1952 च्या निवडणुकीत मराठवाड्यातील मतदारसंघ हैदराबाद स्टेट, 1957 ला बॉम्बे स्टेटमध्ये होते. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर मात्र या भागातील मतदारसंघांची नोंद महाराष्ट्र राज्यात अधिकृतपणे झाली. 1957 च्या निवडणुकीत मराठवाड्यातील नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, परभणी या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. नांदेड मतदारसंघात दोन उमेदवार निवडून देण्याची व्यवस्था असल्याने प्राधान्यक्रमाने मिळालेल्या मतांच्या आधारे देवराव कांबळे (काँग्रेस), हरिहरराव सोनुले (ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन) यांनी बाजी मारली. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते माजी मंत्री दिगंबरराव बिंदू, प्रजा समजावादीचे नेते विजयेंद्र काबरा पराभूत झाले.
ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. पहिल्या निवडणुकीत सोलापूर, करीमनगर मतदारसंघातून फेडरेशनचे उमेदवार विजयी झाले. फेडरेशन विसर्जित करून रिपब्लिकन पक्षाची स्थापना करावी, असा विचार बाबासाहेबांचा होता. पण त्यांच्या आकस्मिक निधनामुळे फेडरेशनच्या नेत्यांनी 1957 ची निवडणूक फेडरेशनच्या नावावर (निवडणूक चिन्ह : हत्ती) लढविली. फेडरेशनने महाराष्ट्रात मुंबई, नाशिक, खेड, मध्य मुंबई, कोल्हापूर, नांदेड या सहा जागा जिंकून प्रभुत्व सिद्ध केले.
सोनुले यांचे शिक्षण नांदेड जि. प. शाळेत, महाविद्यालयीन शिक्षण हैदराबादेत झाले. हदगावचे मूळ रहिवासी असणार्या सोनुले यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषांवर प्रेम होते. लोकसभेतील इंग्रजी भाषण ऐकून पं. नेहरूही प्रभावित झाले होते. 'फिटे युगाचे पारणे' हा त्यांचा काव्यसंग्रह प्रा. रवीचंद्र हडसनकर यांनी संपादित केला आहे. त्यांची एक कविता केशवसुतांच्या 'तुतारी'सारखीच आहे.
एकतारीने तारेवाल्या गा शांती गायन घुमव नादद जा दारोदारी ये शांती निर्मून. दरी डोंगरी, कड्या कपारी, खोरीच्या आतून मराठवाडा साहित्य परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते, उर्दू मुशायरे, कवी संमेलने गाजविणारे सोनुले यांनी राजकीय पटलावरही आपली मोहर उमटविली होती. हैदराबाद स्वातंत्र्यसंग्रामातही सोनुले यांचा सहभाग मोलाचा राहिला, असे प्रा. चंद्रकांत जोशी सनपूरकर यांनी एका लेखात नमूद केले आहे.