साथीने स्वतःला सावरण्याचा त्यांचा प्रयत्न होता; परंतु जीवनसाथीच्या जाण्याच्या दुःखातून ते सावरू शकले नाहीत आणि त्यांनीही जगाचा निरोप घेतला. मराठीतल्या या महाकवीला भावपूर्ण आदरांजली!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT